Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > ▪️ वृक्ष लागवडी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास वृक्षाचे आयुष्यामान वाढते▪️

▪️ वृक्ष लागवडी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास वृक्षाचे आयुष्यामान वाढते▪️

▪️ वृक्ष लागवडी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास वृक्षाचे आयुष्यामान वाढते▪️
X

❗❗ त-हाडी प्रतिनिधी ❗❗

?-------------------------------------------------------?

वृक्षलागवड मोहीम राबवित असताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास वृक्षांचे जगण्याचे प्रमाण नक्कीच वाढते. शासनाकडून आदेश झाल्यावर सर्व शासकीय विभाग यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येते. परंतु, वृक्ष लागवड करताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब होत नाही त्यामुळे वृक्ष काही महिन्यातच मरतात. यातून वृक्ष लागवडीचे ध्येय तर गाठले जाते परंतु वृक्ष जगण्याचे ध्येय मात्र गाठले जात नाही. याचा सारासार विचार करून वृक्ष लागवड करताना शास्त्रीय पद्धतीने खड्डा करून त्यात बुरशीनाशक कीडनाशक शेणखत सेंद्रिय खते व रासायनिक खत यांचे योग्य प्रमाण दिल्यास लावलेले वृक्ष जास्त प्रमाणात जगतात. शासनाच्या सर्व विभागांनी या पद्धतीने वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. तरच शासनाचे वृक्षलागवडीचे ध्येय गाठता येईल नाही तर दरवर्षी वृक्ष लागवडीवर होणारा खर्च हा तेवढाच राहील याचा शासनाने ही विचार करणे गरजेचे आहे.

यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान ३३ कोटी वृक्षांची लागवड करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागाची मदत घेतली जाणार आहे. यात जिल्हा परिषद, महसूल विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पाटबंधारे विभाग, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय व अशासकीय विभागांमार्फत वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात येणार आहे. शासन दरवर्षी वृक्ष लागवडीची मोहीम राबवित असते. परंतु लागवड झालेल्या वृक्षांमधून किती वृक्ष जगतील याची शासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे दरवर्षी वृक्षांची लागवड संख्या वाढविण्यापेक्षा जगणाऱ्या वृक्षांची संख्या वाढविणे हे लक्ष केल्यास येणाऱ्या काळात राज्यात वृक्षसंपदा ही अनेक पटीने वाढणार आहे. या बाबीचा विचार शासनाने करणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयांना शास्त्रीय पद्धतीने खड्डा करणे व वृक्षाची लागवड करणे आदींची माहिती देणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाची मदत घेऊन जनजागृती करता येईल. असे झाल्यास वृक्ष लागवडीची संख्येबरोबर जगणाऱ्या वृक्षांची संख्या नक्कीच वाढेल. कारण वृक्ष लागवड तर मोठ्या प्रमाणावर होते परंतु योग्य पद्धतीने लागवड होत नसल्याने मरणार्‍या वृक्षांची संख्या साधारणतः ४० ते ६० टक्के असते. पावसाळ्यात लागवड केलेल्या १०० वृक्षांपैकी फक्त निम्मीच वृक्ष जगतात. त्यामुळे शासनाचा किती मोठा निधी हा वाया जात असेल याची कल्पना आपण करू शकतो. हा निधी वाचवण्यासाठी फक्त काही गोष्टींची खबरदारी घेतल्यास शासनाने ठरवलेले वृक्ष लागवडीचे ध्येय हे नक्कीच पूर्ण करता येईल. परंतु त्यासाठी शासनाने काही बदल करणे आवश्यक आहे.

वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे निसर्गचक्र सुस्थितीत ठेवण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे याचे कारण वृक्षांची कमी संख्या हेच आहे त्यामुळे अधिकाधिक पाऊस होण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे हाच एकमात्र पर्याय सर्वांसमोर उपलब्ध आहे याकामी सर्वांनी एकत्र येऊन जनसहभागातून कार्य करणे गरजेचे आहे वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन ह्या गोष्टी विषयी जनजागृती होणे आवश्यक आहे हवामान, जमीन व पाणी आदींचा अभ्यास करून वृक्ष लागवडीचे नियोजन होणे अपेक्षित आहे. कोणत्या प्रकारच्या झाडांची लागवड करावी, रोपांची उपलब्धता कशी करावी, खड्ड्याचा आकार कसा असावा, रोप लागवडीची पद्धत, लागवडीनंतर पाणी, खत व्यवस्थापन, जनावरांपासून संरक्षणाचे नियोजन आदी बाबींचा विचार होणे आवश्यक असते. परंतु बरेचदा वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रजाती वनस्पतींची निवड करून लागवड केली जाते. वृक्ष लागवडी वेळी बरेचदा प्रदेशनिष्ठ नसलेल्या तसेच आपल्या परिसरात न आढळणाऱ्या प्रजातींची लागवड केली जाते. त्यामुळे वृक्ष लागवडीचे गणित चुकते.

वृक्ष लागवड केल्या जाणाऱ्या खड्ड्यात सिंगल सुपर फॉस्फेट शेणखत हिरवळीचे खत कीड प्रतिबंधक पावडर अधिक मातीत चांगले मिसळावे यानंतर खत मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा रोप लागवडीच्या वेळी ब्लेडने पिशवी अलगद कापावी मातीचा गड्डा फुटणार नाही याची काळजी घ्यावी यानंतर रूप उचलून खड्डा खाल्लेल्या ठिकाणी लावावे रोपाभोवती माती ओढावी त्यानंतर खड्ड्यातील माती पायाने हळुवारपणे दाबावी रोप लागवडीनंतर पाणी द्यावे रोपाला आधार म्हणून जवळ काठी काढावी संरक्षणासाठी जाळीची व्यवस्था करावी या पद्धतीने वृक्ष लागवड केल्यास वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास नक्कीच मदत होईल

०--------------------------------------------------०

पावसाळ्यात दोन-तीन पाऊस झाल्यानंतर वृक्षलागवडीची मोठी मोहीम सुरू करण्यात येते. शासकीय स्तरावरून मोठ्या संख्येने वृक्षांची लागवड केली जाते. परंतु शास्त्रीय पद्धतीने खड्डा न करता एक ते दीड फूट खोलीच्या खड्ड्यात वृक्षांची लागवड करण्यात येते. याचा विपरीत परिणाम होऊन पावसाळ्यानंतर एक एक वृक्ष कोलमडायला लागते या नंतर येणाऱ्या उन्हाळ्यात वृक्ष कोरडे पडतात व मरतात. त्यामुळे शासनाचा वृक्ष लागवडीसाठीचा करोडो रुपयांचा निधी वाया जातो. या बाबीचा विचार न करता दरवर्षी फक्त करोडोंच्या संख्येने वृक्षांची लागवड मोहीम राबविण्यात येते. परंतु लावलेले वृक्ष जास्त प्रमाणात जगतील कसे? याची खबरदारी मात्र घेण्यात येत नाही. त्यामुळे शासनाने याचे गांभीर्य ओळखून विविध उपाय योजना आखणे गरजेचे आहे.

०-------------------------------------------------०

परिसरानुसार रोपांची निवड-

● मंदिर व धार्मिक स्थळे- या ठिकाणी धार्मिक कार्यासाठी लागणारी पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या झाडांची लागवड करावी. उदा. चंदन, वड, उंबर, पिंपळ, नागचाफा, शमी, बेल, कैलासपती, सोनचाफा, गोरखचिंच, खैर, आंबा, जास्वंद, केवडा इ.

०-----------------------------------------------------०

● स्मशानभूमी व सार्वजनिक जागा- या परिसरात कचरा न करणारी काटे नसलेली सदाहरित व उंच वाढणाऱ्या रोपांची लागवड करावी. उदा. कदंब, वड, पिंपळ व शोभेची झाडे इत्यादी लागवड करावी.

०----------------------------------------------------०

● रस्त्याच्या दुतर्फा- या परिसरात सरळ उंच जाणारी व सावली देणारी तसेच फळे व फुले येणारी झाडे लावावीत. उदा. वड, चिंच, बकुळ, आंबा, कांचन, आपटा, कदंब, अशोका, सुरू, सिल्वरओक, सुरंगी, नारळ, करंज, रेन ट्री, सीताअशोक, सुरमाड आदी झाडांची लागवड करावी.

-०-------------------------------------------------------०

● शेतात व विहिरीजवळ- या ठिकाणी सावली देणाऱ्या झाडांची लागवड करावी उदा कदंब सीता अशोक आंबा जंगली बदाम कडुलिंब इ.

०-------------------------------------------------------०

● घराच्या परसबागेत- या ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार मनमोहक शोभिवंत फुलझाडे व फळझाडांची लागवड करावी. उदा हिरवा चाफा कवटी चाफा नारळ नागकेशर आंबा कढीपत्ता लिंबू पेरू

त्यातूनच परिसर समृद्ध व संपन्न होण्यास मदत मिळणार आहे

०----------------------------------------------------०

● पडीक जागा गायरान डोंगर भाग- या ठिकाणी गुरांना चारा देणारे, औषधी, जळणासाठी लाकूड देणारी बहुउद्देशीय झाडांची लागवड करावी. उदा. बोर सुबाभूळ कवठ अंजनी विलायती चिंच आवळा बेहडा हिरडा कडुलिंब बाभूळ ऑस्ट्रेलियन बाभूळ निलगिरी बेल शिवण फणस बिब्बा मोह पळस कोकम काटेसावर पांगारा इ.

०---------------------------------------------------------०

● पाण्याचे पाट नदी नाला- या ठिकाणी वनस्पती युक्त झाडांची लागवड करावी उदा करंज उंबर भेंड ताम्हण जांभूळ शिरीष कोकम बांबू फणस इ

०---------------------------------------------------------०

रोप लागवडीसाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून तीन फुट लांब, तीन फुट रुंद व तीन फुट खोल (३×३×३ फुट) या आकाराचे खड्डे करणे महत्वाचे असते. खड्डा केल्यावर त्यात बुरशीजन्य थायरॉन पावडर पाच ग्रॅम, उधी प्रतिकारक थायमेट पावडर पाच ग्रॅम टाकावे. खड्ड्यातील वरच्या थराची काढलेली माती खड्डा भरतांना सर्वात खालच्या थराला टाकावी. यानंतर खड्ड्यातील मातीत एक घमेेेली शेणखत मिक्स करावे. त्यानंतर रोपाच्या मुळ्या जमिनीत वाढण्यासाठी एसएसपी हे रसायनिक खत द्यावे. रोप लागवड असलेल्या प्लास्टिकची पिशवी ब्लेडच्या साह्याने अलगद कापून रोपाची लागवड करावी. रोपाच्या बुंध्याला मातीचा थर लावावा. यानंतर रोपाला एक बादलीभर पाणी द्यावे. रोपाला आधार देण्यासाठी चार ते पाच इंच लांब काठी गाडावी. रोपाच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड लावावे. या पद्धतीने रोपांची लागवड केल्यास रोप जगण्याचे प्रमाण अधिक असते.

▪️श्री- रावसाहेब चव्हाण (निसर्ग मित्र समिती अध्यक्ष शिरपुर)▪️

----------/--------/----------/-------

Updated : 7 July 2020 1:43 PM GMT
Next Story
Share it
Top