जाजू इंग्लिश मिडीयम स्कूल यवतमाळ येथे "योगा आणि आरोग्य " यावर गीता परिवार तर्फे मार्गदर्शन !!
- 'आनंदी, उत्साही व सकारात्मक वृत्ती अंगी येण्यासाठी योगा आवश्यक आहे !'-श्रीमती प्रमिलाताई माहेश्वरी
X
दि.4 मार्च..... विद्यार्थ्यानी केवळ शारीरिक सुदृढ असून चालत नाही तर त्यांचा मानसिक आणि भावनिक विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन संस्थेचे सचिव श्री. आशिषजी जाजू आणि संचालिका सौ.शिल्पा आशिष जाजू यांच्या प्रेरणेने स्थानिक जाजू इंग्लिश मिडीयम स्कूल यवतमाळ येथे गीता परिवार तर्फे "योगा आणि आरोग्य " याबद्दल मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ. पूनमताई प्रकाशजी जाजू, संस्थेचे पदाधिकारी दर्शनजी जाजू, शिबिराचे मुख्य मार्गदर्शिका श्रीमती प्रमिलाताई माहेश्वरी (राष्ट्रीय उपाध्यक्ष गीता परिवार), प्रेम गोसावी (कार्यकर्ता -गीता परिवार), श्री. गजानन टिकणायत, सौ. शची टिकणायत, मुख्याध्यापक श्री. सतीश उपरे, मुख्याध्यपिका सौ. रिता देशमुख, समन्वयिका सुचिता पारेख, तसनिम रत्नामवाला यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
योगामुळे मनाची एकाग्रता कशी साधली जाऊ शकते? विद्यार्थ्यांनी बौद्धिक विकास कसा साधावा? तसेच योगामुळे उदात्त जीवनमूल्ये कशी स्वतःत रुजवावी? याबद्दल प्रत्येक्ष विविध आसनांच्या द्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती प्रमिलाताई माहेश्वरी म्हणाल्या की, " विद्यार्थ्यात आनंदी, उत्साही व सकारात्मक वृत्ती अंगी येण्यासाठी योगाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. योगामुळे प्रसंगी आलेल्या अपयशाला, नैराश्याला समर्थपणे तोंड देण्याचे धाडस, उदात्त जीवनमूल्ये उत्तमपणे विद्यार्थ्यात रुजविता येते."
विद्यार्थी जीवनात योगामुळे ताणतणावापासून मुक्ती, अंतर्यामी शांतता, सजगतेत वाढ, ऊर्जा शक्तीत वाढ, अंतर्ज्ञानात वाढ होते असे अगणित फायदे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला.
एक दिवसीय शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले व शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले.