अमरावतीमध्ये ATS ची मोठी कारवाई, १२०० जिलेटीनच्या कांड्याही जप्त; दोन आरोपींना अटक
वडगाव माहूरे जवळ ATS ची कारवाई, पोलिस तपास सुरु
X
जिलेटीनच्या साठ्यासह अटकेतील दोन आरोपी
एकीकडे मुंबईत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या स्कॉर्पिओचं प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांची झालेला संशयास्पद मृत्यू या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. याचदरम्यान अमरावतीमध्ये ATS ने महत्वाची कारवाई करत १२०० जिलेटीनच्या कांड्या सोबत बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव माहूरे जवळ ATS च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
शहरात रात्री पेट्रोलिंग करत असताना अमरावती ATS च्या अधिकाऱ्यांना वडगाव माहूरे रोडवर दोन इसम अवैधरित्या एका चारचाकी गाडीत जिलेटीनच्या कांड्या बाळगून असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन ATS अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली असता, त्यात ६ पेट्यांमध्ये एकूण १२०० जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. ज्यानंतर ATS ने कानसिंग राणावत आणि सुरज बैस या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याजवळील दोन फोन, चारचाकी गाडी असा १० लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी जप्त केलेली कार
अमरावती शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात जिलेटीनचा साठा आणल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या जिलेटीनच्या कांड्या दोन्ही आरोपींनी कोणत्या कारणासाठी आणल्या होत्या याचा तपास सुरु आहे. अनेकदा शेतामध्ये खोदकाम किंवा इतर कामांसाठीही शेतकरी जिलेटीनच्या कांड्याचा वापर करतात.