जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली गिट्टी खदानची पाहणी, तलाठी साजा तपासणी व तहसील कार्यालयाला भेट
District Collector Shanmugarajan inspected the ballast mine, inspected the talathi and visited the tehsil office.
X
फुलचंद भगत
वाशिम:- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १८ फेब्रुवारी रोजी रिसोड तालुक्यातील मौजा चिचांबापेन शिवारातील गिट्टीखदानची पाहणी केली.रिसोड येथील तलाठी साजा क्रमांक १ ला भेट देऊन दप्तर तपासणी केली व सुंदर माझे कार्यालय या उपक्रमांतर्गत रिसोड तहसील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली.यावेळी तहसीलदार अजित शेलार प्रामुख्याने उपस्थित होते.
मौजे चिचाम्बापेन येथील भागवत देशमुख यांच्या गिट्टी खदानला जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी भेट दिली. यावेळी मंडळ अधिकारी श्री.लोखंडे तलाठी पी.पी.बाविस्कर व भागवत देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. गिट्टीखदानमध्ये करण्यात येणारे ब्लास्टिंग हे अधिकृत परवानाधारकाकडूनच करण्यात यावे असे श्री.षण्मुगराजन यांनी श्री.देशमुख यांना सांगितले.तसेच पर्यावरणाची हानी व प्रदूषण होणार नाही याबाबत दक्षता बाळगून काम करण्यात यावे असे ते म्हणाले. या खदानला प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी असल्याचे तहसीलदार श्री शेलार यांनी यावेळी सांगितले.
रिसोड शहरातील तलाठी साजा क्रमांक १ ची भेट देऊन दप्तर तपासणी केली.तलाठ्यांनी वेळेत ई - पीक पाहणी पूर्ण करणे,वेळेत सातबारा वाटप करणे, महसूल वसुली निर्धारित वेळेत पूर्ण करणे तसेच तलाठी साजाशी संबंधित असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करावी साजातून शेतकऱ्यांची व नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत काळजी घेण्याची सूचना तलाठी धनंजय काष्टे यांना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
सुंदर माझे कार्यालय या उपक्रमाअंतर्गत रिसोड तहसील कार्यालयाच्या विविध शाखांना तसेच इमारत परिसराला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार अजित शेलार, नायब तहसीलदार श्री.बनसोडे व प्रवीण लटके प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना चांगल्या सेवा मिळाव्यात. कार्यालयाचा परिसर नियमित स्वच्छ असावा. फायलिंग व्यवस्थित करण्यात याव्यात,अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.