पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने उमा नदीवर 29 कोटींचे दोन पुल प्रस्तावित सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव व वाकल येथे भुमिपूजन
Two bridges worth Rs 29 crore are proposed on Uma river at the initiative of Guardian Minister Bhumi Pujan at Kalamgaon and Wakal in Sindevahi taluka
X
चंद्रपूर, दि. 31 जानेवारी : सिंदेवाही तालुक्यात उमा नदीवर पुल नसल्यामुळे नागरिकांना पलिकडच्या गावात किंवा शेतात जाण्यासाठी नदीच्या पात्रातूनच वाहतूक करावी लागते. तालुक्यातील कळमगाव, मुरमाडी, कुकडहेटी, वाकल, जामसाळा, नलेश्वर, मोहाडी, पांगडी आदी गावातील नागरिकांची ब-याच वर्षांपासून पुलाची मागणी होती. या मागणीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने 25 कोटी रुपयांचे दोन पूल उमा नदीवर बांधण्यात येणार आहे. नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते कळमगाव व वाकल येथे दोन्ही पुलाच्या बांधकामाचे भुमिपूजन करण्यात आले.
यावेळी सा.बा. विभाग नागभीडचे कार्यकारी अभियंता श्री. कोठारी, जि.प.सदस्य रमाकांत लोधे, वाकलचे सरपंच राहुल पंचभाई, स्वप्नील कावळे, जामसाळाचे सरपंच गुलाबराव मेंढूलकर, प्रतिष्ठित नागरिक वामनराव सावसाकडे, हरीभाऊ बाहेकर आदी उपस्थित होते.
नागरिकांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कळमगाव येथे 15 कोटी रुपये तर वाकल येथे 14 कोटी रुपये खर्च करून दोन्ही पुल बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पुलांमुळे तालुक्याच्या ठिकाणी येण्याचे अंतर कमी होणार आहे. सद्यस्थितीत मोहाडीवासियांना सिंदेवाहीला येण्याकरीता 14 किलोमीटरचा फेरा मारून यावे लागते. पुलामुळे आठ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. दोन्ही पुलाचे काम दर्जेदार करण्याच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. वाकल आमदार निधीतून महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, ग्रामीण विकास निधीतून सांस्कृतिक सभागृह आणि दलित वस्ती विकास निधीतून बौध्द विहाराचे सौंदर्यीकरण व संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
कळमगाव येथे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, गावांचा विकास करणे आपले कर्तव्य आहे. येथील पुल करण्याची तळमळ सुरवातीपासूनच होती. सुरवातीला पुलासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले होते. आता मात्र वाढीव निधी मंजूर करून 15कोटी रुपये देण्यात आले आहे. तसेच कळमगाव ते इटोली रस्त्याकरीता 50 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून येथे सभागृह बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी 35 लक्ष रुपये उपलब्ध करून दिले जाईल. या सभागृहात गरीब लोकांना कार्यक्रम साजरे करता येतील. तसेच येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण सुध्दा करण्यात येणार आहे.
किन्ही येथे गुरुदेव सांस्कृतिक सभागृहाचे भुमिपूजन करतांना पालकमंत्री म्हणाले, 'माणूस द्या, मज माणूस द्या', असे राष्ट्रसंत सांगून गेले. राष्ट्रसंतांचे विचार हे माणूस घडविणारे असून त्यांनी दिलेला मानवतेचा, समतेचा संदेश या सभागृहातून गेला पाहिजे. जात, पात, धर्म, वंश यापलिकडे जाऊन गावाचे गावपण टिकले पाहिजे. या समाज मंदिराला पुढील वर्षी संरक्षण भिंत करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच येथील तलावाचे कामसुध्दा केले जाईल. किन्ही, मुरमाडी येथे गोसेखुर्दचे पाणी आणून सिंचनाची सोय उपलब्ध करून देऊ. पुढील वर्षी गोटूल बांधकामासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला किन्हीचे सरपंच जनार्दन गावंडे, कळमगावच्या सरपंच मालती अगडे, मुरमाडीचे सरपंच रुपाली रत्नावार, सुनील उत्तेलवार, वामन मगरे, अरुण कोलते, बाबुरावजी गेडाम, सीमा सहारे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.