२१ सप्टेबर,,,जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन
X
२१ सप्टेबर १९९५ मध्ये गणपती दुध प्यायला अशी भली मोठी अफवा पसरवली होती, तिचे उच्चाटन व प्रबोधन करून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सत्यशोधन करून हि निव्वळ अफवा आहे हे सिद्ध केले होते, त्या दिवसापासून अंनीस ने २१ सप्टेबर हा दिवस "चमत्कार सत्यशोधन दिन "
म्हणजेच जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून घोषित केला आहे. श्रद्धा तपासून पाहण्याचं भान ठेवा. 'विज्ञानाच्या विकासाचा सारा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे' असे डॉ.दाभोळकर नेहमी म्हणत असे.
एखादी अंधश्रद्धा किती वेगाने जनमानसाचा ताबा घेऊ शकते, त्याचे हे भयचकित करणारे दर्शन होते. गणेश दूध पितो, हा चमत्कार निदान कुतूहल वाढवणारा होता आणि त्यातून काही भीतिदायक घडण्यासारखे नव्हते. पण अगदी अलिकडे यवतमाळ जिल्ह्यातील देवीच्या डोळ्यांतून पाणी येत आहे, ती रडत आहे, अशी अंधश्रद्धेची अफवा बघता-बघता पूर्ण विदर्भभर पसरली आणि त्यामुळे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून रात्रभर गावेच्या गावे आणि नंतर शहरेच्या शहरे जागी राहिली. दुसऱ्या दिवशी देवीच्या डोळ्यांतून रक्त येत आहे, असा पुढचा टप्पा अफवेने गाठला. एक बरे झाले की, त्याचा प्रसार मर्यादित राहिला. गणपती दुग्धप्राशन आणि त्याचा प्रसार यामुळे अस्वस्थ झालेल्या महाराष्ट्रातील व भारतातील अनेक शास्त्रज्ञांनी व समाजधुरिणांनी त्यावेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना पत्र लिहून या घटनेबाबत सखोल चौकशी करण्याची व अंधश्रद्धेचे असे सामूहिक प्रदर्शन पुन्हा देशात घडू नये, यासाठी काही उपाययोजना करण्याची विनंती केली. यातूनच अंधश्रद्धा निर्मूलन दिवसाचा जन्म झाला.
भारतीय घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. १९८६ मध्ये आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती हा शिक्षणातील महत्त्वाचा गाभाघटक आहे. युतीचे सरकार महाराष्ट्रात असताना त्यांनी शालेय शिक्षणात मूल्यशिक्षणाचा समावेश केला. त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि आजचे युग हे विज्ञानयुग आहे, असे आपण हरघडी अनुभवत असतो. आता वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ कार्यकारणभाव तपासणे. थोडक्यात कार्यकारणभाव प्रभाव म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कार्यकारणभाव अभाव म्हणजे अंधश्रद्धांची निर्मिती. वैज्ञानिक दृष्टिकोन हा तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. म्हणून २८ फेब्रुवारी हा विज्ञानदिन म्हणून साजरा होतो. परंतु त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दुसरे महत्त्वाचे तेवढेच अंग आहे, ते म्हणजे अंधश्रद्धांचे निर्मूलन. त्यासाठी २१ सप्टेंबर हा अंधश्रद्धा निर्मूलन दिवस म्हणून पाळला जातो.
अंधश्रद्धांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये केवळ कार्यकारणभावाचा अभाव नसतो, तर मानसिक गुलामीमुळे पावित्र्य अथवा मान्यता लाभलेल्या शोषणाचा प्रभाव असतो. शोषण वाईटच; परंतु त्यामुळे मानसिक गुलामी निर्माण होणे अधिक वाईट आणि त्याला पावित्र्य अथवा शास्त्र याचा दर्जा देणे तर मानवी प्रगतीला सर्वस्वी हानिकारक आहे. १५० कोटी किलोमीटरवर असलेला व बहुतांशी गॅसने बनलेला शनि पत्रिकेत वक्री आहे म्हणून लग्न मोडणे काय किंवा त्या ग्रहाची शांती करणे काय, दोन्ही तेवढेच हास्यास्पद आणि चुकीचे आहे. स्वत:चे घर सुरक्षित, सोयीचे, सुखकारक असावे, असे बांधावे असे प्रत्येकालाच वाटते. मात्र ते लाभावे म्हणून त्याच्या दारापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत दिशा ठरविणे वा तोडफोड करून ती बदलणे, हे अंधश्रद्धेला शरण गेलेल्या मानसिकतेचे दर्शन आहे. त्यामुळे माणूस पराधिन होतो, परतंत्र होतो, परलोकवादी होतो. अंधश्रद्धा निर्मूलनाचा दिवस साजरा करणे, याचा अर्थ त्या अंधश्रद्धांना झुगारून देऊन माणसाने स्वतंत्र, स्वाधीन व इहलोकवादी होणे. हीच मानसिकता समाजाला व राष्ट्राला पुढे नेऊ शकेल.