Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > खाजगी कोव्हीड रुग्णालयात जास्त रक्कम आकारल्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली सुनावणी

खाजगी कोव्हीड रुग्णालयात जास्त रक्कम आकारल्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली सुनावणी

खाजगी कोव्हीड रुग्णालयात जास्त रक्कम आकारल्याबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली सुनावणी
X

म मराठी न्यूज टीम

प्रतिनिधि / फैजान अहमद

यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्रशासन, आयसीएमआर आणि राज्यशासनाच्या मार्गदर्शन सुचनेनुसार शहरात नामवंत खाजगी रुग्णालयाला डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटल सुरू करण्याबाबत मान्यता दिली. मात्र या खाजगी रुग्णालयात शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या नमुद दरापेक्षा जास्त रक्कम आकारल्याच्या अनुषंगाने तक्रारदारांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. तसेच याप्रकरणी सत्यता पडताळून संबंधित कुटुंबाला अतिरिक्त रक्कम परत करण्याचे निर्देश दिले.

यवतमाळ शहरातील एक महिला सदर डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटल येथे 13 ऑक्टोबर 2020 रोजी उपचारार्थ दाखल झाली होती. चाचणी केली असता सदर महिलेचा अहवाल कोरोना पॉझेटिव्ह आला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा 16 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मृत्यु झाला. उपचाराकरीता लागलेला खर्च म्हणून डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटलने 97250 इतकी आगावू रक्कम भरणा करून घेतल्याची तक्रार संबंधित कुटुंबियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आली.

याप्रकरणात तक्रारीचे तातडीने निरसण व्हावे व पिडीतास न्याय द्यावा, या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी 20 नोव्हेंबर रोजी त्यांच्या दालनात सुनावणी आयोजित केली. सदर सुनावणीमध्ये जिल्हाधिका-यांनी तक्रारदार व संबंधित हॉस्पीटलचे संचालक यांचे बयाण ऐकून घेऊन तसेच उपस्थित अधिकारी यांनी सदर तक्रारीच्या अनुषंगाने काढलेले निष्कर्ष याबाबत पडताळणी केली. कोणत्याही डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पीटलने शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या नमुद दरापेक्षा जास्त रक्कम कोणत्याही रुग्णाकडून घेऊ नये. तातडीने सदर प्रकरणातील सत्यता तपासून माझ्या समक्ष अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. तसेच प्रशासन कोणत्याही रुग्णावर अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी आश्वस्त केले.

सुनावणीवेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लीवार, तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे, संबंधित हॉस्पीटलचे संचालक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, तक्रारकर्त्यांचे वडील आदी उपस्थित होते.

फैजान अहमद

मो.7770008861

Updated : 20 Nov 2020 3:52 PM GMT
Next Story
Share it
Top