मोठी बातमी: असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार, दोन गोळ्या कारमध्ये घुसल्या; ओवेसी सुरक्षित
Firing on Asaduddin Owaisi Car: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे.
Xaimim chief asaduddin owaisi says that bullets were fired upon his vehicle near toll plaza in Uttar pradesh
लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Elections) प्रचाराचा कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या कारवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. तीन ते चार राऊंड गोळ्या यावेळी झाडण्यात आल्या आहेत. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटवरुन गोळीबार झाल्याची माहिती दिली आहे.
ओवेसी यांनी ट्विट केले की, 'काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. 4 राऊंड गोळीबार करण्यात आला. 3-4 जण होते. सर्वजण आपली शस्त्रं तिथेच टाकून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. अलहमदु 'लिलाह.'
दरम्यान, ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यातही घेतले आहे. अतिरिक्त एसपी हापूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा येथील रहिवासी असलेल्या सचिन आणि त्याच्या साथीदारांनी मिळून हा गोळीबार केला होता. ताब्यात घेतलेल्या सचिनकडून 9 एमएमचे पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न
मेरठच्या आयजींनी दिलेल्या माहितीनुसार, 'पिलखुवा प्लाझा येथे गोळीबार झाल्याची चर्चा आहे. आम्ही सीसीटीव्ही पाहत आहोत. या मार्गावरून ओवेसींचा ताफा जात होता, काही लोकांमध्ये आपसात वादावादी झाली, इतकी माहिती मिळाली.
सध्या कोणीही जखमी झालेले नाही. सीसीटीव्ही तपासल्यानंतरच गोळ्या झाडल्या की नाही हे निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे एकही गोळी झाडली गेली नसल्याचे टोल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
यूपी निवडणुकीच्या प्रचारात उतरले ओवेसी
हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष यूपीमध्ये परिवर्तन मोर्चासोबत एकत्र निवडणूक लढवत आहे. ओवेसी स्वतः आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रणांगणात उतरले आहेत.
7 टप्प्यात निवडणुका होणार
उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकात यूपीमध्ये पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी, दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा २७ फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च आणि सातव्या टप्प्यासाठी 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.