Home > M marathi blog > प्राधान्य क्रम बदलायला पाहिजे होता !

प्राधान्य क्रम बदलायला पाहिजे होता !

The order of priority should have changed!

संपादक - 9421302699

कोरोनाची तीव्रता कमी होवून एक वर्ष होत आले आहे.कोरोनाच्या काळात ज्या महाभयानक संकटाला आपणा सर्वांना सामोरे जावे लागले त्याची कल्पना जरी केली तरी अंगावर शहारे येतात.असंख्य माणसे आपल्या डोळ्यासमोर तडफडत मरण पावलेली आपण सर्वांनी पाहिलेली आहेत.दवाखान्यात बेड मिळत नाही म्हणून,आॕक्सिजनचे सिलेंडर नाही म्हणून,इंजेक्शन उपलब्ध नाही म्हणून किंवा व्हेंटिलेटरची कमतरता आहे म्हणून अनेकांचे नातेवाईक,मित्र,शेजारी नजरेसमोर जग सोडून जातांना पाहून प्रत्येकाची अवस्था अतिशय हतबल,दुःखी आणि असहाय झाली होती.गरीब असो की श्रीमंत कोणीच यामधून सुटू शकले नाही.ज्यांच्याकडे प्रचंड पैसे होते,त्यांनाही बेड उपलब्ध न होवू शकल्यामुळे दवाखान्याच्या आवारात पाय घासून प्राण सोडावे लागले.कोरोना समोर पैसाही काम करु शकला नाही एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती.जात-धर्म,पंथ,पक्ष या गोष्टींना कवडीचीही किंमत नव्हती.माणूस,माणूसकी आणि मानवता या गोष्टी त्या काळात सर्वात जास्त महत्वाच्या होत्या.म्हणूनच जातीधर्माची बंधने तोडून एकमेकांना सहकार्य केल्याची असंख्य उदाहरणे आपण त्या काळात पाहिली.अनेक लोकांची प्रेते गंगेत तरंगतांना पाहून देश सुन्न झाला होता.शेकडो किलोमीटर अंतर पायी चालतांना झालेले वेदनादायी मृत्यू सर्वांनी पाहिले.प्रत्येक व्यक्ती भयग्रस्त मानसिकतेमधे जगत होता.कोणाच्याच आयुष्याचा भरवसा राहिला नव्हता. अशा भयावह अवस्थेतून आता कुठे हळूहळू परिस्थिती थोडीफार जाग्यावर येतांना दिसत आहे.

इतके सगळे भीषण आणि भयानक चित्र प्रत्येकाने प्रत्यक्षपणे अनुभवले असतांना आमच्या वेदना,संवेदना,भावना,माणूसकी निश्चितच जागृत झाल्या असेल असे वाटत होते.आता आमचे प्राधान्य क्रम बदलले असतील असे वाटले होते.आता लोकांच्या मागण्या खूप वेगळ्या असतील असे मनात वाटत होते.लोक यापुढे दवाखान्यासाठी राजकीय नेत्यांवर दबाव आणतील असे वाटायला लागले होते.आॕक्सिजन प्लाॕंट उभे करण्यासाठी सरकारजवळ मागणी करतील असे वाटले होते.आरोग्याच्या सुविधा,डाॕक्टर्स,वैद्यकीय उपकरणे,दवाखान्याच्या सुसज्ज इमारती या गोष्टींना भारतातील जनता प्राधान्य देईल असे वाटत होते.परंतु असे काहीच होतांना दिसत नाही.जनता कुठेही या गोष्टींसाठी सरकार सोबत भांडतांना किंवा रस्त्यावर उतरतांना दिसत नाही.राजकीय नेत्यांच्या भावना तर बोथट आणि बधीर झाल्याच आहेत, पण जनता त्याहीपेक्षा मुर्दाड आणि मृतप्राय झाल्यासारखी भासत आहे.कारण आपले जीवन जगण्याचे प्रश्न सोडून देशात सध्या धार्मिक उन्माद शिखरावर पोहचला आहे.भोंगे वाजवायचे की नाही,हनुमान चालीसा म्हणायची की नाही,अयोध्येला जायचे की नाही,मंदिर की मस्जिद या निरर्थक प्रश्नांनी देश ढवळून निघत आहे.२४ तास इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर या धर्मांध गोष्टींचा मारा सुरु आहे आणि जनताही कोरोनाची भयावह अवस्था विसरुन या फालतू गोष्टीत सहभागी होतांना दिसत आहे.एका वर्षात आम्ही इतके संवेदनाहीन कसे बनलो हा प्रश्न मेंदूला झिणझिण्या आणणारा आहे.आमच्या भावना मेलेल्या आहेत असे आता वाटायला लागले आहे.एक वर्षापूर्वी कोरोनामधे एकमेकांना मदत करणारी हिंदू-मुस्लिम माणसे आज पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे घृणास्पद कृत्य देशात सुरु आहे ही चीड आणणारी बाब आहे.

राजकीय पुढाऱ्यांनी अमानवीयतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.त्यांचे हात आणि अधिकार दवाखान्याच्या उभारणीसाठी लागण्याची गरज असतांना ते भोंगे,चालीसा,अयोध्या यावर वेळ खर्ची घालून जनतेला मूर्ख बनवत आहे.देशाला अराजकतेकडे नेण्याचा हा कुटील डाव आहे.एक दिवस हे राजकीय नेते या देशाची अवस्था श्रीलंकेसारखी करतील असे आता निश्चितपणे वाटत आहे.कारण जनहिताच्या कोणत्याच प्रश्नाला यांचे प्राधान्य नसून धर्माचे प्रश्न यांच्यासाठी सर्वात महत्वाचे ठरले आहे.देशापेक्षा जेव्हा धर्म मोठा होतो,तेव्हा देशाचा तालिबान होतो आणि त्याच दिशेने आमची वाटचाल सुरु आहे.कारण मानवतेला प्राधान्य द्यायचे सोडून अमानुषतेला जिथे सर्वोच्च स्थान आहे,तो देश विनाशाकडे वाटचाल करीत आहे हे समजून घ्यावे.आमच्याच हाताने आम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी व्देषाची आणि विषाची पेरणी करुन त्यांचे भवितव्य अंधकारमय करीत आहोत.

कोरोनातून आम्ही खूप काही शिकू आणि जातीधर्माच्या भिंती पाडून केवळ माणूस म्हणून एकत्र नांदू असे वाटत होते.परंतु झाले उलटेच ! एका वर्षाच्या आतच आम्ही मृत्यूचे भयाण तांडव विसरलो आणि पुन्हा जातीधर्माची,मंदिर-मशिदीची दुकाने उघडून बसलो.लोकांना जातीधर्माच्या जहरी खाईत ढकलायला लागलो. आमच्या भावना,संवेदना,माणूसकी मेल्याची ही चिन्हे आहेत.माणूस म्हणवून घेण्याचे अधिकार आणि हक्क आम्ही गमावले आहेत.राजकीय नेत्यांच्या सुरात सुर मिसळून त्यांच्या कुत्सित धर्मांध विचारांना साथ देणारे आम्ही देशद्रोही आहोत.देशासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आ वासून उभे असतांना ज्या लोकांना अजूनही मंदिर-मशिदीचे राजकारण महत्वाचे वाटते, ते लोक या देशाच्या विकासाच्या आड येणारे देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत.त्यांच्यामुळेच देशाची दिवसेंदिवस अधोगती होत चालली आहे.तेव्हा प्राधान्य क्रम कोणता असला पाहिजे यावरच उद्याच्या भारताचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

प्रेमकुमार बोके

अंजनगाव सुर्जी

२१ मे २०२२

Updated : 2022-05-21T15:28:20+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top