महाराष्ट्रातील बागप्रेमींनी रंगीबेरंगी फुलझाडे फुलविण्याचे घेतले धडे अमरावती गार्डन क्लब द्वारे “सिझनल प्लांट्स लागवड” कार्यशाळा संपन्न
X
सौ.अलकाताई गभणे द्वारा पुरस्कृत ऑनलाइन कार्यशाळा
स्वतः फुलविलेली झाडे नवचैतन्य प्रदान करतात – डॉ विलास देशमुख
[अमरावती जिल्हा प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे]
अमरावती :- निसर्ग सर्वात श्रेष्ठ! हे त्रिवार सत्य आपणा सर्वांना मान्य आहे आणि खरतर निसर्गच आपला मित्र सुद्धा आहे. निसर्ग नेहमीच मानवाला भरभरून देत असतो अशा निसर्गावर प्रेम करणाऱ्या त्याचे संवर्धन करणाऱ्या बागकार्मिंसाठी अमरावती गार्डन क्लबद्वारा रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२० रोजी सौ. अलकाताई गभणे पुरस्कृत “सिझनल प्लांट्स” - लागवड व संवर्धन, या कार्यशाळेचे आयोजन दुपारी २:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले. तणावरहित जीवनाचे गमक म्हणजे फुलझाडांची संगत आणि त्यांच्याशी गुजगोष्टी असे गुपित ज्याला समजले त्याला निश्चितच बागकामाची आवड निर्माण होते आणि छंद जोपासल्या जातो. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सद्यस्थितीत क्लब आपल्या वैविध्यपूर्ण आयोजनातून नाविन्य जपण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून कार्यशाळांचे आयोजन करत आहे.अशा प्रकारच्या आयोजनाला संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील नागरिकांनी भरगोस प्रतिसाद दिला आहे आणि त्यांच्या विशेष मागणीनूसार सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
अमरावती येथिल सुप्रसिद्ध विद्याभारती महाविद्यालयाच्या परिसरातील बगिच्या मागील चार दशकांपासून स्वत: वेगवेगळे प्रयोग करून ज्यांनी मौसमी फुलांनी फुलविला असे इंडियन रोज फेडरेशनचे मानद सदस्य, प्रा. डॉ. व्ही. आर. देशमुख, माजी अध्यक्ष, अमरावती गार्डन क्लब आणि वनस्पतिशास्त्र विषयाचे जेष्ठ प्राध्यापक यांनी कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शन केले. स्वतः फुलविलेली फुलझाडे आपल्याला, परिवाराला आणि संपूर्ण समाजाला नवचैतन्य प्रदान करतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मेहनतीने झाडे फुलवावी असे आवाहन त्यानी कार्यशाळेत केले. हंगामी प्रकारात येणाऱ्या वृक्ष, झुडपे, छोटी झाडे, वेळी, जमिनीवर पसरणारी अश्या अनेक प्रकारच्या हंगामी झाडांच्या विविध प्रकारांची आणि त्यांच्या लागवड व संवर्धनाची शास्त्रीय माहिती यावेळी दिल्या गेली. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात श्री सुभाष भावे, उपाध्यक्ष, अमरावती गार्डन क्लब आणि संचालक, किरण नर्सरी अँड गार्डन्स यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे सिझनल प्लांट्स ची लागवड कशी करावी हे दर्शविले. सिझनल फ्लॉवर्स बद्दल शास्त्रोक्त माहिती आणि प्रत्यक्ष कृती द्वारा प्रशिक्षण असे नियोजन असलेल्या या कार्यशाळेत राज्यभरातून अनेक बागप्रेमींनि सहभाग नोंदविलाआणि आपला बगीचा रंगीबेरंगी फुलांनी बहरविण्याच्या दृष्टीने श्री गणेशा केला. या कार्यशाळेत नागपूर, नांदेड, अहमदनगर, पुणे आणि मुंबई येथून सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्या नंतर तज्ञ मार्गदर्शकांकडून त्या शंकांचे निरसन विशेष सत्रात करण्यात आले आणि या सत्राचे आयोजन क्लबचे अध्यक्ष डॉ. दिनेश खेडकर यांनी उत्कृष्टरीत्या केले. क्लबचे सन्माननीय सल्लागार समिती सदस्य श्रीमती उर्मी शाह आणि पितृतुल्य डॉ. व्ही.आर. घुरडे यांनी महत्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला आणि सदर कार्यशाळेचे कौतुक करून मार्गदर्शकांची स्तुती केली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कार्यशाळा आयोजन सचिव सौ. शितल चितोडे, सहाय्यक प्राध्यापक, श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय यांनी केले आणि प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सचिव, डॉ. रेखा मग्गीरवार यांनी करून दिला. त्याचप्रमाणे तांत्रिक बाजू डॉ. उमेश कन्हेरकर, प्रा. मयूर गावंडे आणि डॉ गजेंद्र पचलोरे या कार्यकारिणी सदस्यांनी पार पाडली. सरते शेवटी क्लबचे कोषाध्यक्ष आणि कार्यशाळेचे संयोजक प्राचार्य डॉ. शशांक देशमुख यांनी आभार व्यक्त केले.
बॉक्स
यंदाच्या वर्षी नागरिकांनी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या तणावपूर्ण वातावरणातून मुक्त होण्यासाठी निसर्गावर प्रेम करावे विविधरंगी फुले आपल्या बगीच्यात फुलवून आपल्या कुटुंबासमवेत त्याचा आनंद घ्यावा या दृष्टीकोनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले- डॉ. दिनेश खेडकर, अध्यक्ष, अमरावती गार्डन क्लब, अमरावती...