Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > कोरोनाविरुध्दच्या लढाईत जिल्हा प्रशासन अग्रेसर

कोरोनाविरुध्दच्या लढाईत जिल्हा प्रशासन अग्रेसर

कोरोनाविरुध्दच्या लढाईत जिल्हा प्रशासन अग्रेसर
X

विशेष लेख दि. 14 ऑगस्ट 2020

यवतमाळ : कोरोना ही जागतिक महामारी घोषित झाली आहे. या विषाणुच्या प्रादुर्भावामुळे आपला देश, राज्य आणि जिल्हासुध्दा ढवळून निघाला आहे. गत सहा महिन्यांपासून राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनासह सर्व स्तरातील नागरिक, समाजसेवी संस्था नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे. सर्व जण ‘कोरोना योद्धे’ म्हणून ही लढाई लढत आहे.

देशात जेव्हा कारोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हापासून राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यात यवतमाळचा समावेश होता. या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव ओळखून जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यापासूनच अतिशय तातडीच्या उपाययोजना आखल्या. त्यामुळेच पहिल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला नव्हता. यासाठी जिल्ह्याचे प्रशासन आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा अभिनंदनास पात्र आहे.

प्रशासनाने सुरवातीपासूनच लॉकडाऊनची अतिशय कडक अंमलबजावणी केली. या काळात संपूर्ण पोलिस विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर दिसू लागला. तर जिल्हा प्रशासन कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आजही तेवढ्याच तत्परतेने कार्यरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या जवळपास पोहचली आहे. मृत्युंची संख्या जवळपास 50 आहे. जिल्ह्यातील मृत्युदर हा 2.68 टक्के आहे. राज्याच्या तुलनेत आपला मृत्युदर कमी आहे, तरीसुध्दा एकही मृत्यु होऊ न देणे यालाच प्राधान्य आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्के आहे. यात आपण राज्यापेक्षा सरस आहोत. त्यामुळेच आतापर्यंत जवळपास 1400 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे येथील प्रयोगशाळेचा प्रश्न त्वरीत निकाली काढण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयात खनीज विकास निधी आणि नियोजन समितीच्या निधीमधून 3 कोटी रुपये खर्च करून ‘विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा’ (व्हीआरडीएल) सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नमुन्यांची चाचणी होत आहे. आतापर्यंत 29 हजार चाचण्या जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. याशिवाय जलदगतीने चाचण्या होण्यासाठी 2 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. यातून 32 हजार 500 ॲन्टीजन टेस्ट किट विकत घेतल्या असून आणखी 30 हजार किट घेण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 92 फिवर क्लिनीक, 37 कोव्हीड केअर सेंटर, 6 कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 1 कोव्हीड हॉस्पीटल कार्यरत आहे. जिल्ह्यात ‘होम आयसोलेशन’ ची सुरुवात झाली आहे. तसेच रुग्णांना इतरत्र खाजगी रुग्णालयात उपचार करायचे असेल तर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. प्रशासन नागरिकांसाठी झटत आहे, त्यामुळे नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये, आपल्या घरातच सुरक्षित राहावे, बाहेर पडतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. हात वारंवार स्वच्छ धुवावे. कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा.

राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासन शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित बांधव यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. कापूस खरेदीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला. यवतमाळ जिल्ह्यात एकूण 2 लाख 69 हजार 534 शेतकऱ्यांकडून तब्बल 55 लाख 69 हजार 500 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 626 शेतकरी पात्र ठरले आहेत. कर्जमुक्तीची ही रक्कम 703 कोटी रुपये असून आतापर्यंत 78304 शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीचे 579 कोटी 38 लाख रुपये जमा झाले आहे. जिल्ह्यामध्ये 1 लाख 48 हजार 469 शेतकऱ्यांना 1172 कोटी 5 लाख रुपये खरीप पीक कर्जवाटप करण्यात आले आहे.

26 जानेवारीपासून सुरु झालेल्या शिवभोजन योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण 21 केंद्र सुरू आहे. कोरोना आपत्तीमुळे गरीब व गरजू लोकांसाठी शासनाने 1 एप्रिलपासून केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 3 लाख 25 हजार 352 नागरिकांनी शिवभोजन योजनेचा लाभ घेतला आहे. कोरोनाच्या संकटासोबत लढतांनाच शेतकरी, शेतमजूर, दुर्बल घटक आणि नागरिकांच्या विकासासाठी शासन कटिबध्द आहे. नागरिकांनो कोरोनाची ही लढाई केवळ शासन आणि प्रशासनाची नाही तर ती आपल्या प्रत्येकाची आहे. या लढाईत प्रत्येक जण कोरोनायोद्धा आहे. त्यामुळे संकटाच्या या काळात सहकार्य करा.

ना. संजय राठोड

मंत्री, वने, भुकंप पुनर्वसन तथा

पालकमंत्री, यवतमाळ जिल्हा

Updated : 14 Aug 2020 11:06 AM GMT
Next Story
Share it
Top