जिल्हयातील साडे चार लाख शेतक-यांची पिकविमा कंपणीकडून दिशाभूल...
X
म-मराठी न्यूज़ नेटवर्क
विशेष प्रतिनिधी/वासीक शेख
यवतमाळ,दि.२ नवंबर : यवतमाळ जिल्हयातील 4 लाख 67 हजार शेतक-यांनी प्रधानमंत्री पिकविमा काढला आहे. यामधील फक्त 8 हजार 345 शेतक-यांनाच पिकविमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार असल्याची धक्कादायक माहिती आज झालेल्या बैठकीतून समोर आली. संपुर्ण जिल्हयात शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले असतांना पिकविमा कंपणी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कुठलेच निकष न ठेवता कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या आधारावर जिल्हयातील शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी आज खासदार भावनाताई गवळी यांनी केली आहे.
दिनांक 15 नोव्हेंबर पुर्वी शेतक-यांना पिकविमा अंतर्गत नुकसान भरपाई न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा आधीच भावनाताई गवळी यांनी दिला आहे. या अनुषंगाने आज पिकविमा कंपणीचे अधिकारी तसेच कृषी विभागाच्या अधिका-यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले फक्त 4 हजार 971 शेतकरी मदतीसाठी पात्र ठरत असल्याची माहिती विमा कंपणीच्या अधिका-यांनी दिली. एवढेच नव्हे तर पिक कापणी नंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असतांना फक्त 3 हजार 374 शेतक-यांनीच अर्ज दाखल केले आहे. या एकून 8 हजार 345 शेतक-यांना 15 नोव्हेंबर पुर्वी नुकसान भरपाई देण्याची मागणी विमा कंपणीने मान्य केली. मात्र जिल्हयातील लाखो कापूस, सोयाबिन उत्पादक शेतक-यांचे नुकसान झालेले असतांना बोटावर मोजता येईल इतक्याच शेतक-यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याने भावनाताई गवळी यांनी आपला संताप व्यक्त केला. कृषी विभागाने जवळपास साडेचार लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधीत झाल्याचा अंदाज आपल्या प्राथमिक सर्वेक्षणातून वर्तविला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी भावनाताई गवळी यांनी केली. अवकाळी पावसामुळे सुध्दा मोठया प्रमाणात नुकसान झाले असतांना शेतकरी बांधव अर्ज करु शकले नाही. अनेकांजवळ अॅन्ड्राईड मोबाईल नाही. 72 तासात अर्ज करण्याची पध्दत सुध्दा अनेकांना समजली नाही. एवढेच नव्हे तर पिक काढणी कालावधी हा 27 सप्टेंबर ते ऑक्टोंबर चा पहीला आठवडा ठरला असला तरी सततच्या पावसामुळे शेतकरी आपला माल काढू शकला नाही. त्यामुळे अनेकांनी ऑक्टोंबर च्या शेवटच्या आठवडयापर्यन्त आपला माल शेताबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आता मात्र नियमांवर बोट ठेऊन नुकसान भरपाई पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अटी शर्ती बाजुला ठेऊन आर्थीक संकटात सापडलेल्या शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी भावनाताई गवळी यांनी केली आहे. बैठकीला तहसिलदार श्री. कुणाल झाल्टे, कृषी विभागाचे श्री. जगन राठोड, श्री. वानखडे, श्री. उमरे, श्री. शिवा जाधव, विमा कंपणीचे अर्जुन राठोड, हेमंत शिंदे, तसेच शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा उप संपर्क प्रमुख संतोष ढवळे, शहर प्रमुख पिंटु बांगर, राजु नागरगोजे, डॉ. प्रसन्न रंगारी, ठिबक तुषार असोसिएशन चे गुणवंत ठोकळ उपस्थित होते.
परीणाम भोगावे लागतील
विमा कंपणीने शेतकरी तसेच सरकारकडून कोटयवधी रुपये विमा हफ्ता जमा केला. आता मात्र नुकसान भरपाई देतांना टाळाटाळ करीत आहे. विमा कंपणीने शेतक-यांबाबत सहानूभूतिपुर्वक विचार करावा. अन्यथा संसदेत प्रश्न उपस्थित करण्यापासून न्यायालयीन लढाई लढण्यास मी तयार आहे. शेतक-यांना न्याय न मिळाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाची सुध्दा आमची तयारी आहे.