अमरावती : तिवसा येथे शिवसेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या
डोळ्यात मिरचीची पूड टाकून केली हत्या, पोलिसांनी ४ आरोपींना केली अटक
X
मयत अमोल पाटील
अमरावतीमधील तिवसा शहरातील शिवसेनेचे शहरप्रमुख अमोल पाटील यांची एका टोळक्याने निर्घृण हत्या केली आहे. अमरावती-नागपूर महामार्गावर आशिर्वाद वाईन बार समोर शनिवारी रात्री साडे दहा वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी अमोल पाटील यांच्या डोळ्याच मिरचीची पूड टाकत त्यांची हत्या केल्यामुळे तिवसा शहरात खळबळ उडाली आहे.
दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अमोल पाटील याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून त्याच्यावर याआधी दोन हत्या प्रकरणांचा आरोप आहे. दीड महिन्यापूर्वी पोलीस अधिक्षकांनी अमोल पाटीलविरोधात तडीपारीचा आदेश काढला होता. अमरावतीमधील महेंद्र ठाकूर हत्या प्रकरणात अमोल पाटील हा आरोपी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल पाटील आपल्या मित्रासोबत बारमध्ये आला होता. रात्री बार बंद झाल्यानंतर अमोल पाटील बारसमोर बसला होता. यावेळी आरोपींनी अमोल पाटीलच्या डोळ्याच मिरचीची पूड टाकून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत जागेवरच त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
अमोल पाटीलची राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे तिवसा शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच तपासाची चक्र फिरवत या हत्येमधील प्रवीण पांडे, संदीप ढोबाळे, प्रवीण ढोबाळे, रुपेश घागरे यांना अटक केली आहे. दरम्यान एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती तिवसा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.