अवकाळी पावसामुळे शेतक-यांना नुकसान भरपाईबाबत त्वरीत शासनाला प्रस्ताव पाठवावा – आ. सुधीर मुनगंटीवार
A proposal should be sent to the government immediately to compensate the farmers due to untimely rains. Sudhir Mungantiwar


जिल्हाधिका-यांसह झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा.
अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने मानवतावादी दृष्टीकोनातुन त्वरीत शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
दिनांक २४ जानेवारी रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या समवेत विविध विषयांबाबत बैठक घेत चर्चा केली. सदर बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी वरील विषयांबाबत सुचना दिल्या. जिल्हयात विविध विभागांमध्ये मोठया प्रमाणरावर पदे रिक्त आहेत. प्रामुख्याने कृषी विभागात महत्वाची पदे रिक्त आहेत, जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहेत. उपजिल्हाधिका-यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजात अवरोध निर्माण झाला आहे. त्याचा फटका शेतक-यांना तसेच सर्वसामान्य जनतेला बसत आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतक-यांच्या कृषी पंपांची करंट बीज बिले थकित असल्यास ती कापणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली. तरीही शेतक-यांच्या कृषी पंपांचे विज कनेक्शन कापण्यात आल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातुन प्राप्त होत आहे, ही बाब गंभीर असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांच्या निदर्शनास आणले. पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी येथील १५३ शेतक-यांना वनविभागाने नोटीस पाठविल्या आहेत. याबद्दल सुध्दा जिल्हाधिका-यांनी हस्तक्षेप करून मार्ग काढावा, असेही आ. मुनगंटीवार या बैठकीत म्हणाले.
रानडुक्कर व इतर वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतक-यांना नुकसान भरपाई तातडीने मिळावी व हे नुकसान थांबविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सुचना देखील आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बॅंकेच्या सहकार्याने शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने ही कार्यवाही जलदगतीने पुर्ण करावी अशा सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. या सर्व विषयांच्या अनुषंगाने संबंधित विभाग प्रमुखांना त्वरीत कार्यवाहीसाठी सुचना देण्यात येतील व प्राधान्याने योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. बैठकीला मुख्य वनसंरक्षक एन. प्रविण, उपवनसंरक्षक श्री. मुंडे यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.