बेलोरा शाळेत शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार
Belora school teacher abuses student
X
यवतमाळ- गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना यवतमाळ तालुक्यातील बेलोरा जिल्हा परिषद शाळेत शनिवारी उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून संतप्त गावकऱ्यांनी शाळेत धाव घेत शिक्षकाला चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेत रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. अरूण राठोड वय ५१ वर्ष रा. जवळा ता. आर्णी असे त्या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, यवतमाळ तालुक्यातील बेलोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शाळेतील शिक्षकाने अत्याचार केला. हा प्रकार शनिवारी उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली. दरम्यान संतप्त गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेत धाव घेत त्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला. याबाबतची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर जुनघरे यांनी कर्मचाऱ्यांसह बेलोरा गाठून त्या शिक्षकाची नागरिकांच्या तावडीतून सुटका करीत पोलिस ठाण्यात आणले. मात्र तो शिक्षक अरूण राठोड जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. यावेळी बेलोरा परिसरातील सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे.