मुख्याध्यापक हा शाळेचा खरा दर्पण असतो. - चंद्रप्रकाश वाहने
घाटंजी येथे मुख्याध्यापक सहविचार सभेचे आयोजन.
X
घाटंजी:-वसंतराव नाईक सभागृह पंचायत समिती घाटंजी येथे जिल्हा परिषद शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करतांना "मुख्याध्यापक हा शाळेचा खरा दर्पण असतो" जसा मुख्याध्यापक तशी शाळा असते. त्यामुळे मुख्याध्यापकाने वेळेचे बंधन पाळून योग्य वेळी शालेय लेखी कामकाजासह विध्यार्थी विकासाकरिता आपले पूर्णपणे योगदान द्यावे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी चंद्रप्रकाश वाहने यांनी केले.
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. या काळात शाळा बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. पुढील काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्राथमिक स्तरावर २०२६-२७ पर्यंत मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीने निपुण भारत अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत तीन ते नऊ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केंद्रप्रमुख सुनील बोन्डे यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.
सरल पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांचे आधार अपडेशन,संचमान्यता, ई क्लास जमीन, शाळेत राबविले जाणारे वेगवेगळे उपक्रम,निष्ठा प्रशिक्षण,गुणवत्तापूर्ण शिक्षण, समग्र शिक्षा,वाचन विकास,अध्ययन स्तर निश्चिती,शंभर टक्के विध्यार्थी उपस्थिती, प्रभावी अध्यापन,डिजिटल उपकरणांचा वापर,शाळा दुरुस्ती व रंगरंगोटी,समाज सहभाग, इत्यादी विषयावर विस्तार अधिकारी विजयाताई वैध,केंद्रप्रमुख मोहन ढवळे, अशोक सिंगेवार,अविनाश खरतडे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी चंद्रप्रकाश वाहने यांचा शाल श्रीफळ देऊन तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी जि.प.कर्मचारी पतसंस्थेचे संचालक गौतम कांबळे,संजय इंगोले,विठ्ठल राठोड,सुभाष चौधरी,विलास डोमाळे, देविदास चंदावार, गजानन मुळे, सुरेश वरगंटवार, ज्ञानेश्वर पुसनाके, यशवंत जीवने,आदी तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते. केंद्रप्रमुख रवि आडे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.