Home > Business news > Amway नाव तर ऐकलंच असेल... ED म्हणतंय त्यात 'महाघोटाळा' झालाय; कसा ते तुम्हीच वाचा!

Amway नाव तर ऐकलंच असेल... ED म्हणतंय त्यात 'महाघोटाळा' झालाय; कसा ते तुम्हीच वाचा!

Amway Marketing Scam: Amway हे नाव आपण अनेकदा ऐकलं असेल. याचे अनेक प्रोडक्ट या कंपनीने बाजारात आणले आहेत. पण आता याच कंपनीत घोटाळा झाला असून ईडीने त्यांची तब्बल 757 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

Amway नाव तर ऐकलंच असेल... ED म्हणतंय त्यात महाघोटाळा झालाय; कसा ते तुम्हीच वाचा!
X

amway india pyramid fraud ed attached assets worth rs 757 crore multi level marketing scam(फोटो सौजन्य: Facebook/Amway)

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) एमवे (Amway) इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. एजन्सीने कंपनीची तब्बल 757.77 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ही कंपनी मनी लाँड्रिंग करत असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्याला पिरॅमिड फ्रॉड (Pyramid Fraud) असे नाव देण्यात आले आहे.

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये तामिळनाडूच्या डिंडीगुल जिल्ह्यातील Amway च्या कारखान्याची इमारत, जमीन, प्लांट, मशिनरी वाहने, बँक खाती आणि मुदत ठेवी (FDs) यांचा समावेश आहे. या मालमत्ता जप्त केल्याचा अर्थ असा आहे की ते हस्तांतरित किंवा बदलले जाऊ शकत नाहीत.

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, ED ने Amway कंपनीच्या 36 बँक खात्यांमध्ये जमा केलेली 411.83 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आणि 345.94 कोटी रुपये जप्त केले आहेत. ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) करण्यात आली आहे.

काय आहे पिरॅमिड फ्रॉड?

या योजनेला किंवा फसवणुकीला पिरॅमिड असे नाव देण्यात आले आहे. कारण त्याची कार्यशैली पिरॅमिडसारखी आहे, जिथे शीर्षस्थानी असलेल्या एका बिंदूपासून सुरू होऊन ती तळापर्यंत पसरते. अशा योजनांतर्गत खालच्या स्तरावरून पैसे गोळा केले जातात आणि ते वरच्या स्तरावर जमा केले जातात.

ईडीने आपल्या मनी लॉन्ड्रिंगच्या तपासात म्हटले आहे की, एमवे कंपनी मल्टी-लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) नेटवर्कच्या नावाखाली पिरॅमिड फसवणूक करत होती.


(फाइल फोटो, सौजन्य: Facebook/Amway)

काय आहे MLM?

एखादा व्यवसाय किंवा बिजनेस ज्यामध्ये एखाद्याचे कुटुंब आणि मित्रांना उत्पादन विकून, इतर लोकांना तसं करण्यास प्रोत्साहित केले जाते किंवा या कामात, एकाला दुसऱ्याला आणि दुसऱ्याकडून तिसर्‍याला जोडण्याच्या कामाला मल्टी लेव्हल मार्केटिंग किंवा डायरेक्ट मार्केटिंग बिजनेस म्हटले जाते. आता Amway वर असा आरोप आहे की, यामध्ये त्यांनी काही चुकीच्या पद्धतीनं कामं केली असून त्यात फसवणूक देखील झाली आहे.

Amway वर आरोप आहे की, त्यांचा संपूर्ण बिजनेस प्लॅन हा याच प्रचारावर केंद्रीत होता की, काहीही करुन लोकांनी त्यांचं सदस्य व्हावं आणि ते श्रीमंत होतील. या एमएलएम पिरॅमिड फ्रॉडला लपविण्यासाठी उत्पादनांचा वापर करण्यात येत होता.

असे आढळून आले आहे की, खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या नामांकित उत्पादनांच्या तुलनेत कंपनीने ऑफर केलेल्या बहुतेक उत्पादनांच्या किंमती या प्रचंड जास्त आहेत.

यामध्ये असेही आढळून आले आहे की, जे लोक या कंपनीत सामील होत होते ते त्यांच्या गरजेसाठी उत्पादने खरेदी करत नव्हते. तर सदस्य वाढवून श्रीमंत होण्याचे जे स्वप्न ते पाहत होते त्यासाठी त्यांना असं करावं लागत होतं. यामुळे व्हायचं असं की, या उत्पादनांच्या विक्रीवर कंपनीचे जे प्रमुख सदस्य आहेत त्यांना भरघोस कमिशन मिळत होते. पण मार्केटमध्ये तेच उत्पादन स्वस्त दरात विकले जात होते. या सगळ्या मार्केटिंग फंड्यामुळे काही लोकं खूपच श्रीमंत झाले.

अहवालानुसार, 2002-03 आणि 2021-22 दरम्यान कंपनीला या व्यवसायात 27,562 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, त्यापैकी कंपनीने भारत आणि अमेरिकेतील वितरक आणि सदस्यांना 7,588 कोटी रुपयांचे कमिशन दिले.

या प्रकरणी कारवाई करणाऱ्या ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,

ब्रिट वर्ल्डवाइड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नेटवर्क ट्वेंटी वन प्रायव्हेट लिमिटेड यांनी देखील एमवेच्या पिरॅमिड योजनेला चालना देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. प्रमोटर्सने मेगा कॉन्फरन्स आयोजित केल्या, भव्य लाइफस्टाइल दाखवली आणि साध्या-भोळ्या गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला गेला.'

दुसरीकडे एमवे इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, ही कारवाई 2011 च्या तपासासंदर्भात होती आणि कंपनी विभागाला सहकार्य करत आहे. ईडीने वेळोवेळी मागितलेली माहिती त्यांना पुरवली जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Updated : 2022-04-25T02:26:47+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top