मंगरूळपीर शहरातील तडीपार इसमावर स्थानिक गुन्हे शाखेची शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई
Action under Arms Act by Local Crime Branch against Tadipar Isma in Mangrulpir city
X
मंगरूळपीर शहरातील तडीपार इसमावर स्थानिक गुन्हे शाखेची शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई
फुलचंद भगत
वाशिम:-समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. काही असामाजिक घटक समाजाची शांतता भंग करण्यासाठी व जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करतात. त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात येते.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विनापरवाना घातक धारदार शस्त्र बाळगत समाजामध्ये धाक, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगरूळपीर शहरातील एका आरोपीविरुद्ध कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सह विविध सहकलमांअन्वये कारवाई करण्यात आली आहे. दि.२४.०५.२०२३ रोजी पो.स्टे.मंगरूळपीर हद्दीतील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे एक २८ वर्षीय युवक धारदार तलवार बाळगून असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासमक्ष सदर युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक धारदार तलवार जप्त केली असून त्याच्यावर कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सहकलम १४२ म.पो.का. अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरच्या कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक पोउपनि.शब्बीर पठाण, पोहवा.दीपक सोनवणे, पोना.अमोल इंगोले, प्रवीण राऊत, पोकॉ.संतोष शेनकुडे यांनी पार पाडली. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगीत समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरुद्ध न घाबरता समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी केले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206