Home > M marathi blog > मोदींना धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता सज्ज

मोदींना धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता सज्ज

The Indian people are ready to teach Modi a lesson

जाकीर हुसेन - 9421302699भारतीय लोकशाही ही तिच्या गुण-दोषांसकट देशातील जनतेच्या आस्थेचा विषय आहे. देशातील बहुविधतेच प्रतिबिंद या व्यवस्थेतून प्रतीत होतं. आपल्या लोकशाहीत सर्व समाजघटकांचा आवाज उमटतो. पण, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यावर हे चित्र विद्रूप व्हायला सुरुवात झाली. मोदीप्रणीत केंद्र सरकारने तिचे काढलेले धिंडवडे जनतेसमोर आहेतच. 'अच्छे दिन' नारा घेऊन आलेलं त्यांचं सरकार प्रत्यक्षात मात्र सर्व स्तरांवर अपयशी ठरलं. त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या गाजरावर जनताही काही काळ झुलत राहिली. पण, मोदींच्या लंब्याचौड्या बातांमधला फोलपणा लक्षात आल्यानंतर समाजातून विरोधाचा सूर उमटू लागला. मोदींच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात तर विरोधाची ही धार अधिक तीव्र झाली आहे. निखळ बहुमताच्या जोरावर सत्तेवर आलेलं भाजप सरकार कर्तव्याबाबत मात्र सपशेल अपयशी ठरलं. आता जनतेनं आपले प्रतिनिधी निवडावेत, ते सत्याच्या कसोटीवर पारखूनच. त्यासाठीच मोदी सरकारने केलेल्या शेकडो चुकांचा पाढा वाचणं क्रमप्राप्त बनतं. या छोटेखानी पुस्तकातून याच चुकांचा आढावा घेण्यात आला आहे.

डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसने उभारलेला विकासाचा डोलारा मोदींच्या अदूरदर्शी कारकिर्दीत कोसळला. पण, ५६ इंची छातीच्या बाता मारणाऱ्या मोदींनी आश्वासनांचे इमले मात्र जरुर बांधले. 'रोगापेक्षा इलाज भयंकर' असा प्रकार त्यांनी नोटबंदी राबवताना केला. त्यामुळे ना भ्रष्टाचार कमी झाला ना दहशतवाद. शंभराहून अधिक नागरिक हकनाक प्राणांना मुकले. रोजगार बुडाले. २००८ च्या मंदीतही तग धरून राहिलेली भारतीय अर्थव्यवस्था नोटबंदीच्या तुघलकी निर्णयामुळे रुग्णशय्येवर पडली. मोदी आपल्या भांडवलदार मित्रांचे हितसंबंध जपण्यासाठी कुठल्या थराला गेले, हेही आपण राफेल विमानखरेदी घोटाळ्यातून पाहतोच आहोत. मोर्दीच्या पांढऱ्याशुभ्र कुर्त्याला भ्रष्टाचाराचे अस्तर आहे, हे अनेक प्रकरणांतून समोर आलं आहे. त्यांच्या आशीर्वादातून देशभरात धार्मिक उन्माद भडकवण्याचं काम नेटाने सुरू आहे. जनकल्याणाचे घटनादत्त काम करण्याऐवजी मोदी गायी आणि मंदिरांचे राजकारण करत आहेत. झुंडवळीच्या घटना वाढल्यामुळे अल्पसंख्याकांना सुरक्षिततेच्या चिंतेनं ग्रासलं आहे. त्यांच्या बेबंद आणि एककल्ली कारभारामुळे सर्वच समाजघटकांत भिती आणि नैराश्याचा अंधःकार दाटून आला आहे. शिशुपाल हे महाभारतातलं एक महत्त्वाचं पात्र. भगवान श्रीकृष्णाने आपल्या आत्याला म्हणजे शिशुपालाच्या आईला वचन दिलं होतं, याचे 'शंभर अपराध मी माफ़ करीन. ते झाले की, याच्या पापांचा घडा भरलाच म्हणून समज'. जनतेनेही सोशिकपणे मोदींचे शेकडो अपराध आपल्या पोटात साठवले आहेत. शिशुपालाप्रमाणेच त्यांच्याही चुकांचा घडा असाच भरला आहे. निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. मोदींना धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता सज्ज आहे.

Updated : 5 Jun 2022 11:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top