वर्ग-2 व विशिष्ठ भाडेपट्ट्याच्या जमिनी वर्ग-1 करून घेण्याचे आवाहन
Appeal for class-II and special lease lands Class-I
जास्मिन शेख़
चंद्रपूर शहर प्रतिनिधि
चंद्रपूर दि. 16 फेब्रुवारी : महाराष्ट्रामध्ये भूतकाळात मोठ्या प्रमाणावर शासनाकडून विविध व्यक्ती व संस्थांना नियंत्रित सत्ता प्रकार वर्ग-2 धारणाधिकारावर शासकीय जमिनीचे कृषक व अकृषक प्रयोजनाकरिता वाटप करण्यात आले आहे. अशा जमिनीवर कास्तकार व भोगवटाधारांचे संपर्ण भूस्वामित्व नसल्याने अशा जमिनीचे हस्तांतरण, वापरात बदल करणे, अकृषक जमिनीच्या बाबतीत कर्ज घेणे याकरिता अडचणी येत होत्या. याकरिता वर्षानुवर्षे वहिवाट करत असलेल्या अशा जमिनींचे संपूर्ण भूस्वामित्व अशा लोकांना बहाल करण्याचे दृष्टीने धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला होता.
त्याअनुषंगाने, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये कलम 29-अ समाविष्ठ करून कुळ कायद्याचे जमिनी, वाटपाच्या जमिनी, परगणा व कुलकर्णी वतने, कोतवाल आदि कनिष्ठ वतनदारांना मिळालेली वतने, वाटपाच्या जमिनी त्याचबरोबर वर्ग-2 धारणाधिकारावर भोगवट्याने किंवा पट्ट्याने दिलेल्या जमिनी अशा स्वरूपाच्या जमिनी वर्ग-1 करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
शासनाने वर्ग-2 जमिनी व विशिष्ठ भाडेपट्ट्याच्या जमिनी वर्ग-1 करण्याकरिता दि. 8 मार्च 2019 रोजी नियम प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार सदर नियम राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 3 वर्षांचा कालावधी होईपर्यंत म्हणजेच 8 मार्च 2022 पर्यत वर्ग-1 करणेचे दर कमी असून अकृषक जमिनीकरिता प्रयोजनानुसार बाजारभावाच्या 15 ते 50 टक्के असून कृषक जमिनीकरिता 50 टक्के आहेत. सदर नियम राजपत्रात प्रसिद्ध होऊन 3 वर्षाचा कालावधी होत असल्याने 8 मार्च 2022 नंतर सदर दरात वाढ होणार असून अकृषक जमिनीकरिता प्रयोजनानुसार 60 ते 75 टक्के असून कृषक जमिनीकरिता 75 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
तरी, संबंधितांनी ह्या सुधारणेचा फायदा घेऊन आपल्या जमिनी वर्ग-1 करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडून करण्यात येत आहे