धर्मांध प्रवृत्ती ही भारतीय लोकशाहीची व संविधानाची शत्रूच- हाजी इर्शादभाई
Bigotry is the enemy of Indian democracy and constitution - Haji Irshadbhai
X
आदर्श भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला आपापल्या धर्मांप्रमाणे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. या स्वातंत्र्यामध्ये स्वधर्मियांबरोबर अन्य धर्मांविषयी आदर व सन्मान अभिप्रेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यातून रयतेचे राज्य स्थापन करून आपल्या आदर्श राज्य कारभारातून व जीवन प्रणालीतुन तशी शिकवण आपल्याला दिली आहे. माणसाच्या जगण्यात धर्मांध प्रवृत्तीचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अन्य धर्मांविषयीचा परस्पर सामंजस्याचा द्रुष्टीकोण झपाट्याने बदलत असुन ती जागा द्वेषाने घेतली आहे. त्यामुळे धर्मांधता हे भारतीय लोकशाहीला मोठे आव्हान असून अतिशय घातक आहे असे स्पष्ट प्रतिपादन समस्त मुस्लिम जमात, महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष हाजी सय्यद इर्शाद अशरफी यांनी केले आहे.
अहमदनगर येथे नुकतीच त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुस्लिम जमातीचे प्रदेश सचिव डॉ. परवेज अशरफी, मुफ़्ती अलताफ़, मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील अॅड. समीर शेख़ व अन्य प्रतिष्ठीत व्यक्ति उपस्थित होते.
अहमदनगर शहरात नुकत्याच घडत असलेल्या घडामोडी संदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली. शहरातील एकात्मतेच्या व शांततेच्या वातावरणाला बिघडविण्याचे काम काही धर्मांध जातीयवादी शक्ती करीत असुन प्रशासनातील काही धर्मांध प्रशासकीय अधिकारी अशा प्रवृत्तींना पाठीशी घालत असून भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे हनन करीत आहेत ही निंदनीय बाब असुन चिंतेचा विषय आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना पोलिस प्रशासनाकडून शहरात मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी एक नाटक दाखविण्यात आले त्यामध्ये सर्वच आतंकवादी मुस्लिम दाखविण्यात आले असून एका आतंकवादयास पोलिसांनी पकडले असता त्या आतंकवादयाने ईस्लामिक धार्मिक घोषणा दिल्याचे दाखविण्यात आले. वास्तविक पाहता इस्लाम धर्माचा व दहशतीचा तसेच इस्लाम व आतंकवादी प्रवृत्तीचा काडीमात्र संबंध नसताना संबधित पोलिस व नाटक कंपनी कडून जाणीवपूर्वक इस्लाम व मुस्लिम समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला व दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचे कृत्य जाणिवपूर्वक करण्यात आले. हे भारतीय लोकशाहीला व देशाच्या एकात्मतेला घातक आहे. महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय पदांवर कार्यरत राहून असे असंवैधानिक कृत करणाऱ्या अधिकार्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हाजी इर्शादभाई यांनी केली आहे.
आपल्या देशाला व महाराष्ट्र राज्याला सामाजिक समतेची व सांस्कृतिक समन्वयाची दीर्घ परंपरा आहे. या परंपरेने देशाला व विशेषतः महाराष्ट्र राज्याला एक समृद्ध वारसा दिला आहे. या वारशातून भारतीयत्व ही संकल्पना आकारास आली आहे. ज्या संकल्पनेने निकोप लोकशाहीच्या निर्मितीला बळ मिळाले आहे. परंतू आज संकुचित हेतू नजरे समोर ठेऊन काही मुठभर समाज कंठक व धर्मांध प्रवृत्तीचे लोक जाती - जाती व धर्मा - धर्मांमध्ये तेढ निर्माण करीत आहेत. समाजातील सामाजिक व वैचारिक वारसा ठेवणाऱ्या लोकांनी विशेषतः तरुण पिढीने हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे व देशातील लोकशाही अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन हाजी इर्शादभाई यांनी केले आहे.