Home > महाराष्ट्र राज्य > पविञ रक्षाबंधनाच्या सणाला लाॅकडाउनचा खोडा,आॅनलाईन शुभेच्छावर भर

पविञ रक्षाबंधनाच्या सणाला लाॅकडाउनचा खोडा,आॅनलाईन शुभेच्छावर भर

पविञ रक्षाबंधनाच्या सणाला लाॅकडाउनचा खोडा,आॅनलाईन शुभेच्छावर भर
X

अतुट नात्याचा सण म्हणजेच :रक्षाबंधन"

फुलचंद भगत

मंगरुळपीर-पविञ मानल्या जाणार्‍या बहीण भावाच्या अतुट बंधनाचा सण म्हणजे रक्षाबंधन परंतु यावर्षी या सणावरही कोरोणाचे सावट पसरल्याने भाऊ बहीणीकडे आणी बहीण भावाकडे लाॅकडाउनमुळे जावु न शकल्याने आॅनलाईन शुभेच्छांचा बहुतांश पर्याय निवडल्याचे चिञ पाहावयास मिळाले.

पविञ असलेला रक्षाबंधन हा सण बहीणभावाच्या अतुट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस 'पवित्ररोपण' असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा आणि आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल भावना असते.सणांची रेलचेल बघता श्रावण महिन्याला सणांचा राजाच म्हणावा लागेल. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी येणारी मंगळागौर, याच महिन्यातील सोमवारांचे शिवभक्‍तांना असलेले महत्त्व, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी आणि शेवटी येणारा बैलपोळा व पिठोरी अमावस्या अशी सणाची रेलचेल तर असतेच, पण पाऊस पडत असल्याने हिरवागार शालू नेसलेला निसर्गही सणांचा आनंद द्विगुणित करत असतो.त्यातीलच एक जबाबदारी आणि प्रेमाची पवित्र भावना जपणारा आजचा सण म्हणजे रक्षाबंधन.सध्याच्या सामाजिक दृष्टीने गढूळ होऊ पाहणाऱ्या व करोना महामारीमुळे निराशाजनक वातावरणात रक्षाबंधनाचा सण केवळ हिंदूंचा आहे, असे पूर्वग्रहदूषित पद्धतीने न पाहता सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन साजरा केला पाहिजे. कारण असा सण साजरा केल्याची इतिहासात उदाहरणे आहेत.ऊत्तर भारतात हा सण 'राखी' म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो अशी कामना करते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्‍तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्‍तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे होय.'राखी' ह्या शब्दातच 'रक्षण कर' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे, हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे.दक्षिण भारतात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे एक निमित्त आहे. ऐतिहासिक काळात चितोडच्या राणी कर्मवतीने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली व हुमायूँ बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले होते.

रक्षाबंधनाला ऐतिहासीक महत्व

राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. अशा राखी पौर्णिमेच्या बऱ्याच अख्यायिका आहेत.

राखी हे पविञ व अतुट बंधन

राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लीत होते.एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात वा संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्‍याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्त्वाचे ठरतात. रक्‍ताच्या नात्याव्यतिरिक्‍त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्‍य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.लहानपणी खाऊ आणि खेळणी यांच्या वाटणीवरून, आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेटता येत नसले तरी आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगत आहेत.

राखी निमित्ताने घडते भाईचारा व सहिष्णुततेचे दर्शन

द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेला जरतारी शेल्याचा तुकडा, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत राणीने एखाद्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आजकालच्या लॉकडाऊनमुळे इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम म्हणूनच राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या सामाजिक व धार्मिक संगठनांनी एकत्र येऊन हा सण साजरा करण्याचा निर्धार या निमित्ताने केल्यास देशात सौहार्दाचे, भाईचाऱ्याचे आणि सहिष्णुतेचे वातावरण तयार होण्यास हातभार लागेल.

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 4 Aug 2020 11:50 AM GMT
Next Story
Share it
Top