Home > Crime news > स्वस्त धान्याचा 460 पोते गहू काळ्या बाजारात नेणारा ट्रक पकडला

स्वस्त धान्याचा 460 पोते गहू काळ्या बाजारात नेणारा ट्रक पकडला

हिंगोलीतील स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

स्वस्त धान्याचा 460 पोते गहू काळ्या बाजारात नेणारा ट्रक पकडला
X

फुलचंद भगत

वाशिम:-हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वस्त धान्य दुकानाचा गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असलेला ट्रक पकडला आहे. या ट्रकमध्ये ४६० पोते गहू असल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. १ रात्री सोनपेठ (जि. परभणी) येथील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.वाशीम येथून हा गहू हैदराबादकडे जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीमकडून गव्हाचे पोते भरलेला ट्रक हैदराबादकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, ठोंबरे, भगवान आडे, आशिष उंबरकर, ठाकुर, पायघन, टापरे, शेख जावेद यांच्या पथकाने वाहनांची तपासणी मोहिम सुरु केली होती.यामध्ये पोलिसांनी एका ट्रकची (क्र.एमएच-४६-एफ२२८६) तपासणी केली. पोलिसांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याने ट्रकमध्ये गव्हाचे पोते असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ट्रक जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणला. त्यानंतर गव्हाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता सदर गहू स्वस्त धान्य दुकानाचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी ट्रकमध्ये असलेले ५ लाख रुपये किंमतीचा ४६० पोते गहू व १२ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण १७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रक चालक शेख अब्दुल्ला शेख हैदर, सय्यद अजिम सय्यद कलीम (दोघे रा. सोनपेेठ, जि. परभणी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदर ट्रकमधे वाशीम येथून गहू भरण्यात आला होता तर हा गहू हैदराबादकडे नेला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता पोलिसांनी वाशीम येथून कोणाकडून गहू भरला होता याची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक किशोर पोटे पुढील तपास करीत आहेत.

प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 2 Jun 2021 12:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top