रेनवॉटर हार्वेस्टिंग झाली नसल्यास बांधकामधारकांची डिपॉझिट जप्त होणार मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांचे निर्देश
Builders' deposits will be forfeited if rainwater harvesting is not done Instructions of Municipal Commissioner Vipin Paliwal
X
चंद्रपूर । चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवीन बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य असून, त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय रुपये २० हजार ते ते ५० हजारपर्यंतची अनामत रक्कम आकारण्यात येते. मात्र, शहरातील ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था केल्याचे पुरावे सादर केलेले नाही, अशा बांधकामधारकांनी लगेच रेनवॉटर हॉर्वेस्टिंग बांधकाम न केल्यास सदर डिपॉझिट जप्त करण्याचे निर्देश मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिलेत.
मुख्य प्रशासकीय कार्यालयातील आयुक्त सभा कक्षात रेन वॉटर हार्वेस्टिंग आढावा बैठकीत त्यांनी सूचना केल्या. यावेळी सहायक आयुक्त विद्या पाटील, नगर रचनाकार श्री. जयदीप मांडवगडे, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्यासह बांधकाम आणि नगर रचना विभागातील अधिकारी उपस्थित होते.
शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना मनपाकडून २ हजार ५०० रुपये आणि वेकोलिच्या सीएसआर फंडातून २ हजार ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान असे किमान एकूण ५ हजार रुपये तथा पुढील ३ वर्षापर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट देण्यात येत आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या २७ जून २०१६ च्या सर्वसाधारण सभेत रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने ठराव पारित करण्यात आला. नवीन बांधकाम परवानगी देताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था अनिवार्य करण्यात आली. यासाठी इमारतीच्या छताच्या आकारानुसार व मजला निहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. छताचे क्षेत्र २ हजार चौरस फूटापर्यंत प्रथम माळा २० हजार रुपये, द्वितीय माळा २५ हजार रुपये, छताचे क्षेत्र २ हजार चौरस फूटापेक्षा अधिक असल्यास प्रथम माळा २५ हजार रुपये, द्वितीय माळा ३० हजार रुपये, सदनिकांचे बांधकाम चौथ्या मजल्यापर्यंत ३० हजार तर चौथ्या मजल्यापेक्षा अधिक ५० हजार रुपये अनामत रक्कम आकारण्यात येते. इमारतधारकांनी नवीन बांधकाम केल्यानंतर रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था उभारल्याचे पुरावे मनपा सादर करावेत. अन्यथा परवानगीसाठी भरलेली अनामत रक्कम जप्त केली जाईल, असे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या सर्व खुल्या जागेत पर्कलेशन पीट (पाझर खड्डा) निर्माण करण्यात येणार आहेत.
रेन वॉटर हॉर्वेस्टिंगबद्दल नागरिकांमध्ये जागृती होण्याच्या दृष्टीने इको-प्रोच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात येईल, असे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी यावेळी सांगितले.
रेन वॉटर हॉर्वेस्टिंगसाठी अधिक माहितीसाठी संपर्क क्र. :- झोन क्र. १ (८३२९३३४७६७), झोन क्र. २ (७०२०२६२०७०), झोन क्र. ३ (९९७५०५७०३२),
रेन वॉटर हार्वेस्टिंग अमलबजावणी एजेन्सी कार्यकर्ता (८३२९१६९७४३) व कंत्राटदार (९०७५७५१७९०, ९४२०४४८१६६), संपर्क क्रमांक - ९४०३९२५८२३