Home > News > पारध्यांच्या मोर्चाची प्रशासनाकडून दखल

पारध्यांच्या मोर्चाची प्रशासनाकडून दखल

गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वाला यश

पारध्यांच्या मोर्चाची प्रशासनाकडून दखल
X

पारध्यांच्या मोर्चाची प्रशासनाकडून दखल

गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वाला यश

आज जमिनीचे पट्टे देण्याबाबत बैठक


यवतमाळ : पालकमंत्र्यांच्या आदेशाला डावलणाऱ्या आजंती ग्रामपंचायती विरोधात पारध्यांनी आज काढलेल्या अर्धंनग्न मोर्चाची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वाला मोठे यश आले असून उद्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जमिनीचे पट्टे देण्यासंदर्भात बैठक होऊ घातली आहे. आजच्या आंदोलनामुळे मागील तीस वर्षापासूनच्या मागणीला दिशा मिळण्याची शक्यता आहे.


संविधानाने सर्वांना समान जगण्याची संधी दिली मग ती आम्हा फासे पारधी बांधवांना लागू होत नाही का?, गावात राहताना मूलभूत सुविधा मिळत नसेल तर तो मिळविण्याचा प्रयत्न आम्ही करायचा नाही का, निष्ठुर आजंती ग्राम पंचायत आम्हाला आणखी मागास करीत आहे तर त्यांच्याविरोधात लढा द्यायचा नाही का? असे अनेक प्रश्नांच्या जयघोषाने फासे पारधी बांधवांनी मोर्चा काढला. गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या नेतृत्वात ५६ कुटुंबातील पारधी आपल्या मुलाबाळांसह सहभागी झाले होते. सुरुवातीला हा मोर्चा थेट आजंती ग्राम पंचायतीवर धडकला. तेथे संघाचे अध्यक्ष गेडाम यांनी उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना ठराव न घेण्याचा जाब विचारला यावर त्यांनीही मजेशीर उत्तर देत ठराव घेण्यासाठी आधी वरिष्ठांना विचारावे लागेल असे सांगितले. दरम्यान, एका पोलीस शिपायाने मधताच हस्तक्षेप करीत ठराव घेण्यासंबंधी कायद्याचे अर्धवट ज्ञान पाजाळले वरून मीसुद्धा ग्रामसेवक म्हणून कारभार सांभाळल्याचा दम भरला. त्यानंतर त्याच्याच मध्यस्थीने ग्रामसेवकांनी मागण्यासाठी वरिष्ठांना कळवितो असे लेखी लिहून दिल्यानंतर या मोर्चाने पुढे तहसील कार्यालयाकडे आगेकूच केली. कारंजा मार्गाने मार्गक्रमण करीत पारध्यांनी नेरवासियांचे लक्ष वेधून घेतले. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केल्यानंतर संघाचे अध्यक्ष गेडाम, फासे पारधी बांधवांचे नेतृत्व बबन पवार,खजिरा घोसले यांच्याशी नायब तहसीलदार ताकसांडे यांनी चर्चा केली. चर्चेअंती उद्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याचे त्यांनी लेखी पत्र देत सांगितल्यानंतर गेडाम यांनी आपला मोर्चा मागे घेतला. यावेळी मोर्चाचे श्रेय घेण्यासाठी काही हौश्या- गवश्यांचीही उपस्थिती दिसून आली.मोर्चात वरस पवार, परभणी भोसले,आरो भोसले, काल्या पवार, अल्पसिंग पवार,कल्पि भोसले आदी सहभागी झाले होते.बैठकीत समाधान न झाल्यास आत्मदहन

आजंती ग्रामपंचायतीने आजपर्यंत पारधी बांधवांना जमिनीचे पट्टे देण्यासंदर्भात बैठक घेतली नाही. परिणामी यांच्या मागणीचा विचार झाला नाही. आजंती ग्राम पंचायत प्रशासनाने पालकमंत्र्यांच्याही आदेशाला प्रतिसाद दिला नाही. परंतु,आजच्या आंदोलनामुळे आमची मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे उद्याच्या बैठकीत हा प्रश्न सुटला नाही तर मी आत्मदहन करण्याच्या पूर्ण तयारीत आहे.

मनोज गेडाम, अध्यक्ष गुरुदेव युवा संघ यवतमाळ


Updated : 25 Nov 2022 3:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top