सिंचन प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Complete irrigation projects with priority - Governor Bhagat Singh Koshyari
X
फुलचंद भगत
वाशिम : जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत तसेच जलसंधारणाच्या योजनाही अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज 5 फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील विविध स्थळांना भेट दिली. या दौऱ्यादरम्यान राज्यपालांनी येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून येथे राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांची माहिती श्री. कोश्यारी यांनी यावेळी घेतली. ते म्हणाले, जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबवावीत. इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्रामद्वारे जिल्ह्यात ३५ हजार हेक्टर सिंचन वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. असे कार्यक्रम जिल्ह्यात सर्वदूर राबवावेत. सिंचनाचे क्षेत्र वाढल्यास कृषी उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश राज्यपालांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची कामगिरी, पोषण अभियान, शिक्षण, कौशल्य विकास उपक्रम आदी विविध बाबींचा आढावा त्यांनी घेतला.
रेडक्रॉस सोसायटीच्या सुभाष मुंगी, डॉ. हरिष बाहेती आदींनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती राज्यपालांना यावेळी दिली. सोसायटीच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या जागेसाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
माजी सैनिक संघटनेतर्फे कॅप्टन संजय देशपांडे, कॅप्टन अतुल एकघरे यांनी संघटनेच्या कामकाजाची माहिती दिली. संघटनेतर्फे सैनिक संकुलात रुग्णालय, वसतिगृह, उपहारगृह, प्रशिक्षण केंद्र आदी सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. संघटनेच्या मागणीनुसार विशेष निधीतून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
सभेला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. आकोसकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी (जि.प.) श्री. मापारी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206