Home > Politics > खेल अब शुरू हुआ हैं!

खेल अब शुरू हुआ हैं!

The game has now started!

खेल अब शुरू हुआ हैं!
X

शिवसेनेला सातत्याने कोंडीत पकडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची कुटील कारस्थाने व महाविकास आघाडीच्या प्रयोगात स्वतःचे सत्व हरवत चाललेल्या शिवसेनेला मोठा करंट बसण्याची गरज होती. सत्तेत असून पक्ष बळकट होताना दिसत नाही, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांचा सत्ताकेंद्राशी संपर्क कमी झाला अशा चर्चा पराकोटीला पोहचल्या असताना एकनाथ शिंदे यांनी पक्षच हायजॅक करण्याचा डाव खेळला. आणि सेना अंतर्बाह्य हादरली. हादरले केवळ सेनेचे कार्यकर्ते नव्हे तर ठाकरे घराणेही. आजपर्यंतची भुजबळ, राज ठाकरे, नारायण राणे या नेत्यांची बंडखोरी स्वतःची राजकीय स्पेस तयार करण्यासाठी होती. इथं शिंदे यांचा प्रत्यक्ष ठाकरे घराण्याने जन्माला घातलेला, वाढवलेला, सत्तेत आणलेल्या पक्षावर सर्वस्वी दावा सांगणे ही फारच धोकादायक खेळी होती. पक्षातील बहुसंख्य आमदारांचे आपल्यामागे समर्थन आहे, एवढ्या मर्यादित राजकीय बळावर शिंदे यांनी ठाकरे घराण्यापुढे शड्डू थोपटले व मातोश्रीतील सिंहासनावर आपला दावा सांगण्यास सुरूवात केली.

राजकारणात घराणेशाही असलेल्या पक्षात थेट कर्त्याला आव्हान देणे ही आत्महत्याच असते. आणि त्यात कर्त्याला शिंगावर घ्यायचे म्हटल्यास त्यासाठी बाहेरून मोठी आसूरी ताकद असावी लागते. शिंदे यांचे सुरतला जाणे व तेथून गोहाटीला समर्थक आमदारांना घेऊन जाणे यातून स्पष्टपणे कळून चुकले की त्यांच्या बंडखोरीमागे फडणवीस, त्यांचा कंपू, दिल्लीतील केंद्र सरकार यांची ताकद आहे. या शिवाय या सर्वांना साथ देणारी महाराष्ट्रातील पोलिस व अन्य तपास यंत्रणा ही सिस्टीमही आहे.

एवढे भरभक्कम पाठबळ असल्याने शिंदे यांनी महाराष्ट्राबाहेर तीन दिवस काढले. मीडियाने शिंदे यांची ताकद ठाकरे घराण्यापेक्षा अधिक वाढल्याचे सांगण्यास सुरूवात केल्याने शिंदे यांनी ठाकरेंपुढे डाव टाकण्यास सुरूवात केली. पहिला डाव त्यांचा शिवसेनेत आपण आजही आहोत असा होता. आपण अजूनही बाळासाहेबांचे सैनिक आहोत, आपली इच्छा पक्ष फोडण्याची नाही किंवा अन्य कोणत्याही पक्षात जाण्याची नाही पण हिंदुत्वासाठी शिवसेनेने भाजप सोबत जावे यासाठी आहे असे ते सांगू लागले. शिंदेंनी नंतर आपणच शिवसेना असल्याचे सांगण्यास सुरूवात केली. हा दुसरा डाव ठाकरे घराण्यासाठी पुरेसा होता. कारण या डावामुळे उद्धव ठाकरे यांनी थेट जनतेत जाण्याचा निर्णय घेतला व एका रात्रीत त्यांनी आपल्या बॅगा आवरून मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला व तो अंमलातही आणला. ज्यांनी कोणी बुधवारी रात्री ठाकरे कुटुंबियांचा वर्षा ते मातोश्री असा प्रवास पाहिला असेल त्यांना जागोजागी शेकडो शिवसेना कार्यकर्ते ठाकरेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर स्वागतासाठी उभे राहिलेले दिसले असतील. या गर्दीत बंडखोरांबद्दल अत्यंत नाराजी दिसून येत होती. सत्तेचा मोह नसलेले आमचे नेतृत्व मुख्यमंत्र्याचे घर सोडून आले, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना दिसत होती.

हा हाय होल्टेज ड्रामा एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने कदाचित अपेक्षिला नसेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत आपल्या पुढे मोठी बिकट परिस्थिती असणार आहे, याची कल्पना शिंदे गटाला आली असणारच.

उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडले असले तरी मुख्यमंत्रीपद सोडलेले नाही, हा शिंदेंपुढे टाकलेला मोठा पेच आहे. ठाकरेंनी शिंदे गटापुढे थेट पुढे येऊन चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्तावच शिंदे गटासाठी अडचणीचा आहे, कारण एवढे मोठे बंड केल्यानंतर, त्यात पक्षावर दावा सांगितल्यानंतर प्रमुख नेत्याशी वाटाघाटी करताना मुद्दे तसे चर्चेला येत नसतात. सुरू होतो तो वाद असतो. यात तडजोड करणे म्हणजे आपली ताकद कमी करणे असे असते. उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या लाखो शिवसैनिकांची शक्ती आहे तर शिंदेंकडे पक्षातील जवळ जवळ दोन तृतीयांश आमदार. यात ताकद कुणाची अधिक आहे हे स्पष्ट आहे. अशा वाटाघाटीत शिंदे गटातील काही आमदार पुन्हा शिवसेनेत गेल्यास बंडातील हवा निघून जाऊ शकते. कार्यकर्त्यांचा क्षोभही विचारात घ्यावा लागतो. शिवसेना आजही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे व कार्यकर्ते आपल्या नेत्यापेक्षा ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ आहेत.

शिंदे यांचा राजकीय प्रभाव ठाणे व आसपासच्या परिसराबाहेर नाही. या भागात शिंदेंनी शिवसेना वाढवली असली तरी ती वाढ आर्थिक पातळीवर अधिक आहे. शिंदेंच्या आर्थिक साम्राज्याच्या बळावर नगरसेवक निवडून येत असले तरी या निवडीत शिवसेना या पक्षाचे म्हणून काही स्थान, वाटा आहे, तो नाकारता येत नाही. राजकारणात निर्णायक क्षणी कार्यकर्त्यांना आर्थिक प्रलोभने दाखवता येत नाहीत, त्यांना विधायक कार्यक्रम द्यावा लागतो, वैचारिक घुसळण करावी लागते. त्यामुळे शिंदेचे हे नेटवर्क पुढे त्यांच्या मागे किती राहील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाय शिंदे यांच्या मागे गेलेल्या प्रत्येक आमदाराला, ज्याला स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजकीय बळ, ताकद दिली आहे त्यांनाही हे नेटवर्क आपल्याकडे ओढून घ्यावे लागेल. तितका वेळ या सर्वांकडे नाही. वेळ अत्यंत कमी आहे व याची जाणीव बंडखोर गटाला अद्याप आलेली दिसत नाही.

जे बंडखोर आमदार आहेत, त्यातील किती पैशासाठी गेले आहेत, किती ईडी-सीबीआयच्या धास्तीने गेले आहेत, किती ठाकरेंना वैचारिक दृष्ट्या आव्हान देण्यासाठी गेले आहेत हे स्पष्ट नाही. पण जे गेले आहेत ते निश्चित भाजपच्या आहारी जाऊन गेले आहेत हे दिसून येते.

शिंदेनी उद्या सरकार स्थापन केले तरी त्यांना बाहेरून भाजपचाच पाठिंबा घ्यावा लागणार आहे. भाजप त्यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात आपले राजकारण अधिक रेटणार प्रसंगी शहकाटशहाचे राजकारण शिगेला पोहचणार व शिंदेंना नामोहरम केले जाणार यात शंका नाही.

आता मातोश्रीत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षातील एक मोठी राजकीय स्पेस व्यापली आहे, त्याचा वापर करत ते शिंदेंसमोर अनेक व्यूह रचत जातील. खेल अब शुरू हुआ हैं..

Updated : 23 Jun 2022 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top