Home > Latest news > मुल तालुक्‍यातील उथळपेठ येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसीत होणार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वपूर्ण निर्णय गायमुख देवस्‍थान परिसर, गायमुख सफारी, गायमुख साहसी क्रीडा क्षेत्र, गायमुख हट्स आदींचा समावेश

मुल तालुक्‍यातील उथळपेठ येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसीत होणार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वपूर्ण निर्णय गायमुख देवस्‍थान परिसर, गायमुख सफारी, गायमुख साहसी क्रीडा क्षेत्र, गायमुख हट्स आदींचा समावेश

A nature tourism center will be developed at Uthalpeth in Mul taluka Important decision of Forest Minister Sudhir Mungantiwar Including Gaymukh Devasthan Premises, Gaymukh Safari, Gaymukh Adventure Sports Area, Gaymukh Huts etc
चंद्रपूर, दि. 24 : मुल तालुक्‍यातील उथळपेठ येथे निसर्ग पर्यटन केंद्र विकसीत करण्‍याचा निर्णय वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. यासंदर्भात दिनांक २३ नोव्‍हेंबर रोजी चंद्रपूरात वनप्रबोधिनी येथे झालेल्‍या बैठकीत यासंदर्भात चर्चा व सादरीकरण करण्‍यात आले.

यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनिकरण) सुनीता सिंग, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, वन प्रबोधिनीचे अपर संचालक प्रशांत खाडे, वन प्रबोधिनीचे सल्लागार मंगेश इंदापवार, आर्कीटेक्ट जगन्नाथ चावडेकर, प्रकाश धारणे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर वन विभागांतर्गत येणाऱ्या चिचपल्ली वन परिक्षेत्रातील उथळपेठ या गावाच्या शेजारी डोंगराळ परिसरात गायमुख हे प्रसिद्ध व ऐतिहासिक स्थळ आहे. गायमुख येथे हेमाडपंथी व काळ्या दगडातील बांधकाम केलेले सुमारे 700 वर्ष जूने शिवमंदिर आहे. उथळपेठ येथील डोंगरातून नैसर्गिक झरे 12 महिने 24 तास सातत्याने वाहत असतात. शिव मंदिराच्या पायथ्याशी पुरातनकालीन कुंड बांधण्यात आले आहे. त्या कुंडाला गायमुखी आकार देण्यात आला असल्याने या स्थळाला गायमुख म्हणून परिसरात ओळखण्यात येते. निसर्गरम्य परिसरातील या पुरातन शिव मंदिराला दरवर्षी सुमारे 15 ते 20 हजार भाविक, नागरिक, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी भेट देत असतात.

महाशिवरात्री व इतर सणांना येथे भाविकांची मोठी गर्दी होते. येथील शिव मंदिर हे केवळ चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध नाही तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया येथूनही मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. गायमुख परिसरात पुरातन मंदिरे, पाण्याचे कुंड आणि विपूल वनराई आहे. त्यामुळे निसर्ग पर्यटनासाठी अत्यंत पोषक असे वातावरण येथे आहे. त्यामुळेच वने, सांस्कृतिक कार्य व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उथळपेठ या गावाला दत्तक घेतल्यानंतर येथील निसर्ग पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय घेतला.

गायमुख देवस्‍थान परिसराचा विकास : मोठ्या प्रमाणात येथे भाविक येत असल्याने देवस्थान परिसराचा सर्वांगिण विकास करणे आवश्यक आहे. गायमुख मंदीर परिसरात प्रवेशद्वार व सुरक्षा चौकी, मंदिर परिसरात ध्‍यान केंद्र, अंतर्गत दगडी पायवाट, गायमुख कुंड व डोंगरातून येणा-या झ-याचे नुतनीकरण, भक्‍तांसाठी कम्‍युनिटी ग्रीन किचन, तलावांचे नुतनीकरण व सुशोभीकरण, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय, पथदिवे व वाहनतळ, डोंगर परिसरात वृक्षलगावड ही कामे प्रस्‍तावित आहेत.

गायमुख सफारी : चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील जनाळा ते उथळपेठ गायमुख या परिसरात जंगल सफारीचा प्रस्ताव आहे. या परिसरात घनदाट जंगल असून तिथे वाघ, बिबट, अस्वल, हरिण व इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. परिसरात तीन लहान तलाव असून तिथे वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येतात. तसेच तिथे मचाण देखील बांधण्यात आले आहे. सुमारे 35 कि.मी. लांबीची व दीड ते दोन तास कालावधीची जंगल सफारी येथे नियोजित करण्यात आली असून अंतर्गत रस्ते बांधण्यात आले आहेत. सदर सफारी जनाळा येथून सुरू होऊन गायमुख येथे पूर्ण होत आहे. त्यामुळे या सफारीला गायमुख सफारी असे नाव देण्‍यात येणार आहे. या सफारीत जानाळा व गायमुख येथे प्रवेशद्वार, सुरक्षा चौकी व तिकिट घर, वाहनतळ, बगिचा व पॅगोडा, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय, इको फ्रेंडली प्रसाधनगृह ही कामे प्रस्‍तावित आहेत.

गायमुख साहसी क्रीडाक्षेत्र : उथळपेठ गायमुख येथे मोठ्या संख्येने युवक व शाळकरी विद्यार्थी दरवर्षी भेट देत असतात. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उथळपेठ गायमुख येथे आकृष्ट करण्यासाठी तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी साहसी क्रीडा क्षेत्र विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. या क्षेत्राचे व्यवस्थापन व देखभालीची जबाबदारी संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे सोपवण्याचे प्रस्तावित आहे. ज्यामुळे गावकरी युवक व युवतींना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील. तसेच मोठ्या संख्येने शालेय व महाविद्यालयीन युवक युवती या क्षेत्रात भेट देतील. यात फ्लाईंग फॉक्‍स, स्‍पायडर नेट, हाय रोप्‍स, हॅंगिंग लॉग, कार्गो नेट, रोप बीज, टायर स्विंग, बॅलन्‍स बीम, बर्मा ब्रीज, क्‍लायम्‍बींग वॉल या साहसी क्रिडा प्रकारांचा समावेश असणार आहे.

गायमुख इको हट्स : गायमुख सफारीचे एक्झीट गेटजवळ इको हट्स बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना, तसेच गायमुख परिसरात येणाऱ्या इतर नागरिकांना राहण्यासाठी दहा लाकडी घरे लॉग हट्स बांधण्याचे प्रस्तावित आहे. सदर लॉग हट्समध्ये पर्यटकांसाठी सर्वप्रकारच्या पायाभूत व आधुनिक साधन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या इको हटच्या परिसरात ओपन एअर थिएटर, बगिचा, वृक्षलागवड, तलाव, व इतर साधन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. गायमुख निसर्ग पर्यटन व सफारी यांच्या नियोजनाचे काम संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत होणार असून समितीमार्फत सुमारे 50 जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यात सफारी गाईड, सफारी तिकीट कर्मचारी, सफारी गेट किपर, गायमुख प्रवेशद्वार तिकीट घर कर्मचारी, पार्कींग झोन कर्मचारी, सफाई कर्मचारी, साहसी क्रिडा क्षेत्र, निसर्ग इको हट निवास क्षेत्र अशा ठिकाणी स्थानिक युवक युवती यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

वनविभागाला होणारे लाभ : उथळपेठ येथील गायमुख देवस्थान व गायमुख सफारीमुळे वनक्षेत्राचे संरक्षण व संवर्धन, वन्यप्राण्यांना सुरक्षित अधिवास, वन्यजीवांची योग्य देखभाल व सुरक्षा, पर्यावरण व वनांबाबत नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करता येईल. अवैध उत्खनन व वृक्षतोडीवर नियंत्रण, जंगलावर अवलंबून राहणाऱ्या नागरिकांना पर्यायी उत्पनाचे साधन देता येईल. आर्थिक विकासासोबतच पर्यावरण संरक्षण हे लाभ वनविभागाला होणार आहे.

नागरिकांना होणारे लाभ : उथळपेठ सफारी व देवस्थान विकासाचा सर्वाधिक लाभ परिसरातील आठ ते दहा गावांना होणार असून सफारी गेटवर पर्यटकांची गर्दी होईल. तिथे जिप्सी, गाईड व इतर व्यवसायामुळे रोजगार निर्माण होणार आहे. गायमुख परिसरात पर्यटकांच्या गर्दीचा लाभ गावातील व्यावसायिकांना होणार आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत परिसराचे व्यवस्थापन होणार असल्याने नवे रोजगार निर्माण् होतील. गाव विकासासाठी उत्पनाचे साधन निर्माण होणार आहे. वनसंपत्तीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार असून अवैध वृक्षतोडीवर लगाम लागेल. युवक, युवती व इतरांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मुल तालुक्‍यातील उथळपेठ हे त्‍यांचे दत्‍तक गाव एक नवे देखणे रूप घेवून नागरिकांच्‍या व पर्यटकांच्‍या सेवेत रूजु होणार आहे.

Updated : 24 Nov 2022 2:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top