Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > विद्रोही सातपुतेचा विजय असो

विद्रोही सातपुतेचा विजय असो

विद्रोही सातपुतेचा विजय असो
X

"मारावे पण किर्ती रुपी उरावे" असी म्हण आहे.चळवळीतील किर्याशील कार्यकर्ता,नेता शरीराने आपल्यातून निघुन जातो पण विचाराने तो सतत आपल्या बरोबर असतो.यांची जाणीव मिटिंगा,चर्चासत्रे,आंदोलने जुने मित्र एकत्र भेटले की हमखास होते.असाच एक मनस्वी कार्यकर्ता,विद्रोही लेखक,कवि,असंघटित कामगारांना संघटीत करणारा नेता विजय गोविंद सातपुते यांचे 20 जुलै 2014 रोजी गोरेगाव रायगड जिल्हा येथे निधन झाले.पण आज ते त्यांच्या नेत्रदान व अवयवदाना मुळे अजरामर आहेत.म्हणूनच त्यांच्या स्मृतीदिनी कोणत्याही धार्मिक विधी न होता. दरवर्षी विविध विषयावर व्याख्यान, परिसंवाद ठेऊन स्मृतीदिन साजरा केल्या जातो.

पहिला स्मृतिदिनी विजय सातपुते स्मृती विशेषांकांचे व कविता संग्रहाचे प्रकाशन व "लिखदे डॉट कॉम" या संकेत स्थळाचे उदघाटन अन्वर राजन, डॉ श्यामला गरुड यांच्या हस्ते धुरू हॉल दादर येथे संपन्न झाला होता.

दुसरा स्मृतिदिना निमित्ताने "सैराट सिनेमाच्या पलीकडे" या विषयावर परिसंवाद होता,संजय पवार,प्रतिमा परदेशी, सुरेश सावंत,लता. प्र. म.हे प्रमुख वक्ते होते.तो काशिनाथ धुरू हॉल दादर येथे झाला होता,

तिसरा स्मृतिदिन "समतावादी चळवळीची दशा आणि दिशा" परिसंवाद रविंद्र नाट्यगृह मिनी थिटर प्रभादेवी येथे झाला होता,त्यात रेखा ठाकूर,डॉ दिपक असरोडकर हे प्रमुख वक्ते होते,भीमा तुझे मुले नापास का होतात?.हे एकपात्री नाटक प्रथमेश पवार यांनी सादर केले होते.चौथा स्मृतिदिन गोरेगाव येथे अवयव दान,व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात झाडे लावुन झाला होता. चौथ्या स्मृतिदिनी गोरेगाव येथे अवयव दान जागृती व्याख्यान ते पण अवयवदानामुळे जिवंत असलेल्या डॉ विनय कोपरकर यांचे झाले होते.तेव्हा गोरेगाव कारांचा आवाज होता सातपुतेचा विजय असो!.त्यांचा पाचवा स्मृतिदिन 20 जुलै ला वनमाळी हॉल दादर येथे अ.ह. साळुंखे एक विचारधन प्रदर्शनाचे लोकपर्ण यावर चर्चा संवाद होऊन वैचारिक प्रबोधन करून साजरा करण्यात आला होता.यावर्षी कोरोना मुळे कोणताही कार्यक्रम घेता येत नाही. म्हणून नाविन्यपूर्ण "कार्यकर्ता कवीची सृजनशील घुसमट" (वेब कविसंमेलन) विजय सातपुते सहाव्या स्मृतिदिना निमित्त आयोजित केला आहे.

भारतात गरीब कुंटुंबाची आर्थिक कोंडी नेहमीच होत असते.त्यामुळे त्यांची मुलंमुली शिक्षणा पासुन वंचीत राहतात.शिक्षण नाही तर नोकरी नाही. नोकरी नाही तर कोणतीच प्रगती नाही.त्यामुळे त्यांना शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक आणि आर्थिक संकटांना सतत संघर्ष करावा लागतो.या सर्व संकटावर मात करून जो नेहमी विजय होतो.आणि स्वतःची वैचारिक ओळख निर्माण करतो तोच खरा विजय असतो.असा माझ्या जीवनात आलेला आणि मला भिम भक्ताचा वैचारिक भिमसैनिक, शिष्य बनविणारा माझा जिवलग मित्र म्हणजेच सातपुतेचा विजय.विषय कोणताही असो सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक, आर्थिक किंवा राजकीय यावर वैचारिक चर्चा, वादविवाद,संवाद, परिसंवाद यात अभ्यासपूर्ण उत्तर देऊन समोरच्याला निरुत्तर करून सातपुतेचाच विजय होत असे.ज्याला विजय सातपुतेचे विचार पटले नाही.त्यांनी त्यांचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केल्यास .कोणत्या पुस्तकात लिहले?. कोणी लिहले?.ते पुस्तक तुम्ही वाचले काय?.या रोख ठोक प्रश्नाने विजय सातपुते सर्वांची बोलती बंद करीत होते.यातुन मान्यताप्राप्त नेते,विचारवंत सुद्धा सुटले नाहीत.हे मी त्यांच्या सतत सोबत असल्यामुळे अनुभवले.

चळवळ म्हणजे काय?.हे जाणुन घेण्या करीता आम्ही १९८२ ते १९८५ पर्यंत जाहीर व्याख्यान, परिसंवाद चर्चा सत्राचे आयोजन करीत होतो. त्यामुळे समाजवादी, राष्ट्र सेवा दल,डाव्या आणि आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांच्या घरी भेटी घेऊन त्यांच्या सोयीने तारीख, वेळ ठिकाण ठरविणे त्यामुळेच त्यांची जवळुन ओळख झाली.कॉम्रेड शरद पाटील यांच्यामुळे डावी चळवळ तिची विचारधारा कार्य आणि कृती दिसुन आली.नामांतर आंदोलनात कॉम्रेड शरद पाटील यांनी आदिवासीनां मोठ्या प्रमाणात मोर्चा, आंदोलनात उतरून स्वतः जेलची शिक्षा भोगली होती. जातीच्या प्रश्नावर रोख ठोक भूमिका त्यांनी घेतली त्यातुन डाव्या विचारधारेची मंडळी जगातील कामगारांना भांडवलदारांच्या शोषणा विरोधात संघर्ष करण्यास उतरतात.पण जातीव्यवस्थेमुळे होणाऱ्या शोषणा विरोध लढण्यास तयार होत नाही.नि रोखठोक भूमिका घेत नाही.हे विजय सातपुते यांच्यामुळे कॉम्रेड शरद पाटील सोबत काम करण्यास मिळाल्यामुळे समजले.

विजय सातपुते,अंकुश भोळे आणि मी सत्यशोधक झोपडपट्टी आंदोलनच्या बॅनर खाली बुद्ध आणि कृष्ण, कार्ल मार्क्स आणि आंबेडकर यांच्यावर वैचारिक अभ्यासपूर्ण बोलणाऱ्या चळवळीती दिग्ज नेत्यांना परिसंवाद,व्याख्यानाला बोलावुन प्रबोधन करून अज्ञान दूर करीत होतो.तेव्हा आंबेडकरी चळवळीतील राजा ढाले,अरुण कांबळे आणि नामदेव ढसाळ ही तीन दलित पँथरचे महान विचारवंता बरोबर चर्चा,संवाद परिसंवाद घेण्यातुन वैचारिक बैठक पक्की झाली.विचार आणि आचरण त्यातुन कृतीकार्यक्रम विजय सातपुते नियमित घेत असत.तर दुसऱ्या बाजुला कृष्ण,कार्ल मार्कस यांच्यावर वैचारिक अभ्यास असणारे आणि बोलणारे म्हणुन नलिनी पंडित,पुष्पा भावे,मधू शेट्ये,प्रभाकर संझगिरी आणि मार्क्सवाद फुले आंबेडकरवादा मफुआ मांडणारे कॉम्रेड शरद पाटील यांच्या सोबत व्यक्तिगत चर्चा,संवाद परिसंवाद व्याख्यान घेण्याचा खूप अनुभव विजय सातपुते मुळे आला. त्यातील एक गंभीर प्रसंग कायम लक्षात राहणारा. मार्क्स आणि आंबेडकर या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यासाठी राजाभाऊ ढाले यांच्या घरी गेल्यावर त्यांनी पहिला प्रश्न केला तुम्ही कोण?. तुम्हाला हे उठाठेव करण्याची गरज काय?. त्या पुष्पा भावे,नलिनी पंडित यांना बुद्ध, आंबेडकर यांच्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे?. त्यांना आंबेडकर यांनी स्वीकारलेला बुद्ध धम्म स्वीकारला पाहिजे.त्या शिवाय त्यांनी आम्हाला बुद्ध आंबेडकर शिकाऊ नये. कॉम्रेड शरद पाटील यांच्या बरोबर प्रा अरुण कांबळे,नामदेव ढसाळ,रावसाहेब कसबे इतर विचारवंत चर्चा संवाद परिसंवाद करीत असत.पण राजाभाऊना त्यांची माफुआ भूमिका मान्य नव्हती.कम्युनिस्ट जातीच्या प्रश्नावर कधी बोलत नाही लढत नाही.त्यांनी आंबेडकरावर बोलु नये. राजाभाऊ ऐवडे रोखठोक बोलल्यावर आमची बोलतीच बंद झाली.मला याविषयावर बोलायचे नाही निघा तुम्ही!. तेव्हा आम्ही तीनचार लोक घराच्या बाहेर आलो विजय सातपुते उभेच होते.राजाभाऊ तुम्ही खरेच बुद्धिजीवी आहात काय?. तुमच्या शोकेस मध्ये महात्मा फुले यांचे समग्र वाङमय ठेवले आहे.त्यांचा आणि आंबेडकर यांचा काय संबध ?. महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म बाबासाहेबांनी का नाही स्वीकारला?. राजाभाऊ लाल झाले. चला बाहेर मला वाद नाही घालायचा!. परत आम्ही सर्व बाहेर आणि सातपुते एक पाय आत एक पाय बाहेर व राजाभाऊ दरवाजा बंद करण्यास उभे.तेव्हा एक गिलास पाणी मिळेल काय?. राजाभाऊ नी परत बोलविले पाणी दिले तेव्हा विजय सातपुते मधील हजारजवाबी पण पाहुन एक गिलास पिण्याच्या पाण्यामुळे महाड क्रांती सत्याग्रह आठवला.आणि राजाभाऊ सारख्या संतापलेल्या विचारवंत माणसाने सातपुतेनां पाणी पाजले आणि सातपुतेचा विजय झाला.

विजय सातपुते यांचे प्रचंड वाचन होते.त्याचं बरोबर ते अभ्यासपूर्ण लिखाण करीत असत.अब्राह्मणी सत्यशोधक मासिक सहा वर्षे आणि सत्यशोधक महाराष्ट्र पत्रिका मासिक त्यांनी तेरा वर्ष अखंड प्रकाशित केले होते. एखादा विषय निवडून त्यावरील विविध लेखकांचे मत काय होते.ते जाणुन घेऊन ते संघटनेच्या माध्यमातून राबविण्यासाठी संघर्ष समिती स्थापन केली होती. विशाल महाराष्ट्र आंदोलनाच्या वतीने लक्षवेधी आंदोलन,अभियान राबवित होते.मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेते ढोंगी आहेत.त्यांनीच मुंबई महाराष्ट्राची वाट लावली. परप्रांतीय उत्तर भारतीय लोकांच्या विरोधातील शिवसेनेचे आंदोलन स्वार्थासाठी होते. त्यांच्या हाती मुंबईतील महानगरपालिका होती तेव्हा त्यांनी परराज्यातून आलेल्या लोकांना रहिवासी होता येणार नाही असा कायदा बनविला असतात. तर आज मुंबई महाराष्ट्र उत्तर भारतीय लोकांचे सर्व क्षेत्रातील वर्चस्व दिसले नसते.तेव्हा विजय सातपुते यांनी भैय्या हटाव!. मुंबई महाराष्ट्र बचाव !.अशी तंबी देणारे पोस्टर काढून सर्व सार्वजनिक ठिकाणी लावले होते. त्यासाठी मुंबईतील 221 नगरसेवकानां लेखी निवेदन देऊन या विरोधात आवाज उचलण्याची विनंती केली होती. मुंबईतील परप्रांतीय बिल्डर,ठेकेदार,सुरक्षा रक्षक यांच्या विरोधात शिवसेना प्रमुखानी ठोस भूमिका घ्यावी असे जाहीर आव्हान केले होते.पण राज ठाकरेच्या नेतृत्वाखाली गोरगरीब फेरीवाले, हातगाडीवाले, टॅक्सीवाले आणि नाक्यावर उभे राहणारे मजूर यांना मारहाण करून मराठी माणसाच्या साठी लढण्याचे नाटक केले जात आहे या विरोधात विजय सातपुते सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करून संघर्ष करीत होते ते ही कोणतीही भीती न बाळगता. विजय सातपुते यांनी थोडया व्यवहारिक तडजोडी केल्या असत्या तर प्रचंड जनआंदोलन उभे राहिले असते. अनेक शिवसेनेचे नगरसेवक मदत करण्यासाठी तयार होते.पण पुढे येत नव्हते.ही वैचारिक ढोंगबाजी सातपुतेनां मान्य नव्हती.

मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी ओबीसी मध्ये जनजागृतीसाठी ऍड जनार्दन पाटील,जगन्नाथ कोठेकर,रेखा ठाकूर यांनी "मंडल ते कूमंडल" हे अभियान राबविले त्यात विजय सातपुते यांचा मोठा पुढाकार घेतला होता.आंबेडकरी चळवळीतील गटबाजी संपावी म्हणून त्यांनी असंघटित कामगारांना आपल्या नेत्यांना आमच्या कोणत्या समस्या वर आपल्याकडे उत्तर आहे ते जाहीर पणे विचारा, त्यावर त्याच्या कडे कोणती योजना आहे त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयी धोरण कधी वाचले काय?. असे विचारण्याचे आवाहन करीत असत.त्यांमुळे मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टीत राहणार असंघटित नाका कामगार, घर कामगार,कचरा वेचक कामगारात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत होती.बहुसंख्येने कामगार नाक्यावर आमच्या संघटने सभासद असत. पण आपल्या नगरात गेले की त्यांच्या जातीच्या पक्षातील कोणत्यांनां कोणत्या गटाचे सभासद,किंवा कार्यकर्ते असत. नाका कामगार, घरकामगार, कचरावेचक कामगार हे नागरिकांना मोठ्या प्रमाणात सेवा देतात त्यांची नांव नोंदणी झाली पाहिजे त्यांना ओळख पत्र मिळाले पाहिजे,नाक्या नाक्यावर कामगारांना उभे राहण्यासाठी शेड बांधून मिळाले पाहिजे यासाठी मुंबईतील प्रत्येक नगरसेवकांना पत्र दिले होते.चंद्रकांत हंडोरे महापौर असतांना रत्नाकर गायकवाड सहाय्य पालिका आयुक्त होते त्यांनी जिथे वाहतुकीला अडचण होणार नाही असा ठिकाणी शेड बांधण्यात येईल असे आश्वासन दिले होते.पुढे त्यांची बदली झाली.यासाठी विजय सातपुते सतत सर्वांशी संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करीत होते, त्यासाठी लक्षवेधी धारण आंदोलन केले होते. विजय सातपुते ही व्यक्ती कधी शांत बसणारी नव्हती.शिवसेना बहुजन समाजातील मुलांना मोठया प्रमाणात जयभवानी जय शिवाजी घोषणा देऊन मागासवर्गीय समाजावर अन्याय, अत्याचार करीत होती, छत्रपती शिवाजी महाराज हे गोब्राम्हण पतीपालक होते हे मराठी माणसाच्या मनावर कोरण्याचे काम करीत असतानाच ते रोखण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे.यासाठी कॉम्रेड शरद पाटील यांच्या बरोबर चर्चा केली असता त्यांनी स्त्री शूद्रांचा राजा! हे उत्तम नाटक लिहून दिले.त्यांचे प्रकाशन आम्ही केले त्यावर नाटक बसविण्यासाठी अनेक हौशी कलावंतांना संपर्क केला. शिवसेनेच्या शिवाजी महाराजा विरोधात खरा छत्रपती शिवाजी महाराज सांगणे कठीण आहे असे सांगणारे लोक भेटले तरी एक हजार पुस्तके विजय सातपुते यांनी धर्मवीर आनंद दिघे पासुन यशवंत जाधव नगरसेवक यांच्या पर्यंत शिवसैनिकानां मोफत वाटले.

फुले आंबेडकर चळवळीचे उद्धिष्ट काय?. यावर विविध कार्यकर्ते,पत्रकार,साहित्यिक व विचारवंत यांना विचारले व चर्चा केली. प्रत्येकांना लेखी मांगीतले कोणीच तसे दिले नाही.पण कॉम्रेड शरद पाटिल, अन्वय कबीर,प्रमोद पाटिल आणि विजय सातपुते यांनी लिहलेले लेख एकत्र करून फुले आंबेडकर चळवळीचे उद्धिष्ट काय?. हे पुस्तक प्रकाशित केले.कोणत्याही चळवळीला निश्चित असे उद्धिष्ट असल्याशिवाय त्या चळवळीमागे ध्येयवादी कार्यकर्त्यांची भक्कम व चिवट अशी फळी उभी राहत नाही.कम्युनिस्टां समोर वर्गविहिन साम्यवाद आणण्याचे उद्धिष्ट आहे.तर हिंदुत्ववाद्यांसमोर हिंदुराष्ट्र आणण्याचे उद्धिष्ट आहे.परंतु फुले आंबेडकर वाद्यांसमोर कोणते असे उद्धिष्ट आहे की ज्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून द्यावे?. यावर आमचे असे मत आहे की जातीव्यवस्थांत हे जरी फुले आंबेडकरी चळवळीचे आजचे प्रधान उद्धिष्ट असले तरी तिचे अंतिम उद्धिष्ट बुद्धाने वर्णजातीविहिन उपासक,उपाशीकांचा जो संघ उभा केला त्या संघाचे आजच्या काळात उच्च पातळीवर पुनर्जीवन करणे हे आहे.आज ही आंबेडकरी चळवळीतील एकवाक्यता कोणत्या प्रश्नावर,समस्या वर होत नाही.विजय सातपुते हे अशा गांभीर्याने विचार करून समाजात कार्यकर्त्यांत चर्चा घडवुन आनीत होते. त्यासाठी त्यांनी महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती अभियान समिती स्थापन केली होती.मुंबईतील दोनशे बुद्धविहारात त्यांनी मिटिंग घेतल्या होत्या.चंद्रकांत गमरे,दादासाहेब सकपाळ यांच्या आर्थिक मदतीने त्यावर पुस्तिका प्रकाशित केली.त्यांच्या पांच हजारांच्या तीन आवृत्या काढल्या.प्रत्येक चळवळीतील कार्यकर्त्या समोर विजय सातपुते हा विद्रोही सत्यशोधक म्हणून ओळखल्या जात होता.पूर्णवेळ काम करण्यासाठी त्यांनी भारत पेट्रोलियम कंपनीतील उच्च पदावरील सुरक्षित नोकरी सोडून निवृत्ती घेतली.त्यात नंतर त्यांना गंभीर आजाराने पछाडले होते. ऑपरेशन झाले तरी एकदोन वर्ष जगणार आणि ऑपरेशन नाही केले तर किती वर्षे जगायचे हे तुमच्या हातात आहे. हे डॉक्टर ने सांगितले होते. तरी हा माणूस बिलकुल खचला नाही परिस्थितीला समर्थपणे तोंड देत बारा वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात लक्षवेधी कार्य करीत जगला. शेवटची सहा वर्षे गोरेगाव मध्ये राहून रायगड जिल्ह्यात काढले.मरावे पण किर्ती रुपी जगावे. मृत्यू पूर्वी नेत्रदान अवयव दान यांचे महत्व सांगणारा विजय सातपुते यांच्या मृत्यूनंतर सिरत सातपुते यांनी त्यांचे नेत्रदान करून त्यांचा संकल्प पूर्ण केला.यावर्षी कोरोना मुळे कोणताही कार्यक्रम घेता येत नाही. म्हणून नाविन्यपूर्ण "कार्यकर्ता कवीची सृजनशील घुसमट" (वेब कविसंमेलन)

विजय सातपुते सहाव्या स्मृतिदिनानिमित्त केले होते.त्यात परिवर्तनवादी चळवळीचा विजय सातपुते आयुष्यभर भाग होता, त्या चळवळीतील कार्यकर्त्यांची कविता, दिनदुबळ्या, वंचित व दुर्लक्षित घटकांसाठी अहोरात्र तळमळणाऱ्या संवेदनशील कार्यकर्त्यांच्या मनातली कविता, या कार्यकर्ता कवींची सृजनशील घुसमट या निमित्ताने व्यक्त व्हावी यासाठी हे वेब कविसंमेलन आयोजित करण्यात आले होता.त्यात अनेक कार्यकर्ता कवींनी भाग घेतला होता.

विद्रोही सत्यशोधक विजय सातपुते यांचा मृत्यूनंतर ही सातपुतेचा विजय होत आहे.तो कार्यकर्त्यानां नेहमी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला विनम्र अभिवादन

सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई 9920403859,

Updated : 27 July 2020 6:42 AM GMT
Next Story
Share it
Top