Home > महाराष्ट्र राज्य > "शाळाबंद : स्कुलबसेसची चाके रुतलेलीच !"

"शाळाबंद : स्कुलबसेसची चाके रुतलेलीच !"

शाळाबंद : स्कुलबसेसची चाके रुतलेलीच !
X

▪चालक-मालक अडचणीत▪कर्जहप्ते थकले▪घर चालविणेही अवघड▪पर्यायी नोकरीच्या शोधात, मात्र नोकरीही मिळेना▪स्कुलबस व्यावसयिकांवर नैराश्याचे सावट

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

त-हाडी : महेंद्र खोंडे

शासनादेशानुसार अद्याप शाळांना परवानगी मिळालेली नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतुक करणारे स्कुलबस चालक-मालक अडचणीत आले आहेत. उत्पन्नाचे साधन म्हणून मोठे कर्ज घेत स्कुलबस खरेदी केलेल्या बसमालकांनी उत्पन्न होत नसल्याने गाड्या दारासमोर उभ्या केल्या आहेत. बससाठी घेतलेल्या कर्जाची परतफ़ेड करायची कशी या विवंचनेत मालकवर्ग आहेत तर दुसरीकडे चालकवर्गदेखील वेतन नसल्याने मोठ्या अडचणीत आला आहे. पर्यायी नोकऱ्यादेखील उपलब्ध नसल्याने त्यांच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे अनेकांचे आयुष्य अडचणीत आले आहे. यात स्कुलबस चालक-मालकांचाही प्रश्न आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कुलबसेस सज्ज असतांना शाळाबंदमुळे त्यांच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात व ग्रामीण भागात हजाराच्या वर स्कुलबसेसची संख्या आहे. बहुतेक शाळांकडे स्वत:च्या स्कुलबसेस आहेत. त्यांनी चालकांना वेतनावर नेमलेले आहे. दुसरीकडे अनेकांनी स्वत:ची बस खरेदी करुन शाळांवर लावली आहे. काही मालक स्वत: तर काहींनी चालक ठेवलेले आहेत. मात्र सध्या शाळा बंद असल्याने या स्कुलबसेसची चाके अद्याप रुतलेलीच आहेत. यामुळे स्कुलबस मालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन-प्रशासनाने या वर्गाकडेही लक्ष देण्याची विनंती संबंधित व्यावसायिकांनी केली आहे.

"कर्जफ़ेड कशी? मालक अडचणीत"

▪अनेकांनी उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून स्कुलबस व्यवसायाची निवड केली. यासाठी बँकांकडून मोठे कर्ज घेतले, आतापर्यंत सर्व ठिक होते. हप्ते वेळेवर भरले. परंतु कोरोनामुळे शाळा उघडण्यास परवानगी नसल्याने स्कुलबसेसदेखील बंद ठेवाव्या लागल्या. परिणामी उत्पन्न होत नसल्याने हप्ते थकले आहेत. बँकांची कर्जफ़ेड कशी करावी तसेच कुटुंब कसे चालावावे असे मोठे प्रश्न स्कुलबस मालकांपुढे उभे ठाकले आहेत.

"चालक पर्यायी नोकरीच्या शोधात !"

▪स्कुलबस मालकांप्रमाणेच चालकदेखील अडचणीत आले आहेत. मालकाकडुन वेतन बंद झाल्याने तसेच टुरीझम बंद असल्याने इतर कुठेही त्यांना काम मिळेनासे झाले आहे. घर चालविणे गरजेचे असल्याने चालकवर्ग पर्यायी नोकरीच्या शोधात पायपीट करत असल्याचे चित्र आहे. नोकरी मिळत नसल्याने तसेच शिक्षण कमी असल्याने काही चालकांनी भाजीपाला व्यवसाय तर काहींनी मातीकामदेखील स्विकारले आहे तर काही जण गावी गेले असल्याची माहिती स्कुलबस मालक जितेंद्र खैरनार यांनी दिली. कोरोनामुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर गडांतर आल्याने स्कुलबस चालकांसमोर घर चालविण्यासाठी यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

"आयुष्यापुढे प्रश्नचिन्ह !"

▪मी शेती करतो. जोडधंदा म्हणुन स्कुलबसचा पर्याय निवडला होता. बँकेकडून कर्ज घेत व्यवसाय सुरु केला. प्रतिसादही चांगला मिळाला. मात्र आता अडचणी सुरु झाल्या आहेत. कर्जहप्ते थकले. उत्पन्न नसल्याने घर चालविणे अवघड झाले आहे. असल्याने . पर्यायी नोकरीसाठी अनेक ठिकाणी विचारपुस केली मात्र नकार मिळाला. यामुळे आता पुढील आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

-नितीन साळुंखे (स्कुलबस चालक-मालक त-हाडी)

"स्कुलबस संघटनाच नाही !"

▪दरम्यान, सर्वच व्यावसायिकांच्या संघटना असल्याने त्यांचे प्रश्न शासनपुढे मांडण्याचे काम संघटनांमार्फ़त होत असते. परंतु शहरात व ग्रामीण भागात स्कुलबस चालक-मालकांची एकही संघटना अस्तित्वात नसल्याची माहिती काही चालक व मालकांनी दिली. यामुळ त्यांचे प्रश्न अधांतरीच आहेत. शहरातील व ग्रामीण भागातील स्कुलबस चालक व मालकांनी एखादी संघटनेची बांधणी करावे अशी मागणी अनेक चालक व मालकांनी व्यक्त केली आहे.

-----------------@

Updated : 11 Aug 2020 11:13 AM GMT
Next Story
Share it
Top