Home > Latest news > गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या बंदिस्त जलवाहिन्यांची कामे लवकर पूर्ण करावीत - पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा

गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या बंदिस्त जलवाहिन्यांची कामे लवकर पूर्ण करावीत - पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा

Closed works of Gosikhurd Irrigation Project should be completed soon - Guardian Minister Vijay Vadettiwar Review of various works in the district





चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : आगामी खरीप हंगामात सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी गोसीखुर्द जलसिंचन प्रकल्पाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बंदिस्त जलवाहिन्यांची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी रवि भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील, संदीप हासे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.




गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कालवे आणि बंदिस्त जलवाहिन्यांची कामे अधिक गतीने व दर्जेदार होणे आवश्यक आहे. कामाचा दर्जा चांगला राहिल्यास प्रत्यक्ष सिंचन सुरु झाल्यानंतर अडथळे निर्माण होणार नाहीत. बंदिस्त जलवाहिन्यांच्या कामासाठी शेतीमध्ये करण्यात आलेल्या खोदकामाची बांधबंदिस्ती करून द्यावी. या कामांविषयी काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने दखल घेवून या तक्रारींचे निराकरण करावे. कालव्यांवर बांधण्यात आलेल्या पुलांची व त्यांना जोडणाऱ्या जोडरस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील 24 गावांतील शेतीसाठी गोसीखुर्द जलसिंचन प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी मेंढकी आणि अड्याळ उपसा सिंचन योजनेस निधीसह प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव करणे तसेच आसोलामेंढा धरणाची उंची वाढविणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास दीर्घ मुदतीच्या भाडे पट्ट्यावर आसोलामेंढा प्रकल्पातील जमीन पर्यटनासाठी देण्याच्या प्रस्ताव संदर्भात आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही श्री. वडेट्टीवार यांनी दिल्या.

मानव विकास योजनांचा आढावा:

मानव विकास कार्यक्रमामध्ये समाविष्ट चंद्रपूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील महिला व बालकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने यादृष्टीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे श्री. वडेट्टीवार यांनी आज मानव विकास कार्यक्रमाचा आढावा घेताना सांगितले.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवी आणि नववीच्या सुमारे सात हजार मुलींना यावर्षी सायकली वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुलींना शाळेला जाणे सोयीचे आणि सुलभ होईल. सध्या शाळा सुरु झाल्याने मानव विकास कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणारी बस सुविधा पूर्ववत करण्यासाठी परिवहन महामंडळाने तातडीने उपाययोजना करावी, अशा सूचना श्री. वडेट्टीवार यांनी दिल्या.

बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत, मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. काळे यावेळी उपस्थित होते. महिला व बाल कल्याण विभागाच्या योजनांचाही यावेळी श्री. वडेट्टीवार यांनी आढावा घेतला.

Updated : 11 Feb 2022 3:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top