Home > M marathi blog > विधवा कुप्रथा बंदीचे स्वागत करतांना........

विधवा कुप्रथा बंदीचे स्वागत करतांना........

Widow welcoming the ban on evil practices ........


महाराष्ट्र हे प्रगतीशील विचारांचे राज्य आहे याची प्रचिती पुन्हा एकदा देशाला आली आहे.अनेक वर्षापासून सुरु असलेली विधवा कुप्रथा बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेवून कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या गावाने इतिहास रचला आहे.त्यांचाच आदर्श घेवून अमरावती जिल्ह्यातील कसबेगव्हाण या गावाने सुध्दा असाच निर्णय घेवून अशा समाजशील निर्णयांची देशाला नितांत गरज आहे हे दाखवून दिले आहे.या पुरोगामी निर्णयाबद्दल दोन्ही गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रा.प.सदस्य व समस्त गावकऱ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! यानंतर महाराष्ट्रातील अनेक गावात हा सुधारणावादी निर्णय घेतला जाईल व विधवा कुप्रथा पूर्णपणे संपुष्टात आणली जाईल अशी आशा करु या.शेकडो वर्षापासून स्त्रियांवर अन्याय,अत्याचार करणारी व स्त्रियांचे समाजातील बरोबरीचे स्थान नाकारणारी ही दुष्ट प्रथा धर्म व धर्मग्रंथाचा आधार घेवून भारतात सुरु आहे.स्त्रियांना हीन लेखणाऱ्या अशा अनेक प्रथा आपल्या देशात सुरु होत्या व आजही काही सुरुच आहे.आमच्या समाजसुधारकांनी मोठा संघर्ष करुन अनेक घातक प्रथा,परंपरा बंद केल्या व स्त्रियांना सन्मानाचे जीवन बहाल केले.अनेक महिलांनी स्वतःहून अशा चुकीच्या प्रथा नाकारुन धर्मग्रंथांचे नियम झुगारुन दिले.राष्ट्रमाता जिजाऊ,महाराणी ताराबाई व अहिल्याबाई होळकरांनी त्या काळात आपल्या पतीच्या निधनानंतर सती न जाता उत्कृष्टपणे राज्यकारभार सांभाळला व अशा कुप्रथा निर्मुलनाची सुरुवात केली.त्यानंतर महात्मा फुले,सावित्रीबाईंनी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला व पती निधनानंतर महिलांचे केशवेपन बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानमधे अशा प्रकारचे अनेक परिवर्तनवादी निर्णय घेतले.बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून अशा अनेक अघोरी प्रथांना पायबंद घातला.त्यामुळे आज महिलांना बऱ्यापैकी स्वातंत्र्याचा आस्वाद मिळत आहे.

प्रत्येक धर्माने पुरुषांच्या तुलनेत महिलांना हीन लेखून त्यांचे हक्क आणि अधिकार नाकारले आहेत.आजही सर्वच धर्मात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा सन्मान व अधिकार नाही.धर्माचा आधार घेवून व धर्मग्रंथांचे संदर्भ देवून स्त्रियांना समानतेचा अधिकार नाकारला जातो व त्यांना धार्मिक गुलामगिरीत अडकविले जाते.याकरीता सर्व धर्माचे धर्मगुरु कारणीभूत असून स्वतःचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याचे दुष्कृत्य सर्व धर्माचे धर्ममार्तंड करीत आहे.त्यामुळे जोपर्यंत महिला स्वतःहून पुढाकार घेवून या दुष्ट धर्ममार्तंडांच्या विरुध्द पेटून उठणार नाही तोपर्यंत मोठे परिवर्तन होणार नाही.आजही अनेक धार्मिक स्थळी महिलांना प्रवेश नाही.सुप्रीम कोर्टाच्या आदेशालाही पुरोहीत वर्ग मानायला तयार नाही.महिलेच्या पोटातून जन्म घेणारे धर्माचे ठेकेदार जर महिलांनाच अपवित्र समजत असेल तर सर्वात आधी या नालायकांवर बहिष्कार टाकला पाहिजे.तरच महिलांना समानतेचा हक्क मिळू शकतो. त्याचबरोबर महिलांना तुच्छ व कनिष्ठ लेखणाऱ्या अनेक प्रथांचे समर्थन आणि उदात्तीकरण करण्यात महिलाच अग्रेसर असतात हे खेदाने म्हणावे लागते.महिलांना अशा वाईट व अपमानजनक प्रथा उराशी बाळगण्यात फार मोठेपणा वाटतो.आम्ही किती संस्कृती रक्षक व धर्माचे पालनहार आहोत हे त्यांना दाखवायचे असते.म्हणूनच पतीच्या निधनानंतर आधीच प्रचंड दुःखी असलेल्या त्या महिलेचे कुंकू पुसण्यासाठी,मंगळसूत्र काढण्यासाठी, बांगड्या फोडण्यासाठी,जोडवे काढण्यासाठी महिलांचीच खूप घाई असते.आपल्याच एका भगिनी सोबत दुःखाच्या क्षणी असे निर्दयपणे वागतांना महिला जराही डोक्याने विचार का करत नाही ? त्यामुळे धर्मातील अशा कुप्रथांचे वाहक असण्यात महिलांचा मोठा वाटा आहे.म्हणूनच गावागावात प्रबोधनाचा वेग वाढविणे व अशा अनिष्ट चालीरीती,प्रथा,परंपरा यांच्यावर संतविचारांचा आधार घेवून जोरदार प्रहार करणे अत्यावश्यक आहे.

कोल्हापूर आणि अमरावती जिल्ह्याचे महत्त्व खूप वेगळे आहे.कोल्हापूरात राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या पुरोगामी विचारांनी फार मोठी क्रांती घडवून आणली आहे.सर्वांना सामाजिक न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते.म्हणूनच त्यांना सामाजिक लोकशाहीचे प्रणेते म्हणून गौरविले जाते.अमरावती जिल्हाही कर्मयोगी गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व डाॕ.पंजाबराव देशमुख यांच्या विचारांमुळे परिवर्तनाच्या बाबतीत सदैव अग्रेसर राहिला आहे.त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याची प्रेरणा घेवून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने जर हा समाजशील निर्णय घेतला तर खऱ्या अर्थाने शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ख्याती देशभरात आणखी वाढेल.त्यासाठी महिला संघटनांनी सुध्दा पुढाकार घेणे गरजेचे आहे.तसेच आपल्याच कोशात बंदिस्त असलेल्या सुशिक्षित व नोकरदार महिलांनी सुध्दा महापुरुषांचे आपल्यावर असलेल्या उपकारांची जाणीव ठेवून घराच्या बाहेर पडले पाहिजे व महिलांमधे जागृती निर्माण केली पाहिजे.तरच आपल्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग होईल.हे काम फक्त सरकारचे नसून जर आम्ही स्वतःला सुशिक्षित व जागृत नागरीक समजत असेल तर आधी हे काम आमचे आहे.आमच्या घरातून आम्हाला या परिवर्तनाची सुरुवात करावी लागेल.तरच सावित्रीबाईंनी आमच्यासाठी घेतलेल्या कष्टाचे सार्थक होईल.अन्यथा शिक्षण घेवून आम्ही दगडच राहिलो असा त्याचा अर्थ होईल.जोपर्यंत समाज म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडत नाही,तोपर्यंत सरकारच्या प्रयत्नांना फारसे यश मिळत नसते.म्हणून विधवा कुप्रथेसारख्या महिलांची मानहानी करणाऱ्या ज्या अनेक घाणेरड्या प्रथा,परंपरा आहेत,त्याचा पूर्णपणे नायनाट करणे हीच खरी महिलांच्या समानतेची व स्वातंत्र्याची नांदी ठरेल.जोपर्यंत विधवा महिलांना सुध्दा इतर महिलांप्रमाणे सर्व सामाजिक,धार्मिक कार्यात आदराचे,सन्मानाचे स्थान मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही सुशिक्षित व पुढारलेलो आहोत असे म्हणण्याचा आम्हाला कोणताही नैतिक अधिकार नाही.आधुनिक भारत निर्माण करायचा असेल तर असे सुधारणावादी निर्णय संपूर्ण देशभरात घेतले जाणे ही आजची गरज आहे.

प्रेमकुमार बोके

अंजनगाव सुर्जी

४ जून २०२२

Updated : 4 Jun 2022 7:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top