Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > माणसाचं पाप, अन् बैलांना चाप ================(पोळा विशेष)

माणसाचं पाप, अन् बैलांना चाप ================(पोळा विशेष)

माणसाचं पाप, अन् बैलांना चाप ================(पोळा विशेष)
X

बा...सर्जा..माफ कर...

================

देवानंद जाधव

---------------------------------यवतमाळ : चपट्या नाकाच्या मुलुखाने अवघ्या जगाला कोरोणा आंदन दिला आहे, जगाच्या ऊरावर कोरोणा थयथय नाचतो आहे. याची झळ यंदा मुक्या जीवांच्या सण ऊत्सवाला बसली आहे. मंगळवारचा बैलपोळा लालफितशाहीत अडकला आहे.

देव,देश,धर्म,परंपरा अन् संस्कृतीची जपणुक प्रत्येक जण सातत्याने करत आलाय, यात अगदी भूमिपुत्र देखील मागे नाही. शेतकर्यांच्या भाकरीचा किंबहुना उदरनिर्वाहाचा गाडा आपल्या खांद्यावर घेऊन, परिवाराच्या भुकेची आग शमविण्यासाठी काबाडकष्ट करणारा आमचा बैल आज सजणार नाही. शेतकर्यांना कायम सावली सारखी साथ देऊन मदत करणारा शेतकर्यांचा सखा यंदा प्रथमच भर पोळ्याच्या दिवशी,"बोडखा " दिसेल. या केवळ कल्पनेनेच शेतकर्यांचा अवघा मराठी मुलुख अस्वस्थ झाला आहे. श्रावणात तमाम शेतकरी आपल्या शेतातील डुलणारी हिरवीकंच पिक बघुन ,सुगीची स्वप्न डोळ्यात पेरून घेत असतो. शिवाय श्रावणातच पंचक्रोशीतील पोशिंदा आशाळभुत नजरेने बैल पोळा सणाची, डोळ्यात प्राण ओतून प्रतिक्षा करत असतो. सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली असल्याचं आभाळभर संकट आणि दु:ख वेशीबाहेर ठेऊन मरगळ झटकत असतो. पण यंदा तमाम शेतकर्यांचा कोरोणाने हिरमोड केला आहे. दर्श पिठोरी अमावस्येला आणि श्रावणमास समाप्तीच्या दिवशी येणारा बैल पोळा हा ऊत्सव सर्वञ साजरा होत असतो. पण यंदा त्या ऊत्सवाला दृष्ट लागली. शेतकर्यांच्या सुखदुःखात साथ देणार्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करता येत नाही, याचे शल्य प्रत्येक शेतकर्यांच्या मेंदुला दुःखाच्या डागण्या देत आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना नदी नाल्यावर नेऊन, किंवा घरीच आंघोळ घातली जाते.

शेतकर्यांच्या स्वप्नांचा भार वाहुन नेता नेता घामाझोकळ आणि रक्तबंबाळ झालेल्या बैलांच्या खांद्यावर, आंबेहळद आणी गावरान लोणी गरम करून लावली जाते. आणि पेटत्या गोवरीने हलक्या हाताने आच दाखवुन, मायेच्या ममतेने फुंकर घातली जाते. याला " खांदे शेकणी "म्हणतात. पोळ्याच्या दिवशी सुर्य जसजसा डोक्याखाली सरकत जातो ,तसतसे तमाम भूमिपुत्र आप आपल्या लाडाच्या बैलजोडीला, आपल्या मुक्या जिवांना,नानाविध श्रृंगार अलंकारांनी सजवत असतात. हळद आणि लोणी मध्ये भिजवलेली कोरी करकरीत वेसन नाकात टाकल्या जाते. " मटाटी "कपाळावर लाऊन, गळ्यात तांब्या पितळेची साखळी, शिंगांना विविध रंग,बेगड, आदी श्रृंगार साहीत्य चढवून, मस्तकावर बाशिंग बांधले जाते. गळ्यात कासरा, पायात घुंगरु, गळ्यात घंटा, बांधुन बैलांना नवरदेवासारखे सजवीले जाते.शिवाय रंगी बेरंगी कापडापासुन निर्मित "झुल "बैलांच्या अंगावर टाकुन श्रृंगाराला अंतीम स्वरूप दिल्या जाते. गावातील बैलांची संख्या लक्षात घेऊन चौकात, आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते. त्याला "मेडी "म्हणतात. पोळ्यात सर्वप्रथम येण्याचा मान, गाव पाटलाच्या बैलजोडीचा असतो. ती जोडी ढोल, ताशा, डफडे, असे वाद्यात मिरवणूक द्वारे आणली जाते. मग अवघ्या गावातील जोड्या, तोरणाखाली ऊभ्या केल्या जातात. तेव्हा.गावकरी रंगात येतात, संपुर्ण गाव खेड्यातील लोकं सहभागी होत असतात. मग अस्सल मायबोली, बोलीभाषेतील झडत्यांच्या फैरी झाडल्या जातात.

" हेकडी..तिकडी..बाभुळ..

तिचा..हिरवा..हिरवा..पाला...

बना..बुढीनं म्हातारपणी..

जवान नवरा केला....

एक नमन कवळा......

पार्वती.......हरबोला....

हर....हर...महादेव..."

अशा आभाळ चिरत नेणार्या असंख्य विनोदी झडत्यांनी सर्वांच्याच मेंदूची मशागत होत असते. प्रथम मेडी च्या बैलाची पुजा करुन,प्रदक्षिणा घातली जाते. बैलांना पंचपक्वानाचा घास भरविला जातो. यावेळी ज्वारीचे पिठ आणि हळदीपासुन तयार केलेले पदार्थ वितरित करण्यात येते. याला"घाट "म्हणतात. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर मानाच्या जोडी मालकाने तोरण तोडल्या नंतर पोळा फुटतो. मग बैलजोडीचा धनी गावभर घरोघरी नेतो

तेव्हा शेतकर्यांच्या घरची " लक्ष्मी "बैलांचे कुंकम तिलक करुन पुजा करते. त्यांना ओवाळते. बैल जोडीला पुरणपोळीचा घास भरविते. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन त्यांच्या पायावर डोकं टेकवते. तंञज्ञान आणि विज्ञानाच्या यूगामध्येही पोळा आणि बैलांचे महत्व कमी झाले नाही. तोच शेतकर्यांचा " सखा "पोळ्याला सजणार नाही. हे वास्तव आहे. तेव्हा बा....सर्जा.

घरधन्याला क्षमा कर.

शेवटी कोरोणा मुळे..

"माणसाचं पाप अन् बैलांना चाप " अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

================

देवानंद जाधव

यवतमाळ (मंगरूळ)

98 81 139 126

================================

Updated : 18 Aug 2020 3:45 AM GMT
Next Story
Share it
Top