Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > 'ती 'अजूनही दुय्यमच !

'ती 'अजूनही दुय्यमच !

ती अजूनही दुय्यमच !
X

खूप दिवसांनंतर आज परत ' द सेकंड सेक्स 'वाचायला घेतले. स्त्री मुक्तीचे हे बायबल वाचताना वाटले, सिमोन द बोव्हुआर तर अगदी आजची, या क्षणाची परिस्थिती मांडते आहे. सिमोन द बोव्हुआर यांचे ' द सेकंड सेक्स ' हे पुस्तक १९४९मध्ये प्रसिद्ध झाले . म्हणजे जवळपास ७० वर्ष व्हायला आलीत. पण यात प्रतिपादित केलेली तीच मानसिकता आजही पहायला मिळते. या ७० वर्षात स्त्रियांच्या सांपत्तिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीमध्ये बराचसा फरक पडला. प्रत्येक क्षेत्रात तिचा सहभाग वाढला पण समाजाच्या मानसिकतेमध्ये मात्र आजही फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. स्त्रीकडे तेव्हाही सेकंड सेक्स म्हणून पाहिले गेले. आजही तेच दुय्यमत्व तिला दिले जाते. स्त्रीला अर्धांगिनी म्हटल्या जात असले तरी, हे अर्धांग डाव्या बाजूचेच ! म्हणूनच लग्नाच्या वेळी , पूजेच्या वेळी तिला डावीकडेच बसविणार. खरे तर डावी असो वा उजवी, प्रत्येक बाजू सारख्याच उपयोगाची , एकमेकांवाचून अडेल इतकी महत्त्वाची ! पण डावा हा शब्द आपल्याकडे दुय्यम किंवा गौण या अर्थानेच वापरला जातो. आता हेच बघा ना ! डाव्या विचारसरणीचे लोक किती उजवा विचार मांडतात... पण आपल्याकडे अनेकदा अत्यंत प्रतिगामी विचारसरणी मांडणाऱ्या लोकांना उजवे म्हटले जाते.ती किंवा तो जरा दिसायला उजवा आहे, डावा आहे असे अनेकदा ऐकतो ना आपण !यात उजवा म्हणजे चांगला अन् डावा म्हणजे उजव्यापेक्षा खालचा किंवा त्याच्यापेक्षा कमी. स्त्री ही पुरुषांच्या तुलनेत नेहमीच डावी मानल्या गेली आहे .

सिमोनने या पुस्तकात एक प्रसंग सांगितला आहे.ती १३-१४ वर्षांची असतानाची गोष्ट. एके दिवशी संध्याकाळची जेवणे आटपल्यानंतर सिमोन आणि तिची आई स्वयंपाक खोलीत आवरा -आवर करीत होत्या. भांडी विसळत असताना सिमोनचे सहज खिडकीबाहेर लक्ष गेले. स्वयंपाक घराच्या प्रत्येक खिडकीत तिला कुणी ना कुणी तरी स्त्री घरकाम करताना दिसत होती. कुणी स्वयंपाक करते आहे, कुणी भांडी घासते आहे , तर कुणी लहान मुलाला भरवते आहे. ते चित्र बघून तिला फारच धक्का बसला.आजही हे चित्र फारसे बदललेले नाहीच. आजची स्त्री अनेक आघाड्या कुशलतेने सांभाळते आहे. आर्थिक बाजू सुद्धा तिने उचलली आहे पण तरीही तिच्या बाबतीत सामाजिक परिस्थितीत म्हणावा तसा फरक पडलेला नाही हे देखील तितकेच खरे आहे. आपण चांगल्या वातावरणात राहतो, स्वातंत्र्य उपभोगतो, आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात हे चित्र दिसतं. पण हे संपूर्ण समाजाचे चित्र नाहीये. स्त्रीला सन्मानाने जगता यावं यासाठी संविधानाने खूप तरतुदी करून ठेवल्या आहेत.

कायद्यात पावला पावलावर तिच्या संरक्षणाची तरतूद आहे. पण अत्यंत खेदाने म्हणावेसे वाटते, हे सर्व फक्त कागदपत्रांवरच आहे. अनेक भागात काळ तिथेच थांबला आहे, जो ' द सेकंड सेक्स ' मध्ये वर्णन केलेला आहे. आजही व्यवहारात आणि पुस्तक किंवा कायदे यात फरक असलेला दिसून येतो. मार्गारेट अल्वा यांच्या एका पाठामध्ये एका प्रसंगाचे वर्णन होते, मार्गारेट अल्वा निवडणुकीच्या काळात नागालँडच्या टेकड्यांच्या भागात फिरत होत्या. नागालँडच्या या आदिवासी भागात फिरत असताना त्यांनी पाहिले की,अनेक आदिवासी स्त्रिया कामासाठी त्या उंचच उंच टेकडया अनेकदा चढतात उतरतात.तेव्हा त्यांच्या सोबत पुरुष देखील असतो. पण दृश्य कसे होते?मार्गारेट अल्वा म्हणतात, एक स्त्री कडेवर मूल, डोक्यावर भाज्या भरलेली मोठी टोपली आणि हातात शेतीची अवजारे घेऊन जात होती. तिच्या सोबत एक पुरुष देखील होता . त्याच्या हातात फक्त एक काठी होती .

बाकी काहीच नव्हते.मार्गारेट अल्वा यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी त्याला प्रश्न विचारला, का रे ही जी तुझ्या सोबत आहे ती तुझी बायको आहे का? तो माणूस म्हणाला, होय माझीच बायको आहे आणि हे मूल आहे हे ?तर तो माणूस म्हणाला, होय मूल देखील माझेच आहे. तेव्हा मार्गारेट अल्वा म्हणाल्या, तुला वाटत नाही का हिला काही मदत करावी? तर तो उत्तरला मदतच तर करतो आहे मी ! माझ्या हातात जी काठी आहे, ती माझ्या पत्नीच्या संरक्षणासाठीच तर आहे .तिच्यावर संकट आले , एखादा कठीण प्रसंग गुदरला तर तिचे संरक्षण करायला माझ्यासोबत काठी पाहिजे ना ! संरक्षणाची ही जी कल्पना आहे ती आजही अस्तित्वात आहे , त्यात फार फरक पडलेला नाही. कारण समाज मोठा दुटप्पी आहे.

मागे मनात विचार आला होता, एक लेख लिहावा, ' ती ऑनलाईन असते तेव्हा ' या शीर्षकाचा ! आपण ऑनलाईन असतो ना आणि तेही रात्री तेव्हा आपली तथाकथित संरक्षण यंत्रणा खडबडून जागी होते.अनेक मित्र, भाऊ, विद्यार्थी आपल्या संरक्षणाच्या भावनेतून आपल्याशी संवाद साधतात. इतक्या रात्री ऑनलाईन? मॅडम अजून झोपल्या नाही का? अरे बाबा तू पण तर इतक्या रात्री जागाच आहेस ना ! एखादा मित्र फार आपुलकीने सांगतो, 'अगं इतक्या रात्री ऑनलाईन नको राहत जाऊस. तुला माहित नाही, लोक निराळेच अर्थ काढतात. पुरुष कसे असतात ते आम्हालाच माहित आहे. ' ही आमची संरक्षण यंत्रणा आहे बरं ! आपल्यापेक्षा लहान भावाला राखी पौर्णिमेला धागा बांधायचा. तो आपले रक्षण करणार. ग्रामीण भागातील वयाने लहान असलेले भाऊ पण असे संरक्षण करताना दिसतात. तरूण बहिणीला दुकानात जाऊ देत नाहीत, बाहेरची कामं करू देत नाहीत, बाहेर उभे देखील राहू देत नाहीत. घरातली लोकही मुलींना बाहेर पाठवताना त्यांच्या संरक्षणासाठी सोबत एखादा पुरुष असावा म्हणून लहान पोराला पाठवतात. घरात या पोराला साधे स्वतःचे ताट वाढून घेता येत नाही. त्या पोराचे कपडे धुण्यापासून ,त्याला जेवू घालण्यापर्यंत सारं काही ताईच करत असते. अन् हा भाऊ या ताईच्या संरक्षणासाठी सोबत पाठविला जातो.

हसावे की, रडावे हेच कळत नाही !

आज स्त्रीने अवकाशात झेप घेतली आहेआणि सागरतळाशी देखील सूर मारला आहे . प्रत्येक क्षेत्रात आपली अमीट छाप तिने उमटवली आहे. घरकाम तर तिच्या पाचवीलाच पुजलंय. खरं तर स्त्रीच्या घरकामाच्या चाकोरीत साहस,नाविन्य, आव्हान, सर्जनशीलता यांचा अभाव असतो. त्यामुळे तिच्या अनुभवांची क्षितिजे बंद होतात आणि तिची बौद्धिक उपासमार होते. स्त्रीला तिचे आवडीचे कार्यक्षेत्र निवडून त्यात काम करण्याची मुभा हवी. मात्र याची वानवा दिसून येते. पुरुषाला मात्र आजदेखील स्त्रीची कौशल्ये आत्मसात करणे कमीपणाचे वाटते. त्यामुळे नोकरीतून मुक्त झालेला पुरुष निवृत्त होतो . पुरुष निवृत्त झाला की, त्याची उपयुक्तता संपुष्टात येऊ शकते ,जर त्याचा घरातील सहभाग शून्य असेल तर !परंतु स्त्री कधीच निवृत्त होत नाही. घर चालवण्यातील तिचा सहभाग कधीच संपत नाही. अशी ही विश्व जननी , तरीही तिला ' सेकंड सेक्स ' म्हणणे खरंच सांगा योग्य आहे का ?

डॉ. स्वप्ना लांडे

7507581144

Updated : 31 July 2020 10:53 AM GMT
Next Story
Share it
Top