राळेगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या शेत मालाचे परतीच्या पावसामुळे नुकसान
X
आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांचे जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन
म मराठी न्यूज नेटवर्क
अमोल सांगानी/विशेष प्रतिनिधी
राळेगाव वडकी
मो.9860276226
यवतमाळ/ राळेगाव :- विधानसभा क्षेत्रातील राळेगाव तालुका , कळंब तालुका, बाभूळगाव तालुका आणि रूंझा मोहदा सर्कल मधील शेतकरी बांधवांच्या खरीप हंगामातील शेती मालाचे सप्टेंबर व ऑक्टोबर मधे झालेल्या परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे.शेतकऱ्यांची परीस्थिती अतीशय दयनीय झाली असून झालेल्या नुकसानीमुळे तोंडचा घास हिसकावुन घेतला गेला आहे.
सततच्या पावसामुळे कपाशीच्या बोंडाचे नुकसान झाले असून काळी पडलेली बोंड गळून खाली पडली आहे. तसेच नविन येणाऱ्या कपाशीच्या बोंडाना अळी ची लागण झाली आहे. तर वेचणी साठी आलेला कापूस पावसामुळे पूर्णपणे ओला झाला आहे. त्यामुळे कपाशीच्या मालाचा दर्जा घसरला असून बाजारात कवडीमोल भावाने व्यापारी वर्गाकडून खरेदी होत आहे. सी.सी.आय. खरेदीस विलंब होत आहे. 12 % पेक्षा जास्त आर्द्रता असलेल्या कापसाला हमी भाव मिळत नाही. सी.सी.आय खरेदी च्या वेळी कपाशीच्या आर्द्रतेची टक्के वारी 16% पर्यंत वाढविणे आवश्यक झाले आहे.
सोयाबीन पिक शेतात कापणीसाठी आले असतांना पावसामुळे ओलेचिंब झाले.उभ्या सोयाबीन च्या शेंगा मधून कोंब बाहेर येत असून कापणी झालेले सोयाबीन सडलेल्या अवस्थेत आहे. यामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मागणी नसून बेभाव खरेदी केल्या जात आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. वरचे वर येणाऱ्यां पावसामुळे होतं नव्हतं सगळंच मातीमोल झालेले आहे. पारंपारिक पध्दतीने आणेवारी काढल्या जात असल्यामुळे सततच्या पावसामुळे झालेले शेतीमालाचे नुकसान आणेवारीत प्रतिबिंबित होणं आवश्यक आहे.नजर पंचनामे करून तात्काळ तात्काळ प्राथमिक मदत शेतकऱ्यांना होऊ शकते.
राळेगाव विधानसभा क्षेत्रातील झालेल्या शेतीमालाचे तात्काळ नजर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना आसमानी संकटातून बाहेर येण्यासाठी शासनाने भरीव मदत करावी. याकरिता आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले...