Latest News
Home > M marathi report > उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो

उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो

I condemn the incident in Udaipur

उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
X

उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो

✒️ एम आय शेख

ज्या प्रेषित मुहम्मद सल्लम वरील तथाकथित प्रेमा पाई या दोघांनी कन्हैयालाल यांची हत्या केली आहे वास्तविक पहाता त्यांनी इस्लाम च्या शिकवणीची हत्या केली आहे. त्यांना प्रेषित मुहम्मद सल्लम समजलेच नाहीत असे म्हटले तर वावगे होणार नाही. - एम आय शेख ...

∆ उदयपूर (राजस्थान) मध्ये 28 जून 2022 मंगळवारी एक शिंपी ज्यांचे नाव कन्हैयालाल होते यांची निघृण हत्या करण्यात आली. हत्या करणारे रियाज अत्तारी आणि गौस मुहम्मद असे दोन तरूण होते. त्यांनी अतिशय थंड डोक्याने विभत्सपद्धतीने ही हत्या केली. कपडे शिऊन घेण्याच्या बहाण्याने ते दुकानात शिरले आणि कन्हैय्यालाल माप घेण्याबद्दल सांगितले. जेव्हा कन्हैय्यालाल त्यांच्यापैकी एकाचे माप घेण्यात मग्न होते तेव्हा दुसर्‍याने तीक्ष्ण हत्याराने कन्हैय्यालालच्या वर्मी घाव घातला. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आवाजाने दुकानातील नौकर ज्याचे नाव ईश्‍वर आहे भयभीत झाला आणि दुकान सोडून पळून गेला. कन्हैय्यालाल याने दहा दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट टाकली होती. तेव्हापासूनच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. याबाबत त्यांनी पोलिसांमध्ये लेखी तक्रारही केली होती आणि पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्यांच्यात आणि त्यांच्या विरोधात तक्रार देणार्‍या मुस्लिम युवकांमध्ये समेटही घडवून आणला होता. पण या दुसर्‍याच दोन लोकांनी ही घटना घडविली. राजस्थान पोलिसांचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जंगा श्रीनिवासराव आणि दिनेश एम.एन. यांना जयपूरहून उदयपूरला रवाना करण्यात आलेले आहे. मंगळवारी रात्री उशीरा हे दोघेही घटनास्थळी पोहोचले. उदयपूर पोलिसांव्यतिरिक्त 600 अतिरिक्त पोलिसांची तैनाती उदयपूरमध्ये करण्यात आली असून, काही किरकोळ जाळपोळीचे प्रकार वगळता ही बातमी लिहिपर्यंत उदयपूर शांत होते. अनेक ठिकाणी शहरात कर्फ्यू लावण्यात आलेला असून, इंटरनेटची सेवाही बंद करण्यात आलेली आहे. पोलिसांनी तातडीने हालचाल करत या दोघांना अटक केल्याचीही बातमी आलेली आहे. परंतु, पोलिसांनी अजून या अटकेची पुष्टी केलेली नाही. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य पाहता याचा पुढील तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याची घोषणा 29 जून रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी केली. एनआयएकडून माध्यमांना दिल्या गेलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, या दोघांचा संबंध आयएसआय या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेशी असून, यांचा संपर्क काही पाकिस्तानी लोकांशीही होता. हत्येच्या कलमांव्यतिरिक्त या केसमध्ये युएपीए लावण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कसोशिने तपास करून सदरचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालविण्याची घोषणा केली असून, मरण पावलेल्या व्यक्तिच्या परिवाराला 31 लाख रूपयाचा मोबदला देण्याची घोषणा केलेली आहे. या घटनेनंतर उदयपूरच नव्हे तर राजस्थानच्या अनेक शहरांमध्ये तणाव पसरलेला असून, एक महिन्यासाठी कलम 144 लागू करण्यात आलेले आहे.

या घटनेचा सर्वस्तरावरून निषेध होत आहे. अनेक मुस्लिम सामाजिक, धार्मिक संघटनांनी या घटनेचा निषेध करत आरोपींविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. अनेक उलेमांनी विशेषतः खलीलुर्रहेमान सज्जाद नौमानी साहेबांनी विशेष पत्रक काढून या घटनेचा निषेध केलेला आहे. एसआयओ आणि जमाअते इस्लामी हिंद यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलेला आहे. सभ्य समाजामध्ये अशा पाश्‍वीकृत्यांना जागा नाही. या दोघांचे हे कृत्य हे त्यांचे वैयक्तिक कृत्य असून त्याचा भारतीय मुस्लिम समाजाशी आणि इस्लामशी काहीही संबंध नाही. निरपराध लोकांची हत्या करण्याची परवानगी इस्लाम कधीच देत नाही. कुरआनमध्ये स्पष्ट सांगितले आहे की,

ﻣِﻦْ ﺃَﺟْﻞِ ﺫَٰﻟِﻚَ ﻛَﺘَﺒْﻨَﺎ ﻋَﻠَﻰٰ ﺑَﻨِﻰٓ ﺇِﺳْﺮَٰٓءِﻳﻞَ ﺃَﻧَّﻪُۥ ﻣَﻦ ﻗَﺘَﻞَ ﻧَﻔْﺴًۢﺎ ﺑِﻐَﻴْﺮِ ﻧَﻔْﺲٍ ﺃَﻭْ ﻓَﺴَﺎﺩٍ ﻓِﻰ ٱﻷَْﺭْﺽِ ﻓَﻜَﺄَﻧَّﻤَﺎ ﻗَﺘَﻞَ ٱﻟﻨَّﺎﺱَ ﺟَﻤِﻴﻌًﺎ ﻭَﻣَﻦْ ﺃَﺣْﻴَﺎﻫَﺎ ﻓَﻜَﺄَﻧَّﻤَﺎٓ ﺃَﺣْﻴَﺎ ٱﻟﻨَّﺎﺱَ ﺟَﻤِﻴﻌًﺎ ۚ ﻭَﻟَﻘَﺪْ ﺟَﺎٓءَﺗْﻬُﻢْ ﺭُﺳُﻠُﻨَﺎ ﺑِﭑﻟْﺒَﻴِّﻨَٰﺖِ ﺛُﻢَّ ﺇِﻥَّ ﻛَﺜِﻴﺮًا ﻣِّﻨْﻬُﻢ ﺑَﻌْﺪَ ﺫَٰﻟِﻚَ ﻓِﻰ ٱﻷَْﺭْﺽِ ﻟَﻤُﺴْﺮِﻓُﻮﻥَ

अर्थात

"ज्याने एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरविण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.'' परंतु त्यांची अवस्था अशी आहे की आमचे प्रेषित वरचेवर त्यांच्यापाशी उघड उघड आदेश घेऊन आले तरीसुद्धा त्यांच्यात मोठ्या संख्येने पृथ्वीवर अतिरेक करणारे लोक आहेत.

(सुरे अलमाईदा आयत क्र. 32)

∆ म्हणून स्पष्ट आहे, या दोन लोकांचे कृत्य हे व्यक्तिगत कृत्य असून, ते कुठल्याही दृष्टीने समर्थनीय नाही.

∆ या घटनेमुळे राजस्थानमध्येच काही वर्षापूर्वी घडलेल्या एका दूसर्‍या हत्येच्या घटनेची आठवण झाली. ज्यात शंभुलाल रेगर नावाच्या एका माथेफिरूने निरपराध मुस्लिम मजुराची अशीच निर्घृण हत्या करून त्यानेही व्हिडीओ बनविला होता.

∆ देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सभ्य नागरिकाने अशा आजारी मानसिकता असलेल्या प्रत्येक माथेफिरूचा निषेध करायला हवा मग तो कोणत्याही धर्माचा असो. तेंव्हाच आपण एक राष्ट्र म्हणून समर्थपणे उभे राहू शकू.

🇮🇳 जय हिंद !

Updated : 29 Jun 2022 8:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top