Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > वडील असेही असतात !

वडील असेही असतात !

वडील असेही असतात !
X

या लेखात माझे दादा( वडील )मावणारच नाहीत. वडील म्हटले की, विशिष्ट अंतर, धाक , चर्चा, संभाषणाचे विषय ठरलेले. पण माझे दादा श्री. मुरारराव लांडे या टिपिकल वडील या संज्ञेत कुठेच न बसणारे. माझ्या दादांनी बी.ए. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून केले. महाविद्यालयीन तिसऱ्या वर्गाचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. चार वर्षे शारदा मंडळाचे अध्यक्ष होते. नंतर अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात दोन वर्ष वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष होते.आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत सतत सहा वर्षे भाग घेऊन त्यांनी स्टेज गाजवले, नंबर पटकावले . आकाशवाणी नागपूर वरून काव्य गायन स्पर्धेत भाग घेतला. सुरेश भट, मधुकर केचे, शाहीर अमर शेख,केशव मेश्राम, वामन इंगळे, बाजीराव पाटील, देवीदास सोटे, सुदाम काका देशमुख हे सर्व दादांचे मित्र. मजुरांसाठी दादांच्या नेतृत्वात आंदोलन झाले होते, त्यात त्यांना जेलमध्ये जावे लागले होते. दादांनी १९६५मध्ये ' महात्मा ज्योतिबा फुले ' शिक्षण संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 'रविंद्रनाथ टागोर विद्यालय ' मानोरा 'आणि 'समता विद्यालय ' कुपटा ह्या दोन शाळा काढल्या.दादांचे कर्तृत्व खूप मोठे होते.

माझे दादा अतिशय हळव्या मनाचे कवी. प्रत्येकावर निरपेक्ष प्रेम करणारे, हक्काने प्रेम करायला लावणारे, माणसं जोडणारे, प्रत्येक क्षण भरभरुन जगणारे,सतत वाचन करण्यात व्यग्र असणारे. खूप आठवणी आहेत दादांच्या, पण इतरांच्या वडिलांपेक्षा असलेलं वेगळेपण तेवढं मला मांडायचं आहे. कारण इतरांचे वडील पाहिले, त्यांच्या बद्दल ऐकले अन् माझ्या दादांविषयी विचार केला तर वाटतं, असेही वडील असतात का कुणाचे?एक क्षण वाटतं का नसावेत सर्वांचे वडील माझ्या दादांसारखे !

आम्ही पाच बहिणी. लेखन, वाचन हा प्रत्येकीचाच छंद. अर्थात तो आमच्या दादांमुळे आमच्यात खोलवर रुजलेला. दादा दिवसरात्र वाचन करायचे. आवडलेला उतारा आम्हा सर्वांना आईसह ऐकण्याची सक्ती असायची. दादांनी सांगितलेल्या गोष्टींवर, त्यांनी लिहिलेल्या, गायलेल्या कवितांवर, मानवतावादी विचारांवर आम्हा सर्वांचे पोषण झाले. आजही घासातला घास देण्याची वृत्ती सर्वांमध्ये आहे. कारण हा संस्कार आम्हांला वारशात मिळाला आहे. दादांचे आईवर आणि आम्हा सर्व बहिणींवर अतिशय प्रेम होते.आई -दादांचा प्रेमविवाह. दादांनी आईला लिहिलेले प्रेमपत्र एक वही भरुन मोठे ! त्या प्रेम पत्राची आजोबा, आजी, काका, आत्या, आम्ही मुली सर्वांनी अगदी पारायणे केलीत. असं कुणाच्या घरात असतं का हो ? कुणाचे प्रेमपत्र असं जाहीरपणे वाचतात का ? कदाचित त्यामुळेच प्रेम छानच असतं, प्रेम वाईट असूच शकत नाही , प्रेम करणाऱ्याने वाईट वागू नये हाच संस्कार आमच्यावर झाला. आज बरेच प्रगत झालोत आपण पण आजच्या काळात देखील नवरा बायकोनी मुलांसमोर प्रेम व्यक्त करू नये असं म्हटलं जातं. मुलं आली की ,जवळ जवळ बसलेले दोघे दचकून दूर सरकतात आणि प्रेम करणे म्हणजे काहीतरी वाईट असते हा संस्कार देऊन जातात. आमचे दादा आमचा खूप लाड करायचे, जवळ घ्यायचे,मुका घ्यायचे, आम्ही दादांजवळ झोपायचो, गोष्टी ऐकायचो, चर्चा करायचो. त्यांच्या प्रत्येक कामात सहभागी असायचो आम्ही. मंगरूळपीरला एक जळीत कांड झाले होते. २ मुलं अन् गर्भात बाळ असलेल्या स्त्रीला सासरच्या लोकांनी पैशांसाठी जाळून टाकले. तेव्हा खूप मोठा मूक मोर्चा काढला होता. निषेधाचे फलक आम्ही घरी तयार केले होते. दादांनी 'करूण पंचकम ' नावाची कविता त्या मृत्यू पावलेल्या स्त्रीवर लिहिली होती. जिथे मोर्चाची सांगता झाली , तिथे दादांच्या कवितेचे जाहीर वाचन करण्यात आले होते. तेव्हा स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या सीमाताई साखरे ( दादांची मानलेली बहीण ) रुपाताई कुळकर्णी या देखील आल्या होत्या.

आम्ही शाळकरी होतो तेव्हा आम्ही जे काही करत असू त्यात दादांचा सक्रीय सहभाग असे. दुर्गादेवी आणि गणपतीच्या समोर रोज कार्यक्रम होत असत. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभाग घ्यायचो. मी एक मूक नाटिका केली होती. दादांनी माईकवरून वाचली अन् मी अभिनय केला होता. प्रत्येक स्पर्धेत आम्ही पहिलाच क्रमांक मिळवायचो कारण आम्ही सादर केलेले सर्वांपेक्षा वेगळे असायचे. मार्गदर्शन दादांचेच असायचे .कॉलेजमध्ये असताना मी पाचही वर्षे विद्यार्थिनी प्रतिनिधी होते. कॉलेज मधील प्रत्येक वर्षी मी वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांकच मिळविला. दादांना म्हणायचे, दादा मला काही मुद्दे सांगाल भाषण द्यायचे आहे. दादा हो म्हणायचे, अन् ऐन वेळेवर, 'तुला काय सांगायची गरज आहे. तुलाच येतं सर्व ' म्हणून मुद्दे सांगायचे नाहीत. मी रडकुंडीला यायचे कारण भाषणासाठी नाव दिलेले असायचे. खूप राग यायचा दादांचा . पण माझा पहिला क्रमांक यायचा. असे वडील असतात का हो ,मुलीबद्दल इतका विश्वास असणारे ? मला आठवतं, चवथ्या वर्गात होते मी.विटी दांडू खेळताना विटी आणायला गेले अन् एका जुनाट विहिरीत घसरून पडले. खूप वर्षांपासून बंद पडलेली, पाणी अन् गाळ असलेली, अगदीच लहान तोंडाची विहीर. मला तेल घाणीत काम करणाऱ्या माणसाने बाहेर काढले. दादांनी त्या माणसाला नवीन कपडे घेऊन दिले. दादा त्या माझ्या प्राण दात्याला अनेकदा जेवायला बोलवत. मला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर घरी आईने टॉवेलने कोरडे केले. शाळेतल्या माझ्या बाई, मैत्रिणी भेटायला आल्या. दिवसभर भेटणारे येतच होते. मी मात्र थोडयाच वेळात परत खेळण्यासाठी पसार झाले होते. नुकतेच प्राणावरच्या संकटातून वाचणाऱ्या मुलीला लगेच खेळायला जाऊ देणारे असे आई - वडील असतात का हो ?

मी अनेकांची नक्कल करायचे. रागवण्याऐवजी दादा मला प्रोत्साहन द्यायचे. दादा अभ्यास नाही झाला, भीती वाटते, पेपर्स कसे जातील?दादा म्हणायचे अरे,एखादीने तर नापास होऊन दाखवा !कबड्डी खेळताना प्रतिस्पर्धी मुलीचा मी पाय पकडला होता. तिने मला घासत नेले, पूर्ण नाक सोसले गेले होते अन् माझे दादा मला बाहेरून ब्रेव्हो म्हणून चियरिंग देत होते. माझी लांब उडीसाठी विभागीय स्तरावरील निवड असो वा , विद्यापिठात खोखो कलर कोटसाठी निवड असो,दादांनाच सर्वाधिक आनंद झाला.दादांनी आम्हा सर्वांनाच जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. मुलगा कोणत्याही जातिधर्माचा चालेल पण निर्बुद्ध नको , स्वतंत्र बुद्धीचा असावा अशी अट मात्र होती. अनेक मित्र घरी येत. पण दादांनी कधी, मुलीचे चारित्र्य म्हणजे काचेचे भांडे असले डायलॉग्ज मारले नाहीत. मुलींवर इतका विश्वास टाकणारे असे वडील असतात का हो ?( पाचपैकी एकीनेही प्रेमविवाह केला नाही. )दादा एकदा म्हणाले होते बेटा सपन,नेहरू गेले तेव्हा इंदिरा गांधी रडल्या नव्हत्या. मोठमोठया कठीण प्रसंगांत खंबीर राहता आले पाहिजे. दादा गेले, फोन आला, अंदाज आला पण रडलेच नाही. दादांना आम्ही बहिणींनी अग्नी दिला. दादांची शिक्षण संस्था दादा गेल्यानंतर ८ व्या दिवशी हातात घेतली. याला कारण माझी आई दादांसोबत संस्थेचे प्रत्येक काम करायची आणि मी लग्नाआधी बायांची सरधोपट कामं न करता, संस्थेशी संबंधीत आणि इतर कामे केली. संस्थेचे ठराव लिहिणे, रजिस्टर करणे, पोस्टाची कामे करणे, लाकडे फोडणे, गडी आला नाही तर म्हशींचे दूध काढणे, आलेल्या पाहूण्यांना बस स्टँडवर पोहचवून देणे. (अगदी गर्दीत घुसून जागा करुन देईपर्यंत ) ही माझी कामं होती.आई - दादांनी खूप निकोप वाढ केली आम्हा सर्वांची.

दादांनी माझ्या डायरीत लिहिलेय, " बेटा सपन, मला वाटतं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तू इतके दैदिप्यमान यश मिळवावेस की, कोणाही लहान मुलीला, तुला मोठेपणी कोण व्हावयाचे आहे असे विचारले असता तिने उत्तर द्यावे, मला स्वप्ना लांडे व्हावेसे वाटते. " दादांच्या या वाक्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतेय.

डाॅ.स्वप्ना लांडे

मो.7507581148

Updated : 26 July 2020 6:48 PM GMT
Next Story
Share it
Top