Home > M marathi blog > जरा पळून जावा की!

जरा पळून जावा की!

Just run away!


----------------------------------------------

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

8080532937.

----------------------------------------------

वेदना नो साऱ्या पळून जावा की!

दुःखा नो साऱ्या वितळून जावा की!

रिकाम्या दरवाजावरील"कफल्लक" हाताला पाहून,

भ्रमिष्ट मनातील "संक्रमित" तक्रारिनो जरा

पळून जावा की!

गरिबीची चूल सांजची सकाळी भाकरी

खाण्यासाठीच असते!

नोकरीचा पगार घेऊन देखील भ्रष्टाचार

करणाऱ्यानो जरा पळून जावा की!

शेतकऱ्याच्या गरजेपोटी,

गहाणखत सावकाराकडे ठेवणाऱ्या,

शेतकऱ्याची जमीन "खरेदी खत" म्हणून,

ठेवून घेऊन शेतजमिनीची

ढापाढापी करणाऱ्या सावकारानो

जरा पळून जावा की!

शेती उत्पादित मालाला हमी भाव नसल्याचे

कारणाने,अखंड कर्जाच्या खाईत डूबनवणारे,

श्रीमंत व्यापारी,साखर सम्राट, सहकार सम्राट,

आणि यांचे नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांनो

जरा पळून जावा की!

अखंड पिढीजात झोपडपट्टी अतिक्रमण

अनं त्यात रहाणारे झोपडपट्टीवासीय,

ना तेथील रस्त्यांची सुविधा,

ना गटारांची स्वच्छता ना

मा कधी वेळेत पिण्याचे पाणी येते.

अशा गलिच्छ अंन घाण वस्तीत दारिद्र्य

अंगावर घेऊन जगणार्‍या नो,जरा पळून जावा की!

सरकारी जागा ढापाढापी करताना,

विद्यापीठ अनुदान आयोगाला,

वर्षाकाठी हजारो कोटींचा चुना लावताना,

ऍडमिशन ला डोनेशनच्या नावाखाली कोट्यावधी रुपये वसूल करताना,शिक्षण सम्राट अशी बिरुदावली लावताना

समाजकारणातून राजकारणातून जाणाऱ्या नो!

जरा पळून जावा की!

तीन पत्ती च्या गुत्यावरती,एक्का दुरी तिरी पिस्ता ना!

देशी-विदेशी अस्सल किक देणारी" गावठी" विकताना

मुंबई,कल्याण च्या मटक्याची पावती फाडताना,

वडाप मध्ये मेंढरासारखे माणसं कोंबून प्रवास करताना,

अशा अनेकांच्या कडून महिन्याकाठी तालुक्याच्या सहाय्यक फौजदाराच नाव सांगून हप्ता वसूल करणाऱ्यांनो,जरा पळून जावा की!

गटातटाचे राजकारण गावात पेटवताना,

भावाला भावा च्या विरोधात ग्रामपंचायतला

लढवणाऱ्या मतदान केले नाही म्हणून

शेताच्या बांधावर ती पाणी न देणाऱ्या,

शेतातून जाण्यासाठी वाट न देणाऱ्या,

गावागावात जातीपातीचे राजकारण

पेटवत ठेवणाऱ्या नो!

जरा पळून जावा की!

महसुलातील वसूल करणाऱ्या तालुका तहसीलदार,

बोगस खरेदी-विक्रीची डायरी उताराची नोंद करावयास सांगण्याची शिफारस करणारा,तो मंडलाधिकारी सर्कल,

अन हाताखालच्या कोतवाला कडून,

लाखमोलाचे सातबारा आठ अ डायरी

उतारे काढून देणाऱ्या तलाठ्यांनो!

जरा पळून जावा की!

कायद्याचे अर्धवट ज्ञान असताना

12 इंच छाती फुगून सांगणार्‍या,

गावातील सत्ताधाऱ्यांच्या बाजूने

तालुक्याला रिपोर्ट करणाऱ्या पोलिस पाटलांनो!

जरा पळून जावा की!

शेजारच्या घरात चहा पिण्याचे निमित्त साधून,

सासवा सुना यांच्यात भांडणे लावणाऱ्या काकूंनो,

आपल्या लेकीच्या,उलटून जाणाऱ्या प्रेमाखातर,

लेकीला सतत माहेरी बोलवून

संसार मोडणार्‍या आयानो!

जरा पळून जावा की!

ग्रामपंचायतीची वर्दी आणि साडेतीन पितळेची भांडी,

घरफाळा पाणीपट्टी न दिल्याचे कारणातून,

वर्षाकाठी जप्त करणाऱ्या ग्रामसेवकानो!

ग्रामीण पंचायत राज संस्थेच्या

विविध निधीतून भ्रष्टाचार करणाऱ्या

ग्रामपंचायतीचे पदाधिकारीनो!

जरा पळून जावा की!

गावाच्या पंचायतीच्या समोर असणाऱ्या रिकाम्या पारावरती,शेजारी असणाऱ्या वडाच्या झाडाच्या सावलीखाली,गावातील अनेक भानगडीच्या,

टेलर कामाची माप काढणाऱ्या,

गावातील "दाम्याचा पळून गेलेल्या बैलाच्या"

चर्चेविषयी साऱ्या गावभर खमंग चर्चा

करणाऱ्यांनो,जरा पळून जावा की!

गावातील शाळेवरती कडक इस्त्रीचा

पेहराव करून,बे एके बे,शाळेमध्ये शिकवताना,

तालुक्याचे काम आहे असे सांगून,

दिवसभर शाळा सोडून तालुक्याच्या ठिकाणी घुटमळणार्‍या,शाळामास्तरानो,

शिक्षण विस्ताराधिकारी च्या गाडीत

फुकट पेट्रोल टाकताना,

अर्धवट माहिती असणाऱ्या माणसाला

शिक्षण समितीचा अध्यक्ष नेमताना,

शाळा मास्तरांची टाचण वही महिन्याअखेरीस तपासणाऱ्या त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकानो!

जरा पळून जावा की!

नदीकाठावरील शेतकऱ्याच्या शेती पंपाचे

थकित वीज कनेक्शन तोडणार वायरमन,

कोट्यावधीची" वीज चोरी" करून देखील

आमदार म्हणून निवडून जाणाऱ्या वीज चोर आमदारानो!

जरा पळून जावा की!

खरंच वरील सर्व तुम्ही पळून जावा!

घाण आपोआप साफ होईल!

कचरा आपोआप कमी होईल!

गाडीवरचे घंटाचा आवाज कमी येईल!

गावातील वाड्या वस्ती वरती फिरणाऱ्या,

बुलेट वाला पांडबा खाजगी सावकार,

दरमहाहप्ता गोळा करणारा,

पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार.

स्वतःच्या लेकराला इंग्रजी शाळेत घालून,

दुसऱ्याच्या लेकरांना वेळेत शाळा

शिकवायला न येणारा शाळा मास्तर.

सरकारी दवाखान्यातल्या पांढऱ्या डब्यातील गोळ्या हातावर टेकवून पेशंटला कटवणारा तो डॉक्टर.

भाऊबंदकीच रक्तरंजित राजकारण

पेटवणारा तो पुढारी!

काही काळासाठी साऱ्या गावभर,

गावच्या पारावर बसून माप काढणारे

ते टेलर!

खरंच जरा पळून जावा की!

जरा पळून जावा की!

Updated : 16 May 2022 3:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top