शासकीय स्वस्त धान्याची खुल्या बाजारात तस्करी
अलकबीर नगर येथे पुरवठा विभाग व सायबर सेलची संयुक्त कारवाई
X
यवतमाळ दि.17 फेब्रुवारी -: सरकारी स्वस्त धान्य दुकानातून गरजू लाभार्थ्यांना वेळेवर अन्नधान्याचा वाटप होत नाही. मात्र सरकारी स्वस्त धान्य दुकानातून वाटप होणारा गहु,तांदूळ खुलेआम बाजारात अवैधरित्या विकल्या जाते हे सर्वश्रृत आहे.असाच प्रकार शहरातील आरटीओ कार्यालयाच्या बाजुला असलेल्या अलकबीर नगर येथील एका खासगी गोदामावर सायबर सेल व अन्न पुरवठा विभाग अधिकार्यांनी टाकलेल्या धाडीत 87 कट्टे गहु,तांदूळ मिळाले असून मिळालेले गहु,तांदूळ अधिकार्यांनी जप्त केला आहे.
अलकबीर नगर येथील तनवीर शहा अलीम शहा वय 28 वर्ष यांच्या मालकीचे असून या गोदामातून शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केल्या जात असल्याची माहिती सायबर सेल व पुरवठा विभागाला मिळाली.सरकारी स्वस्त धान्य दुकानातून या गोदामात गहु,तांदुळाची अवैधरित्या साठवणूक केल्या जात असून, स्वत: गोदाम मालक तनवीर शहा अलीम शहा हा व्यवहार करीत असल्याची माहिती आहे.
अन्न पुरवठा निरीक्षक कहारे व सायबर सेलचे स.पो.नि अमोल पुरी यांनी सदर गोदामात सरकारी गहू,तांदूळ टाटाएस वाहनाद्वारे आणून साठवणूक केल्या जात असल्याची माहिती मिळताच त्यांनी सदर गोदामावर धाड टाकली असता टाटा एस वाहन क्रमांक एम एच 29 टी 4285 मधून भरलेली कट्ट्यासह रंगेहाथ पकडले.
या कारवाईत तनवीर शहा अलीम शहा वय 26 वर्ष रा.अलकबीर नगर यवतमाळ, शुभम विजय लड्डा वय 32 वर्ष राहणार रेणुका मंगलम कार्यालय जवळ, संदीप योगेश बाजपेयी वय 34 वर्ष राहणार रेणुका मंगल कार्यालय जवळ, अंजित कांताराम बुसेवाड वय 21 वर्ष राहणार साई मंदिर जवळ, मनोज छेदीलाल जयस्वाल वय 38 वर्ष राहणार विदर्भ हाउसिंग सोसायटी यवतमाळ अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अन्न पुरवठा निरीक्षक कहारे यांनी पंचनामा करत पंचाच्या सह्या घेतल्या तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना देऊन एकुण 87 कट्टे गहु,तांदूळ जप्त केले.पुरवठा विभाग व सायबर सेलच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. आरोपीकडून एकूण 87 कट्टे जप्त केले त्यामध्ये रिकामे केलेले शासकिय पोते 65,शासकीय बारदाना 16, पलटी मारलेले 71 कट्टे किंमत 70 हजार 200 रु, टाटाएस वाहन क्रमांक एम एच 29 टी 4285 किंमत 2 लाख रुपये असा एकुण 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई सायबर सेलचे सपोनि अमोल पुरी,सपोनि शुभांगी आगाशे,
भगवान पडघन,पो.उप.नि.योगेश रंदे,विशाल भगत,गजानन डोंगरे तसेच पुरवठा विभागाचे अन्नपुरवठा निरीक्षक कहारे, सतीश डोंगरे,राजेश शिरभाते यांनी केली.
लकडगंज मधील ट्रेडिंग कंपनीला अभय कुणाचे ?
या कारवाईत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून लकडगंज परिसरातील एका ट्रेडिंग कंपनीमध्ये या अलकबीर मधील गोडाऊन मधून 130 कट्टे गेल्याची माहिती असून त्या ट्रेडिंग कंपनीच्या मालका विरोधात पुरवठा विभाग काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलेले आहे.
सदर प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकार्यांकडे कळविण्यात आल्याने शहरातून मोठ्या प्रमाणात सरकारी धान्याची तस्करी होत असल्याचे सिद्ध झाले आहे.हे गोदाम आता सरकारी धान्याची तस्करी करण्याचे मोठे केंद्र बनले आहे.
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानावर आपल्या एजंटद्वारे मोठय़ा प्रमाणात अवैधरित्या सरकारी धान्य या तस्करांच्या माध्यमातून विकत असून, हे हेच गहू व तांदूळ ट्रेडिंग कंपनी व राईस मिल मालकांना विकल्या जात असल्याने गोरगरिबांसाठी येणाऱ्या शासकीय धान्याचा मोठा गैरव्यवहार येथे सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.