Home > Latest news > नैसर्गिक साधनसंपत्ती आणि स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्याचे नियोजन – पालकमंत्री मुनगंटीवार जिल्ह्यातील उद्योजकांशी एस.एन.डी.टी. च्या अभ्यासक्रमाबाबत संवाद

नैसर्गिक साधनसंपत्ती आणि स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्याचे नियोजन – पालकमंत्री मुनगंटीवार जिल्ह्यातील उद्योजकांशी एस.एन.डी.टी. च्या अभ्यासक्रमाबाबत संवाद

According to the natural resources and needs of local industries Planning to provide training – Guardian Minister Mungantiwar SNDT with entrepreneurs in the district. Communication about the curriculum of
चंद्रपूर, दि. 23 : आशिया खंडातील महिलांचे एकमेव विद्यापीठ असलेले श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे (एस.एन.डी.टी.) उपकेंद्र विसापूर (ता.बल्लारपूर) येथे साकारण्यात येत आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरणासोबतच जिल्ह्यातील महिला रोजगाराभिमुख होतील. त्यामुळे जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग आणि स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार एस.एन.डी.टी विद्यापीठाचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

वन अकादमी येथे एस.एन.डी.टी विद्यापीठाचे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणासंदर्भात जिल्ह्यातील उद्योजकांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली आहे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार आपला जिल्हा आत्मनिर्भर कसा होईल, यावर चर्चा तसेच विद्यापीठाचे अभ्यासक्रम याबाबत उद्योजकांसोबत हा संवाद ठेवण्यात आला आहे. आज बहुतांश उद्योगात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. यात आपला जिल्हासुध्दा अपवाद नाही. यावर मात करण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण येथील महिलांना देण्यात येतील. चंद्रपूर जिल्ह्यातील समृद्ध वनसंपदा, पर्यटन व गौण खनीजावर आधारित उद्योगांना एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या उपकेंद्रातून शिक्षण घेतलेल्या कुशल मनुष्यबळाचा निश्चित फायदा होईल.

पुढे श्री. मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांच्या वाढीसाठी शासन आणि जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे. याशिवाय आरोग्य, शिक्षण, पिण्याचे शुध्द पाणी, रोजगार, सिंचन, हर घर नल अशा महत्वाकांक्षी योजनांवर शासनाचा फोकस आहे. त्यासाठी स्थानिक उद्योजकांच्या सहकार्याची गरज आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त होणारच आहे. मात्र कधीकधी इतर छोट्यामोठ्या बाबींकरीता निधीची कमतरता भासते. अशावेळी उद्योजकांनी सामाजिक दायित्व निधीच्या (सी.एस.आर. फंड) माध्यमातून सहकार्य करावे. तसेच एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे अभ्यासक्रम आणि आवश्यक प्रशिक्षणाबाबत आपल्या सुचना कळवाव्यात, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे सुसज्य व मॉडेल कॅम्पस चंद्रपूर मध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सर्व मदत विद्यापीठाला करण्यात येईल. यावेळी त्यांनी उद्योजकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी सादरीकरणाद्वारे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. सन 2023-24 च्या शैक्षणिक सत्रापासून बल्लारपूर येथे एस.एन.डी.टी. चे अल्प मुदतीचे कौशल्य आधारित व्यावसायिक अभ्यासक्रम महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण परिसर नावाने सुरू करण्यात येणार आहे. मायनिंग क्षेत्रात उत्खनन तंत्र व यंत्रसामग्री हाताळणे, स्थानिक हस्तकला, देश-विदेशातील पर्यटकांशी चांगला संवाद साधण्यासाठी परदेशी भाषा आणि संवाद कौशल्य, पर्यावरण, पर्यटन, निसर्ग छायाचित्रण, वनव्यवस्थापन, वन पर्यावरणशास्त्र, वन्यजीव विज्ञान, वनस्पतीशास्त्राची मूलतत्वे, पर्यटनावर आधारित हॉटेल व्यवस्थापन, आदरातिथ्य व्यवस्थापन, लघु उद्योगांवर आधारित ब्रँडिंग, मार्केटिंग, मूलभूत प्रकल्प व्यवस्थापन, समुदाय शिक्षणात नर्सिंग, समुदाय सेवा व प्रौढ शिक्षण तसेच ज्वेलरी डिझाईन, गृहविज्ञान, विधी अभ्यास, वनउपज व कृषी उत्पादनावर आधारित फुड टेक्नॉलॉजी इत्यादी क्षेत्रातील अभ्यासक्रमात स्थानिक महिलांना रोजगार प्राप्तीसाठी मोठा वाव राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी तर संचालन निकिता कन्नमवार यांनी केले. यावेळी चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र, वेकोली, ग्रेस इंडस्ट्रिज, लॉयड्स मेटल ॲन्ड एनर्जी लिमिटेड, सिध्दबली इस्पात, अल्ट्राटेक, माणिकगड, एसीसी आदी उद्योगांचे प्रमुख उपस्थित होते.

उद्योजकांनी केलेल्या सुचना : अंडरग्राऊंड आणि ओपनकास्ट मायनिंगमध्ये महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, मायनिंग डिप्लोमा आणि बी.टेक इन मायनिंग अभ्यासक्रम, वेगवेगळे उपकरणे हाताळण्याबाबत महिलांना प्रशिक्षण, पावर जनरेशनमध्ये टेस्टिंगबाबत प्रशिक्षण, लोहखनीज व जडवाहतूकबाबत चालकाचे प्रशिक्षण, डाटा ॲनलिसिस करण्यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण, उद्योगांमध्ये महिला सुरक्षा रक्षकाबाबतचे प्रशिक्षण आदी सुचना यावेळी करण्यात आल्या.

Updated : 24 Nov 2022 3:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top