कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून
Wife murdered with an ax wound
X
पुसद (जि. यवतमाळ) : येथील विटाळा वॉर्डात घरगुती वादातून पतीने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
रेखा नारायण खराबे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून पती नारायण यादवराव खराबे (वय ४०, रा. विटाळा वॉर्ड) पसार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, पुसद शहरातील विटाळा वॉर्ड येथे रहिवासी असलेल्या नारायण यादवराव खराबे आणि पत्नी रेखा यांच्यात शुक्रवारी रात्री घरगुती कारणावरून घरात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाली. पती नारायणने रागाच्या भरात पत्नी रेखाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर पती नारायण पसार झाला.
घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर रेखाला खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रेखाला मृत घोषित केले. उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदन करण्यात आले. घटनेचा पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.