परिचारिकेचा विनयभंग करणाऱ्या तरूणाला नागरिकांनी दिला चोप
Citizens gave chop to the young man who molested the nurse
X
यवतमाळ- एका खाजगी रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेचा विनयभंग करणाऱ्या तरूणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. ही धक्कादायक घटना बुधवार, दि. १३ जुलैला दुपारच्या सुमारास सिंघानियानगर परिसरात घडली. या प्रकरणी परिचारिकेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या तरुणावर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती. सिंघानिया नगर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात बुधवारी परिचारिका कार्यरत होती. बुधवारी दुपारी ती कर्तव्यावर असतांना एका ओळखीच्या तरुणाने त्या ठिकाणी चारचाकी वाहनाने येवून त्या पारिचारिकेचा विनयभंग करीत तिला बोलायचे आहे म्हणत त्याच्या वाहनाकडे ओढत नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिचारिकेने विरोध करीत आरडाओरड केली. परिचारिकेचा ओरडण्याचा आवाज ऐकून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेवून त्या तरूणाला चांगलाच चोप दिला. जमावाच्या मारापासून वाचण्यासाठी तरुणाने त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर परिचारिकेने थेट अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून याबाबत रितसर तक्रार दिली. या तक्रारीचे गांभीर्य घेता अवधुतवाडी पोलिसांनी रुग्णालय परिसर गाठून पाहणी केली. तो तरूण नेर येथील असल्याचे बोलल्या जात आहे.