Home > M marathi blog > 'गोलपिठा' कवी.नामदेव ढसाळ

'गोलपिठा' कवी.नामदेव ढसाळ

'Golpitha' Poet. Namdev Dhasal


----------------------------------------------------------

संकलन- कवी तानाजी कांबळे.

-------------------------------------------------------

ढसाळांच्या विद्रोहात सर्व गोष्टी "क्षम्य" असतात. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते.

विद्रोही साहित्याची परंपरा जरी जुनी असली तरी खर्‍या अर्थाने या प्रकारच्या साहित्याला, 'मान्यता' हा शब्द बरोबर वाटत नाही, पण 'प्रसिद्धि' नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या पुस्तकाने मिळवून दिली, हे वास्तव आहे. विद्रोही साहित्यात आजही गोलपिठा हा मैलाचा दगड मानला जातो.

नामदेव ढसाळांचे वकीलपत्र घेऊन आम्ही उभे आहोत असे कोणी समजू नये. आणि तशा स्वरूपाचे आरोप आमच्यावर होऊ नयेत अशी अपेक्षा आहे.

गोलपिठामधून नामदेव ढसाळांनी शोषित समाजाची जी वेदना मांडली, ती इतकी अस्सल होती की त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्यास कोणीही धजावणार नाही. त्यांच्या आयुष्यात ज्या विश्वात ते वावरले, तो त्यांचा मुंबईतील फॉकलंड रोडच्या वेश्यावस्तीतील भाग म्हणजे गोलपिठा.

जिथे दारू, मटका आणि रांडबाजी शिवाय कोणी जीवन जगत नाही. जिथे कोंबडं कापावं इतक्या सहजपणे माणसे कापली जातात. जिथे दिवस रात्री सुरू होतो. ढसाळांच्या भाषेतच सांगायचे तर

"मनगटावरच्या चमेली गजर्‍यात कवळया

कलेजीची शिकार उरकून

शेवटच्या बसची वाट पाहणारे बाहेरख्याली लोक"

पदोपदी दिसतात.

जिथे हिजड्यांची शरीरेही भोगली जातात.

जिथे सर्व ऋतू सारखेच असतात.

"येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो

म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून

भागत नाही रे

इथे माण्सालाच माणूस खात असतो

आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपविले जातात रे"

अशा विश्वात, तरूण वयात आजुबाजूचे भयाण जीवन पाहून, अन्याय अत्याचार सहन करून हा एका खाटिकाचा मुलगा कविता लिहायला लागला. सोसलेले अत्त्याचार आग होऊन त्यातून बाहेर पडू लागले.

लेखणी मशाल झाली, ज्यात अख्ख्या विश्वाला जाळून टाकण्याची ताकद होती.त्यामुळे तो ठणकावून म्हणतो

" जिवाचे नाव "लवडा" ठेवून जगणार्‍यांनी

खुशाल जगावे....

मी तसा जगणार नाही "

या विश्वात वावरूनही ढसाळांच्या जाणीवा बोथट झाल्या नाहीत. त्या दिवसेंदिवस धारदार होत गेल्या.

त्या अगतिक झाल्या नाहीत,ज्वलंत झाल्या.

"मी तुला शिव्या देतो,

तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो,तुझ्या संस्कृतीला

शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो

इव्हन मी आईबापांनादेखील शिव्या देतो

बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात

आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत"

या कवितेत शोषणव्यवस्थेला सुरूंग लावण्याची धमक आहे. ती बेधडकपणे सांगते की

"तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी

त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलेय आढी"

हा दिलासा, हे आश्वासन ही कविता देते. त्यामुळे ती जवळची वाटते. स्वत:च्या वेदनेत इतरांना सामावून घेण्याची जबरदस्त ताकद या कवितेत आहे.

"शेटसावकारांची आय झवून टाकावी

नात्यागोत्याचा केसाने गळा कापावा

जेवणातून विष घालावे मूठ मारावी

रांडवाडे वाढवावेत: भाडखाव व्हावे"

पण ती पुढे म्हणते -

" नंतर उरल्यासुरल्यांनी कुणालाही गुलाम करून लुटू नये

नाती न मानण्याचा,

आयभैन न ओळखण्याचा गुन्हा करु नये

आभाळाला आजोबा अन

जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत

गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे

चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे"

इथे ही कविता विश्वात्मक होते.शेटसावकारांची ' आय झवण्याची' भाषा करणारे ढसाळ मला इथे आभाळासारखे वाटतात. इथे ढसाळ एका जातीपुरते मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरते मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरते, एका भाषेपुरते मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरते मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचे होऊन जातात.

त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते.

आणि ती प्रामाणिक असते म्हणून लोभसवाणी असते.

Updated : 28 May 2022 1:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top