Latest News
Home > लेख > स्वतः साठीसुद्धा व्हॅलेंटाईन व्हा!

स्वतः साठीसुद्धा व्हॅलेंटाईन व्हा!

स्वतः साठीसुद्धा व्हॅलेंटाईन व्हा!
X

डॉ.रवींद्र श्रावस्ती .

प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ,भारती विद्यापीठ सांगली.

संत व्हॅलेंटाईन हा प्रेमीयुगुलांचे मिलन घडविणारा महान व्यक्ती म्हणून जगभर प्रसिद्ध झालेला ख्रिस्ती संत आहे.त्याच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी जगभरातील प्रेमीयुगुले दरवर्षी "Valentine's day" साजरा करतात. Saint Valentine विषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. एका दंतकथेनुसार त्याने जेलरच्या मुलीला मैत्रीभावनेतून , तिच्या विषयीच्या ममत्वभावातून तिला मदत करण्यासाठी "from your Valentine" असे पत्र लिहिले म्हणून त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली.दुसर्या एका दंतकथेनुसार त्याने अनेक प्रेमीयुगुलांची गुपचूप लग्ने लावून दिली म्हणून चिडून जाऊन रोमन सम्राटाने त्याची हत्या केली. अशातर्हेने प्रेमिकांना मदत करताना बळी गेलेला एक महान हुतात्मा अशी त्याची ख्याती सांगितली जाते. प्रेम आणि जिव्हाळ्याचे (Love and affection ) प्रतीक म्हणूनसुद्धा त्याच्याकडे पाहिले जाते.

याचाच अर्थ व्हॅलेंटाईन हा प्रेमासाठी बळी गेलेला संत आहे. एकमेकांत गुंतलेल्यांना मदत करण्यासाठी त्याने आपले मौलिक प्राणही पणाला लावले. हे त्याने दुसऱ्यांसाठी केले . स्वतःसाठी नाही. प्रेमभावना , प्रेम मरू नये म्हणून त्याने महान त्याग केला.त्याने प्रेम वाचवलेच, पण त्याचबरोबर प्रेम हृदयांत जिवंत ठेवायला शिकवले. इतरांनाही आपला कित्ता गिरवावा यासाठी त्याने आपले उदात्त उदाहरण घालून दिले. त्याने हा त्याग केला नसता,जोखीम पत्करली नसती तर यातील काहींचे प्रेम यशस्वी झाले नसते . ते आयुष्यभर दुःखात जगले असते, आयुष्यभर प्रेमाच्या व्याकुळ आठवणींनी ते होरपळत राहिले असते.त्यातील काहींनी आत्महत्या सुद्धा केल्या असत्या. किंवा हिंसक बनून अनेकांच्या हत्याही केल्या असत्या.

हे Valentine पुराण सांगायचे कारण म्हणजे त्यातल्या गर्भित आशयाकडे आपले लक्ष मला वेधायचे आहे. इतरांच्या प्रेमासाठी , ते यशस्वी व्हावे म्हणून संत Valentine कामी आला. त्याद्वारे त्याने अनेक प्रेमिक तर जगवलेच पण मानवी प्रेमभावनेलाही जगवले, जिवंत केले.तिला उन्नत पातळीवर नेले. मानवांत वसलेली प्रेम भावना मरू नये यासाठी स्वतः मरण पत्करले . पण प्रेम मरू दिले नाही . प्रेमभावना मरू दिली नाही.

जगातील सर्व माणसे आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर, वळणावर प्रेम करतात.प्रेमात पडतात. ते यशस्वी झाले नाही तर उन्मळून पडतात. प्रसंगी आत्महत्येच्या मार्गाकडे वळतात. प्रेम गमावून बसलेली माणसे किरकिरी होतात,सूडाने पेटतात. मग अशा व्यक्ती प्रेम या भावनेला , सदर व्यक्तीला बदनाम करायला सरसावतात.आयुष्यात कडवट बनतात.क्रूर होतात.स्वतःवर सूड उगवतात.जगावरसुद्धा सूड उगवायला सुरू करतात.ही स्वहत्या किंवा समुहहत्या त्यांच्याकडून घडते.पूर्वीही हे घडले आहे आणि भविष्यातही हेच घडण्याची शक्यता उरतेच.यावर काय उपाय संभवू शकतो का? होय, निश्चितच . या प्रेम अरिष्टावर उपाय आहे. तो उपाय म्हणजे स्वतःच स्वतःचा "व्हॅलेंटाईन होणे" ! म्हणजे काय , तर संत व्हॅलेंटाईनने जगासाठी आपले स्वत्व पणाला लावले तसे आपण आपल्या प्रेमासाठी स्वत्व पणाला लावणे ! स्वतः स्वतःचा व्हॅलेंटाईन होणे!

याने काय होईल ? बाह्य जगातले आपले प्रेम यशस्वी नाही झाले तरी आपल्या हृदयात वसलेला व्हॅलेंटाईन आपल्या स्वतःच्या मनातली प्रेम भावना मरू देणार नाही. आपले प्रेम विफल झाले असले तरी. तो बळी जाईल पण आपल्यातले प्रेम मागे ठेवून बळी जाईल. दुसऱ्यासाठी व्हॅलेंटाईनने हे केले ! आपण का करू नये तसे ? तेही आपल्यासाठी ! आपल्या मनातले,हृदयातले प्रेम मरू नये म्हणून, इतरांच्या मनातले- हृदयातले प्रेम मरू नये म्हणून आपण स्वतःच " व्हॅलेंटाईन " व्हायला काय हरकत आहे ? यामुळे आपण कडवट होणार नाही, जगही कडवट होण्यापासून वाचेल ! आपल्या मनातील प्रेमाची आत्महत्या टळेल ! आपल्यातला प्रेमभावही जिवंत राहील ! आपल्यावर कुणी प्रेम केलं नाही , आपल्याला कुणीतरी फसवलं म्हणून किंवा आपण आपल्या जिवलगावर जिवापाड प्रेम करूनही त्याने आपले प्रेम हजाणले नाही म्हणून आपण निराश होणार नाही. कडवट होणार नाही.सूड उगवणार नाही. आपल्या मनी जपलेले प्रेम, हृदयांत वसलेले प्रेम जिवंत रहावे,त्याने मरू नये म्हणून आपण स्वतःच व्हॅलेंटाईन व्हायला हवे ! स्वतःला अधःपतनापासून वाचविण्यासाठी आणि प्रेम या सार्वत्रिकतेला अबाधित ठेवण्यासाठी आपण आपला असा " enlightened sacrifice" दिला पाहिजे ! स्वतःच स्वतःचा व्हॅलेंटाईन व्हायला शिकलं पाहिजे !

..................................................

डॉ.रवींद्र श्रावस्ती.

सांगली -४१६४१६


Updated : 13 Feb 2021 3:04 AM GMT
Next Story
Share it
Top