Home > Crime news > मालमत्तेचा वाद विकोपाला... लहान्याने मोठ्या भावाला चाकूने भोसकून जागेवरच केले ठार

मालमत्तेचा वाद विकोपाला... लहान्याने मोठ्या भावाला चाकूने भोसकून जागेवरच केले ठार

मंगळवारी सकाळची घटना : जिल्ह्यात खुनाचे सत्र कायम

मालमत्तेचा वाद विकोपाला... लहान्याने मोठ्या भावाला चाकूने भोसकून जागेवरच केले ठार
X

मालमत्तेचा वाद विकोपाला... लहान्याने मोठ्या भावाला चाकूने भोसकून जागेवरच केले ठार

मंगळवारी सकाळची घटना : जिल्ह्यात खुनाचे सत्र कायम

यवतमाळ : दोन भावांतील मालमत्तेचा वाद विकोपाला पोहोचला. लहान भावाने काहीही न कळू देता, अचानक मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. कुटुंबीयांसमक्षच स्वत:च्या सख्ख्या भावाला चाकूने भोसकून जागेवरच ठार केले.ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजेदरम्यान माळीपुरा परिसरात घडली. राहुल मनोहरराव बाचलकर (३६), असे मृताचे नाव आहे. राहुल हा हार विक्रीचा व्यवसाय करीत होता. शहरातील मध्यभागी येत असलेल्या टांका चौक येथे राहुलचे व फूल व हार विक्रीचे दुकान आहे. त्यामुळे तो अनेकांना परिचित आहे. त्याचा लहान भाऊ सतीश (३२) हासुद्धा फूल विक्रीचाच व्यवसाय करतो. त्याने हिस्सेवाटणीवरून वाद घालत मंगळवारी सकाळी स्वत:च्या भावाच्या पोटात चाकूने सपासप वार केले. घरासमोरच राहुल रक्ताच्या थारोळ्यात जागेवर कोसळला.


या घटनेने माळीपुरा परिसरात एकच खळबळ उडाली. बाचलकर कुटुंबीय अक्षरश: हादरून गेले. काय करावे कुणाला सुचत नव्हते. निपचित पडलेल्या राहुलला तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी राहुलची पत्नी व आई प्रचंड आक्रोश करू लागल्या. शहर पोलिसांनी तत्काळ गुन्ह्यातील संशयित सतीश बाचलकर याला ताब्यात घेतले. याप्रकरणी राहुलची पत्नी रिता यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

चार एकर शेतीचा वाद

राहुल व सतीश हे दोघे भाऊ फुलाचा एकत्र व्यवसाय करीत होते. याच व्यवसायातील नफ्यातून मादणी येथे चार एकर शेती घेतली. या शेतीची सोमवारीच दोन भावांत वाटणी करण्यात आली. यावेळी त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. मंगळवारी सकाळी राहुल त्याच्या जुन्या घरी आईकडे घरातील वस्तूंची मागणी करीत असताना आईसोबत त्याचा वाद झाला. यातच सतीशने घरातून चाकू आणून राहुलवर सपासप वार केले.

पत्नी व मुलगा प्रत्यक्षदर्शी

राहुलची पत्नी रिता व तिची दोन मुले या खुनाच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत. संतापलेल्या सतीशने आपल्या सख्ख्या भावालाच चाकूने भोकसून काढले. त्याच्या तावडीतून पतीला सोडविण्यासाठी रिता जीवाच्या आकांताने आरडाओरडा करीत होती. कशीबशी सुटका केल्यावर जखमी पतीला घेऊन ती शासकीय रुग्णालयात पोहोचली.

मारेगावपासून सुरू झाले खुनाचे सत्र

जिल्ह्यात ८ मेपासून खुनाचे सत्र सुरू आहे. दहा दिवसांत तब्बल सहा खून झाले आहेत. मारेगाव तालुक्यातील डोर्ली येथे शेतकऱ्याचा गळा चिरून खून झाला. यातील आरोपी जेरबंद होत नाही तोच पाटीपुरा येथे वैभव नाईक याची नऊ जणांनी हत्या केली. येळाबारा येथे गळा आवळून एकाचा खून केला. नंतर मृतदेह दगडाने बांधून धरणात फेकून दिला. यातील आरोपी अद्यापही पसार आहे. शुक्रवारी रात्री पांढरकवडा रोडवर गांजाच्या व्यसनातून दगडाने ठेचून एकाचा खून झाला. यातील आरोपी मिळाले. मात्र, मृताची ओळख पटली नाही. त्यानंतर रविवारी रात्री पारवा येथे माहिती अधिकार कार्यकर्त्याचा खून झाला. हे सत्र आता किती दिवस चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Updated : 17 May 2022 11:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top