अडकलेली पतंग काढतांना शेणाने भरलेल्या टाकीत पडून दहा वर्षीय चिमुकल्या चा मृत्यू..
X
गुरुवारी देशभरात मकरसंक्रांतीचा उत्सव, साजरा केला जात असताना मुंबईत गालबोट लागलं. कापलेली पतंग पकडताना तबेल्यात गेलेल्या दहा वर्षांच्या चिमुरड्याचा शेणाच्या दलदलीत बुडून मृत्यू झाला. या भयंकर बातमीने मुंबई हादरली. कांदिवलीत राहणाऱ्या दुर्वेश जाधव नावाच्या 10 वर्षांच्या चिमुरड्याने शेणाच्या ढिगात बुडून आपला जीव गमावला.
कांदिवली पश्चिमेला राहणारा दहा वर्षांचा दुर्गेश जाधव दुपारी मित्रांसोबत पतंग उडवत होता. 3:30 वाजताच्या सुमारास एका कापलेल्या पतंगाच्या मोहात तो धावत राहिला. पतंग पकडता पकडता तो डहाणूकरवाडीतील एका तबेल्याजवळ गेला. ज्या पतंगाचा पाठलाग करत तो आला, ती नेमकी तबेल्यातील शेणाच्या दलदलीत अडकली. मग दुर्गेश पतंग उचलण्यासाठी दलदलीत शिरला, मात्र काही अंदाज यायच्या आतच त्याचा पाय खोलात गेला. शेणाने भरलेल्या त्या जागेत तो अक्षरशः बुडू लागला. मग मदतीसाठी आरडा ओरडा सुरू झाला. परंतु त्या शेणाच्या टाकीत उतरणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात टाकण्यासारखं होतं. त्यामुळे दुर्वेशला वाचवण्यासाठी आलेले हतबल झाले. तो शेणात दिसेनासा होईपर्यंत कुणीच काही करू शकलं नाही. अखेर दलदलीत बुडून दुर्वेशचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मशिनच्या सहाय्याने दुर्गेशचा मृतदेह दलदलीबाहेर काढला.
दरम्यान, कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र दुर्गेशच्या मृत्यूला कोणाची हलगर्जी कारणीभूत आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. शेणाच्या दलदलीच्या एका बाजूला तबेला, तर दुसऱ्या बाजूला बिल्डरचा प्रोजेक्ट असल्याने या घटनेला कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला, याचा शोध पोलीस घेत आहेत. पूर्ण तपास करुन दोषींविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे कांदिवली पोलिसांनी सांगितले.