Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > २३ पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन

२३ पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन

अकोला- राज्यातील सरकारी अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि त्याचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर १७ ते २२ नोव्हेंबरपर्यत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेशी संबंधित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची कोव्हिड चाचणी केली जाणार आहे.शासनाने तसे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोनामुळे सर्वत्र २४ जूनपासून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण आतापर्यंत ऑनलाइन सुरू होते.मात्र आता राज्यात काहीसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व शाळा येत्या काळात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरळीतपणे सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मागील चार दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी केला असून, नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि शाळा सुरू केल्या जाणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. या प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी आणि त्यानंतरच त्यांना शाळांमध्ये प्रवेश द्यावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे. यासाठी सर्व खबरदारी घेण्याची जबाबदारी शाळा मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे.

Updated : 17 Nov 2020 6:22 PM GMT
Next Story
Share it
Top