Home > Latest news > गोद्री येथील बंजारा महाकुंभावर बहिष्कार घाला- देवानंद पवार

गोद्री येथील बंजारा महाकुंभावर बहिष्कार घाला- देवानंद पवार

भाजप व संघाकडून बंजारा संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न

गोद्री येथील बंजारा महाकुंभावर बहिष्कार घाला- देवानंद पवार
X

प्रतिनिधी यवतमाळ

भाजपा तसेच संघ परीवाराच्या वतीने जळगाव जिल्हयातील गोद्री येथे दिनांक २५ ते ३०जानेवारी दरम्यान अखील भारतीय हिंदू गोर बंजारा, लबाना-नायकडा समाजाचा महाकुंभ आयोजीत करण्यात आलेला आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून भाजपा तसेच संघ परीवार बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीची ओळख पुसण्याचा प्रयत्न करीत आहे. राजकीय स्वार्थासाठी भाजपा संघाने रचलेले हे षडयंत्र आहे. त्यामुळे बंजारा बांधवांनी गोद्री येथील बंजारा महाकुंभावर बहिष्कार घालण्याचे आवाहन बंजारा समाजाचे नेते देवानंद पवार यांनी केले आहे.

देशभर बंजारा समाजाची भाषा, वेशभूषा तसेच चालीरीती एकच आहे. निसर्गपूजक आणि मातृपूजक अशी बंजारा समाजाची ओळख आहे. दुसरीकडे भाजपा तसेच संघ परीवार मात्र बंजारा समाजाची हिंदु सनातन गोर बंजारा अशी नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रात पुढील दिड वर्षात होणा-या निवडणूका डोळयासमोर ठेऊन भाजपाने हे षडयंत्र रचले आहे. जेव्हा भारतात सती प्रथा होती तेव्हाही बंजारा समाजाने विधवा स्त्रीचे पुनर्वसन तसेच तीला समाजात सन्मानाचे स्थान निर्माण करुन देण्याचा प्रयत्न केला. पुरोगामी विचाराच्या बंजारा समाजाची भाजपा तसेच संघ परीवार सनातनी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून आम्हाला हे मान्य नसल्याचे देवानंद पवार यांनी म्हटले आहे. भाजपा तसेच संघ निव्वळ सत्ता हस्तगत करण्यासाठी बंजारा समाजाचा उपयोग करुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे. बंजारा समाजातील काही लोकांना हाताशी धरुन हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे गोद्री येथे होणा-या मेळाव्याला उपस्थित न राहण्याचे आवाहन देवानंद पवार यांनी केले आहे.

कुंभमेळयाची प्रथा नाही

बंजारा समाजात कुंभ मेळयाची प्रथा नाही. एवढेच नव्हे तर बंजारा समाज हा कधीच सनातनी विचारसरणीचा राहीलेला नाही. बंजारा समाजाची नाळ ही सिंधू संस्कृतीशी जुळलेली आहे. हा सर्व इतिहास असतांना भाजपा तसेच संघ परीवार बंजारा समाजाला सनातनी बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. निव्वळ निवडणुकीत मतांचा फायदा मिळवून घेण्याकरीता त्यांचा हा प्रयत्न सुरु असून समाजातील सुज्ञ नागरीकांनी समोर येऊन त्यांचा हा डाव हाणून पाडावा असे आवाहन सुध्दा देवानंद पवार यांनी केले आहे.

Updated : 24 Jan 2023 1:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top