Home > M marathi blog > #इस्लाम_संबंधीचे_गैरसमज

#इस्लाम_संबंधीचे_गैरसमज

#Misconceptions_of_Islam

#इस्लाम_संबंधीचे_गैरसमज
X

#इस्लाम_संबंधीचे_गैरसमज


✍🏽एम.आय.शेख

♦️विचारस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते सुद्धा इस्लाम वर टीका करताना इस्लाम संबंधी चर्चा करण्यास मात्र तयार होत नाहीत. त्याचे कारण म्हणजे इस्लाम संबंधीचे गैरसमज. गैरसमज दोन प्रकारचे आहेत. एक खरे गैरसमज दूसरे खोटे गैरसमज. गैरसमज खोटे कसे असू शकतात? तर त्याचे उत्तर असे आहे की, इस्लाम हे सत्य आहे हे माहीत असूनही त्याचा स्वीकार केल्यास आपले उत्पन्नाचे मार्ग बंद होतील म्हणून त्याचा विरोध करावा हा खोटा गैरसमज. खरा गैरसमज मात्र इस्लाम संबंधी माहितीच्या अभावा मुळे निर्माण झालेला आहे.

♦️ पहिला गैरसमज असा की, इतर धर्माप्रमाणे हा एक धर्म आहे आणि त्याचा संबंध त्याच्या अनुयायांच्या वैयक्तिक जीवनाशी आहे; समुह जीवनाशी त्याचा काहीएक संबंध नाही. हा समज एवढा व्यापक आणि घट्ट रूजलेला आहे की, अनेक मुस्लिम सुद्धा याच विचाराचे आहेत. अनेकांना असे वाटते की, मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म झाला की तो मुसलमान झाला. हे अर्धसत्य आहे. कोणी हे लक्षात घ्यायला तयारच नाही की, मुस्लिम होण्यासाठी फक्त मुस्लिम कुटुंबात जन्म घेणे पुरेसे नाही तर इस्लामला जाणूनबुजून धारण करावे लागते. ही बाब लक्षात न आल्याने अनेकजण जन्मभर नावापुरतेच मुसलमान राहतात. दुर्दैवाने आपल्या देशात अशाच मुसलमानांची संख्या जास्त आहे. हिंदू धर्मात जो ज्या जातीत जन्माला तो त्या जातीचा असे मानले जाते तसेच मुस्लीम कुटुंबात जन्मला की तो मुसलमान असे मानण्यासारखा हा प्रकार आहे.

म्हणूनच अनेक मुसलमान, "धर्म अफूची गोळी आहे" असे म्हणणार्‍या साम्यवादी पक्षात जाऊन स्थिरावलेले आहेत. अनेकांनी हराम समजल्या जाणार्‍या अश्‍लिल सीनेउद्योगात मुस्लिम नाव आडवे येत असल्याने ते बदलून इतर नाव धारण केलेले आहेत. अनेकांनी बिगर मुस्लिम स्त्रियांशी लग्न करून बाकायदा मूर्तीपूजा सूरु केली आहे व करत आहेत. काहींनी तर फक्त मुस्लिम सदृश्य नाव कायम ठेऊन इस्लामविरूद्ध आचरण सुरू केले आहे.

♦️ मुस्लिम होण्यासाठी मुस्लिम सदृश्य नाव असणे किंवा फक्त काही उपासणा नित्यनियमाणे करत राहणे हे जरी पुरेसे असले तरी एवढ्यावरच समाजाधान माणने इस्लामला मान्य नाही. हे बहुसंख्य मुस्लिमांनी लक्षातच न घेतल्याने मोठा गोंधळ उडालेला आहे.

♦️ वास्तविक पाहता इस्लाम फक्त एक धर्मच (रिलीजन) नसून ती एक जीवनपद्धती (निजाम/व्यवस्था) आहे. तो रंजल्या गांजलेल्यांचा सर्वात मोठा कैवारी आहे. तो आपल्या अनूयायांना अन्याय व अत्याचाराविरूद्ध ठामपणे उभे राहण्याची शिकवण देतो. तोपर्यंत जोपर्यंत अन्याय व अत्याचाराचा नायनाट होत नाही. त्यासाठी यथाशक्ती निरंतर प्रयत्न करण्याची शिकवण देतो. यालाच जिहाद म्हणतात. आयएसआयएस, बोकोहाराम इत्यादी संघटनांच्या हिंसक कारवायांना जिहाद म्हणत नाहीत, हे बहुतेकांच्या लक्षातच येत नाही. निरपराध लोकांच्या विरूद्ध नियोजित हिंसेचा वापर करून स्वतःचा राजकीय हेतू साध्य करणे व त्याला जिहाद म्हणणे हा इस्लाम नव्हे, इस्लामला हे मान्य नाही. हे ही कोणी समजून घ्यायला तयार नाही. एवढेच नव्हे तर मानवतेला हानी पोहोचविणार्‍या सर्व रूढी, परंपरांचा नायनाट करण्याची इस्लाम शिकवण देतो. अंधश्रद्धेला इस्लाममध्ये थारा नाही. कुटुंब व्यवस्थेला अस्थिर करणार्‍या गोष्टींना इस्लाम, "नाजायज" घोषित करून त्याचा वापर प्रतिबंधित करण्याचे इस्लामी शासकाला निर्देश देतो.

♦️व्याज ही समग्र आर्थिक समस्यांची जननी असल्याकारणाने त्याला हराम घोषित करतो व जकात देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतो. थोडक्यात इस्लाम फक्त व्यक्तीगत बाब नाही तर तो व्यक्तीगत आचरणासहीत समूह जीवनाच्या नियमानाचेही काम करतो. मानव समुहाच्या जीवनाला प्रभावित करणार्‍या प्रत्येक पैलूसाठी इस्लामने आचारसंहिता दिलेली आहे व ताकीद केलेली आहे की, जे लोक याचे पालन करणार नाहीत ते यशस्वी होणार नाहीत. ईश्‍वराची कृपा त्यांना प्राप्त होणार नाही. ईश्‍वराच्या कोपाचा त्यांना भागीदार व्हावे लागेल. समाजाला व स्वतःला हानी सहन करून त्याचे मुल्य चुकवावे लागेल.

♦️सारांश मानवी जीवनाशी संबंधित कोणताच पैलू असा नाही ज्यासाठी कुरआनमध्ये निर्देश दिलेले नाहीत. गरज आहे ती हे सर्व निर्देश जाणून घेण्याची व प्रत्यक्षात आचरणात आणण्याची.

♦️ दूसरा गैरसमज असा की इस्लाम एक असा धर्म आहे ज्याची स्थापना 1443 वर्षापूर्वी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अरबस्थानात केली. असाही एक व्यापक गैरसमज समाजामध्ये रूजलेला आहे

परंतू असे नाही. वास्तविक स्थिती अशी आहे की या पृथ्वीवर पहिल्यांदा पाय ठेवणारे हजरत आदम अलै. (अ‍ॅडम) हे पहिले प्रेषित असून, ते जन्नत मधून मुस्लिम म्हणूनच पृथ्वीवर पाठविले गेले. ज्यांचे आगमन श्रीलंके मध्ये झाले. त्यानंतर हजारो वर्षांच्या पृथ्वीच्या ज्ञात अज्ञात इतिहासात जवळ-जवळ 1 लाख 24 हजार पैगंबर पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात येऊन गेले. प्रेषित मुहम्मद सल्ल. हे इस्लामचे संस्थापक नसून शेवटचे प्रेषित आहेत. ईश्‍वराने त्यांच्यावर कुरआनचे अवतरण करून मानवी जीवनाची आचारसंहिता संपूर्ण झाल्यामुळे प्रेषित पाठविण्याचा सिलसिला बंद केलेला आहे. आता प्रलयांपर्यंत कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. हेच मानवतेचे अंतिम मार्गदर्शक असून, या मार्गदर्शनाचा अव्हेर करणारे मग मुस्लिम असोत का बिगर मुस्लिम निश्‍चितपणे अयशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून जे या मार्गदर्शनाचा स्वीकार करतील तेच यशस्वी होतील हे ओघानेच आले. माझे हे मत व्यक्तीगत नसून कुरआनच्या शिकवणीवर आधारित आहे. ईश्‍वराने कुरआनमध्ये फरमाविले आहे की, "अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या 'दीन'पासून दूर जाऊन जे विभिन मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही.

(सुरे आलेइमरान आयत नं:19).

♦️ वर नमूद आयात इतकी स्पष्ट आहे की, यानंतर इतर धर्माचा विचार करण्याची शक्यताच शिल्लक राहत नाही. ही एक जीवन जगण्याची ईश्‍वरीय, त्रुटीविरहित, परीपूर्ण व्यवस्था आहे. या व्यवस्थेशिवाय इतर व्यवस्थेच्या आधीन राहून जीवन जगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते अयशस्वी झाले व आजही होत आहेत व भविष्यात ही होतील याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. जे लोक केवळ भौतिक साधन सामुग्रीला यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली समजतात त्यांचा समज त्यांना लखलाभ असो. इस्लाममध्ये मात्र व्यक्तीगत जीवन आणि सामुहिक जीवन तसेच भौतिक जीवन आणि नैतिक जीवन यांच्यात फारसा फरक नाही. या सर्व गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. या सर्वांची व्याख्या कुरआनमध्ये केलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंमलबजावणीची पद्धतही शरीयतमध्ये ठरवून दिलेली आहे. ईशभय मनात बाळगून प्रत्येक काम केल्यास स्वतःच्या कल्याणासह समाजकल्याणही सहज साध्य करता येते, हा या व्यवस्थेचा गाभा आहे.

♦️ इतर धर्मात असल्या प्रमाणे इस्लाम मध्ये सुद्धा धर्म वेगळे व राजकारण वेगळे आहे अशी विभागणी आहे, असा तिसरा गैरसमज आहे. वास्तविक पाहता इस्लाम मध्ये धर्म सोडून राजकारण करण्याची मुभा नाही. भारतात बहूतेक धार्मिक वृत्तीचे मुस्लिम लोक राजकारणाला बहिष्कृत वृक्ष असल्यासारखे वागतात.त्यांचे हे वर्तन बिगर इस्लामी आहे. मुल्याधारित राजकारण व त्याद्वारे स्थापन झालेले सरकार व इस्लामी मार्गदर्शनाप्रमाणे केले गेलेले शासन हे जनकल्याणासाठी उपयुक्त असल्याचे प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्यानंतर आलेल्या चार पवित्र खलीफांनी आपल्या शासनाद्वारे अरबस्थानामध्ये सिद्ध करून दाखविलेले आहे. हा इतिहास आहे; काल्पनिक कथा नाही.

♦️ यानंतर मात्र दुर्भाग्य असे की, आज आंतरराष्ट्रीय मुस्लिम उम्माह पैकी बहुसंख्यांना या पवित्र शासनप्रणालीचा विसर पडलेला असून काही धार्मिक विधींचा अवलंब करून बाकी राजकारणातून धर्माला निवृत्त केले गेले आहे. त्यामुळेच जग मानवकल्याणाला मुकलेले आहे.

♦️56 मुस्लिम देशांपैकी एकाही देशात इस्लामला आवडणारी व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी यशस्वीपणे राबविलेली शासनपद्धती शुद्ध स्वरूपात नसावी व तेथेही तीच मानवतेला काळीमा फासणारी भांडवलशाही शासन पद्धती असावी, यापेक्षा मोठे दनर्दैव ते कोणते?

♦️ जगातून अन्याय आणि अत्याचाराच्या निर्मुलनासाठी तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तीगत आणि सामुहिक जीवनामध्ये इस्लामी जीवनपद्धतीचा अवलंब केल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रश्‍न फक्त एवढाच आहे की हानी सहन करून ती पद्धत अवलंबवयाची की बिगर हानी सहन करून.

∆ या खेरीज अनेक छोटेमोठे गैरसमज आहेत उदा मुसलमान चार लग्न करतात, त्यामुळे जास्त मूलं जन्माला येतात. हिंसक असतात, देशाशी एकनिष्ठ नसतात, कट्टरपंथी असतात, दूसऱ्यांचा द्वेष करतात, महिलांना डांबून ठेवतात, त्यांच्या वर अत्याचार करतात इत्यादी. या सर्व खोट्या गोष्टी आहेत मात्र एका लेखात त्या सर्वांवर विवेचन करणे शक्य नाही म्हणून महत्वाच्या अशा दोन गैरसमजांबाबत विवेचन करून थांबतो.

♦️लक्षात ठेवा मित्रानों ! इस्लाम हीच सर्वश्रेष्ठ कृपा आहे.

Updated : 2022-04-08T12:02:51+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top