वनवारला येथे युवकाची धारदार शस्त्राने हत्या!
ग्रामीण भागातील गुन्हेगारी जगताचा आलेख वाढत आहे
X
अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती
राजेश ढोले पुसद प्रतिनिधी
ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वनवार्ला येथे दोन ते चार जणांनी संगणमत करून गावातच राहणाऱ्या युवकाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना दि.२६ ऑक्टोंबर रोजीच्या रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. हत्या करून पसार झालेल्या आरोपी पैकी दोघांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शेख अन्सार शेख मुसा वय ३५ रा.वानवर्ला असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे तर ग्रामीण पोलिसांनी वनवार्ला येथे राहणाऱ्या शेख महबूब शेख अजगर वय १८ वर्षे व शेख नजीर शेख अजगर वय ३० वर्षे या दोघांना ताब्यात घेतले आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक शेख अन्सार हा हैदराबाद येथे उदारनिर्वासाठी कामानिमित्त राहत होता. तर शेख महेबुब व शेख नजीर हे दोन्ही आरोपी नागपूर येथे उदरनिर्वाहासाठी कामाला राहत होते. ते सर्वजण आठ दिवसापूर्वी वनवार्ला येथे मुळ गावी आले असता त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी संगणमत करून वनवारला येथील आटो पॉईंट जवळ रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली. हत्या केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर घटनेतील दोन आरोपीला काही तासातच ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले होते. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.वृत्त लिहोस्तोवर पोलिसांकडून कसून चौकशी सुरू होती. प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार आनंद शेळके करीत आहेत.